इंडिया दर्पण विशेष लेखमाला – सुप्रसिद्ध दत्तस्थाने
स्वामी समर्थांचे प्रकट स्थानः श्रीक्षेत्र कर्दळीवन
देशातील अनेक दत्त स्थानं निसर्गसंपन्न डोंगर दरयांत असलेली दिसून येतात.त्याला कर्दळीवन अपवाद नाही. दत्तात्रेयांचे दुसरे अवतार असलेले नृसिंहसरस्वती महाराज या ठिकाणी गेले आणि तेथूनच सुमारे तीनशे वर्षांनी दत्तात्रेयांचा तिसरा अवतार असलेले स्वामी समर्थ प्रकट झाले. हा इतिहास सर्वज्ञात आहे. स्वत: स्वामी समर्थांनी अनेक वेळा आपण कर्दळीवनातून आल्याचे स्पष्ट केले आहे. आणि आता टीव्हीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेचा शुभारंभ देखील कर्दळीवनातून स्वामी समर्थ प्रकट होतात याच प्रसंगाने करण्यात आला. या मालिके मुळे तर कर्दळीवन हे नाव देशातील अबालवृद्धांच्या तोंडी जावून पोहचले आहे. त्यामुळेच श्री दत्त नवरात्रोत्सवा निमित्त इंडिया दर्पण ने सुरु केलेल्या या विशेष लेख मालेत आज आपण कर्दळीवन या स्थानाची महती पाहणार आहोत.

मो. ९४२२७६५२२७
गुरुदेव दत्तांचे अवतार ” दिगंबर” आणि “श्रीकृष्णश्याम कमललोचन”
श्री दत्त नवरात्रोत्सवा निमित्त आपण श्री दत्तात्रेयांनी धारण केलेल्या सोळा अवतारांची महती जाणून घेतो आहोत. आज आपण दत्त गुरुंच्या पंधराव्या आणि सोळाव्या अवताराची माहिती घेऊ या. गुरुदेव दत्तात्रेयांच्या पंधराव्या अवताराचे नाव आहे ” दिगंबर” आणि सोळाव्या अवताराचे नाव आहे “श्रीकृष्णश्याम कमललोचन”.
दत्तात्रेयांचा हा पंधरावा अवतार” दिगंबर” या नावाने प्रसिद्ध असून यदुराजास श्री दत्त दिगंबर भेटले व त्यांनी आपल्या २४ गुरुंपासून काय काय ज्ञान घेतले याचा त्याला बोध केला. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी, सूर्योदयाच्या वेळेस हा अवतार झाला. श्रीप्रभूंनी या अवतारात सोमवंशी राजा यदु आणि हिरण्यकश्यप आणि कयाधूचा पुत्र भक्त प्रल्हाद यांचे कल्याण केले. ज्ञान आणि वैराग्याने परिपूर्ण असलेल्या, हे संपूर्ण जग परमात्म्याचाच अंश आहे असा आत्मविवेक प्रदान करणार्या, “दिगंबर” अवतार धारण करणाऱ्या ज्ञानमूर्ती श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो
“श्रीकृष्णश्याम कमललोचन”
भगवान सद्गुरु श्रीदत्तात्रेय यांचा सोळावा अवतार “श्रीकृष्णश्याम कमललोचन” या नावाने ओळखला जातो.सर्वांनी गुरुदेवांच्या चरणी साष्टांग नमस्कार केला. ते सर्वांगसुंदर असलेल्या दत्तप्रभूकडे पाहत आहोत तोच पाहता पाहता श्रीकृष्णश्याम कमललोचन या स्वरुपात त्यांना दत्तगुरुंचे दर्शन झाले. भगवान श्री दत्तात्रेयांचा हा अवतार कार्तिक शुध्द व्दादशीच्या दिवशी बुधवारी रेवती नक्षत्रावर भगवान सुर्यनारायण उदयाला येत असतानांच झाला. सर्व विश्वाचे अधिष्ठान असलेला तो परमात्मा अवधूत श्रीकृष्णश्यामकमललोचन या रुपाने प्रकट होताच सर्वांनी जयजयकार करुन पुष्पवृष्टि केली. “श्रीकृष्णश्याम कमललोचन”अवतार धारण करणाऱ्या परब्रह्म स्वरूप श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो. श्रीगुरूंचे हे सोळा अवतार!
कर्दळीवन : जेथे स्वामी समर्थ प्रकटले!
गेल्या सात- आठ वर्षांत दत्त संप्रदायातील कर्दळीवन या स्थानाचे महत्व खुपच वाढलेले दिसते. विशेषत: तरुण पिढीला या स्थाना विषयी आकर्षण वाढत आहे. हे खरंच कौतुकास्पद आहे. तीन चार वर्षांपूर्वी पुण्याला गेलो होतो. त्यावेळी ‘कर्दळीवन’ नावाचे एक पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले होते. या पुस्तकाच्या प्रमोशनसाठी पुण्यात अनेक ठिकाणी पुस्तकाचे बॅनर्स लावलेले दिसत होते. स्वारगेट कडून धायरी फाटयाकड़े जातांना पर्वतीसमोरच्या रोडवर तर सगळ्या फुटपाथभर कर्दळीवनचे बॅनर्स आणि पुस्तकं विक्रीसाठी मांडलेले आठवतात. ही पुस्तकं तरुण मुलं मुली विकत घेत होती. तरुणाईच्या हातांत ‘कर्दळीवन’ पाहून छान वाटत होते. त्यानंतर पुण्या मुंबईतून अनेक टूर अॅन्ड ट्रॅवल कंपन्या भाविकांना कर्दळीवनाचे दर्शन घडवून आणायला सरसावल्या. सह्याद्री पासून हिमालया पर्यंत अवघडात अवघड ट्रेक करणार्या मंडळींसाठी ‘कर्दळीवन’ हे एक आव्हान ठरले. आता सुद्धा हा लेख लिहिण्यापूर्वी कर्दळीवनाचे अनेक व्हिडिओ पाहिले. त्यातही कर्दळीवनाची थ्रिलिंग वाटचाल , तिथले डोंगर , गुहा आणि निसर्ग पाहून आपणही एकदा या ठिकाणी जावे असे मनापासून वाटते.
देशातील अनेक दत्त स्थानं निसर्गसंपन्न डोंगर दरयांत असलेली दिसून येतात.त्याला कर्दळीवन अपवाद नाही. दत्तात्रेयांचे दुसरे अवतार असलेले नृसिंहसरस्वती महाराज या ठिकाणी गेले आणि तेथूनच सुमारे तीनशे वर्षांनी दत्तात्रेयांचा तिसरा अवतार असलेले स्वामी समर्थ प्रकट झाले. हा इतिहास सर्वज्ञात आहे. स्वत: स्वामी समर्थांनी अनेक वेळा आपण कर्दळीवनातून आल्याचे स्पष्ट केले आहे. आणि आता टीव्हीवरील ‘जय जय स्वामी समर्थ’ या मालिकेचा शुभारंभ देखील कर्दळीवनातून स्वामी समर्थ प्रकट होतात याच प्रसंगाने करण्यात आला. या मालिके मुळे तर कर्दळीवन हे नाव देशातील अबालवृद्धांच्या तोंडी जावून पोहचले आहे. त्यामुळेच श्री दत्त नवरात्रोत्सवा निमित्त इंडिया दर्पण ने सुरु केलेल्या या विशेष लेख मालेत आज आपण कर्दळीवन या स्थानाची महती पाहणार आहोत.
कर्दळीवन स्थान महात्म्य
लौकिक अर्थाने खूप प्रसिद्धी झाल्यावर आणि आपले अवतार कार्य पूर्ण झाल्यावर नृसिंह सरस्वती श्रीशैल्य येथे गेले. तेथे पाताळगंगेमध्ये जाऊन त्यांनी शिष्यांना ‘पुष्पाचे आसन’ करायला सांगितले. शिष्यांनी एक मोठी बांबूची टोपली तयार केली. त्याला सर्व बाजूंनी कर्दळीच्या पानांनी लपेटले. त्यावर शेवंती, कुमुद, मालती इ. फुले पसरून पुष्पासन तयार केले. त्या दिवशी गुरू कन्या राशीत होता, बहुधान्य नाम संवत्सर होते (शके १४४०), उत्तरायण सुरू होते. सूर्य कुंभ राशीत होता, माघ वद्य प्रतिपदा होती आणि शुक्रवार होता. त्या दिवशी प्रातःसमयी नृसिंह सरस्वती पुष्पासनावर बसले, पाताळगंगेतून कर्दळीवनाकडे गेले आणि दिसेनासे झाले.
नृसिंह सरस्वती यांनी तेथे निबिड अरण्यात एका प्रशस्त ठिकाणी समाधीच्या स्थितीत राहण्याचे ठरविले. नीरव शांतता, उंचच उंच वृक्ष असलेल्या ठिकाणी एका पहाडाच्या कोपर्यात एक गुहा होती. त्या गुहेला लागून वटवृक्ष, औदुंबर आणि अश्वत्थ हे तिन्ही वृक्ष एकत्र वाढलेले होते. त्या ठिकाणी श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून ध्यानस्थ बसले. असे म्हणतात की ३५० हून अधिक वर्षे ते तेथे समाधी अवस्थेत बसून होते. त्यांच्या आजूबाजूला जंगल वाढले होते. इतकेच नव्हे तर त्यांच्या शरीराभोवतीही एक प्रचंड मोठे वारूळ तयार झाले होते. ते वारूळ त्यांच्या मस्तकाहूनही ८ ते १० फूट उंच झाले होते. वारुळामध्ये नागांचा मुक्त संचार होत होता.
एके दिवशी एक चेंचू आदिवासी लाकूड तोडण्यासाठी त्या घनदाट जंगलात फिरत होता. फिरता फिरता जेथे श्री नृसिंह सरस्वती समाधी लावून बसले होते तेथे आला आणि तेथील वृक्षावर त्याने घाव घातला. तो घाव चुकून त्या वारुळावर बसला आणि समाधी स्थितीत बसलेल्या श्री नृसिंहसरस्वतींच्या मांडीपर्यंत पोहोचला. तेथून भळाभळा रक्त वाहू लागले. श्री नृसिंह सरस्वतींची शेकडो वर्षांची समाधी त्यामुळे भंगली आणि ते त्या वारुळातून स्वामी समर्थरूपाने बाहेर पडले.
कर्दळीवन येथील स्वामी समर्थांचे मूळ प्रकट स्थान
कर्दळीवन हे श्रीदत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान. श्रीपादश्रीवल्लभ आणि श्रीनृसिंहसरस्वती स्वामी यांच्या अवतार कार्यात त्याला विशेष महत्त्व आहे. अक्कलकोट स्वामींच्या दत्तावतारपणाला पुष्टी देते ते आपण कर्दळीवनातून आल्याचे त्यांचे सांगणे. अन्य अनेक ऐतिहासिक, पौराणिक, धार्मिक, आध्यात्मिक संदर्भ या स्थानाला आहेत. एवढे सर्व असूनही कर्दळीवनात जाणाऱ्यांचे प्रमाण फारच थोडे आहे. दुर्गमता, सोयीसुविधांचा अभाव, भीती वाटावी असे प्रवाद या साऱ्यामुळे तेथे जायला फारसे कोणी धजावत नाही. शिवाय, श्रीदत्तगुरूंच्या मनात असले तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते, अशीही भाविकांची श्रद्धा आहे. काही असो, परंतु तेथे जाणाऱ्यांचे प्रमाण अत्यल्प आहे आणि तेही प्रामुख्याने अगदी अलीकडचे, गेल्या सात-आठ वर्षांतील आहे, ही वस्तुस्थिती आहे.
फार प्राचीन काळापासून कर्दळीवन हे सिद्ध, योगी, मुनी आणि ऋषी यांचे अत्यंत आवडते आणि एकांतात तपश्चर्या करण्यासाठी अनुकूल असे ठिकाण आहे. कर्दळीवन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते. त्या सर्व परिसरात दिव्य दैवी स्पंदने भरून राहिली आहेत. तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्त्विक-भाव जागृत होतात. शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात. आपल्या अंतर्मनामध्ये चैतन्याचा आविष्कार होतो. एक विलक्षण जाणीव अंतरंगामध्ये पुलकित होते. मन आनंदाने भरून जाते. ज्या ठिकाणी प्रत्यक्ष श्रीदत्तप्रभूंचा वास आहे, जेथे श्रीदत्तप्रभूंचे सर्व अवतार येऊन मिळतात आणि गुप्त रूपात तेथेच वास करतात त्या कर्दळीवनाचे माहात्म्य किती असेल याची कल्पना आपल्याला करता येणार नाही.
कर्दळीवनाचा इतिहास पाहताना कर्दळीवन या शब्दाची उत्पत्ती कशी झाली हे मोठे कोडे आहे. महाराष्ट्रभर कर्दळीवन हे नाव जरी रूढ झाले असले तरी आंध्र कर्नाटकात त्याला ‘कदलीवन’ किंवा ‘काडलीवन’ असे म्हटले जाते. एक मात्र खरे की कर्दळीवन या नावाचा आणि कर्दळीच्या झाडाचा काहीही संबंध नाही. कर्दळीवनात सगळीकडे चिखल आणि दलदल असून तेथे कर्दळीची झाडे फोफावली असल्याने त्याला कर्दळीवन म्हणतात हा समज चुकीचा आहे. श्रीनृसिंह सरस्वती ज्या बांबूच्या बुट्टीतून बसून कर्दळीवनात गेले, त्या बुट्टीला कर्दळीची पाने गुंडाळून आणि त्यावर फुले पसरून त्यांचे आसन तयार केले होते.
कर्दळीवन परिक्रमा मार्ग
कर्दळीवन परिक्रमा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे श्रीशैल्य येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने २४ कि. मी. चा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळीवनात प्रवेश करणे. दुसरा मार्ग म्हणजे हैद्राबाद येथून श्रीशैल्य येथे येत असताना श्रीशैल्यमच्या अलीकडे साधारण १० ते १२ कि. मी. वर अक्कमहादेवी गुंफेकडे जाणारा मार्ग आहे. पण हा प्रचलितच नाही. व्यंकटेश किनाऱ्यावर एका साधू महाराजांनी झोपडी बांधली असून तेथेच कोळी समाजातील १० ते १२ कुटुंबियांची कच्ची घरे आहेत. कर्दळीवनात जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना येथे सर्व प्रकारचे साहाय्य मिळते.
गरज असल्यास सामान वाहण्यासाठी सेवेकरी मिळतात. त्यांना योग्य ते मानधन द्यावे लागते. एका दिवसाची ५०० रु. एवढी रक्कम ते घेतात. तसेच वाट दाखविण्यासाठी मार्गदर्शकही मिळू शकतात. मात्र या सर्वांची भाषा तेलगू आहे. एखाद्याला तोडके मोडके हिंदी आणि इंग्रजी येते. येथे आधी सांगितल्यास चहा, नाष्टा, निवासही करता येतो. मात्र बाकी कसलीही राहण्याची विशेष सोय, संडास, बाथरूम, गरम पाणी वगैरे व्यवस्था येथे उपलब्ध नाही. तेथील स्वामी आणि इतर व्यक्ती आपल्याला गरजेप्रमाणे साहाय्य उपलब्ध करून देतात. सध्या मोबाईल सेवेमुळे त्यांचेशी संपर्क साधून आधी व्यवस्था करता येऊ शकेल.
श्रीअक्कमहादेवी गुहेपासून पश्चिमेकडे कर्दळीवनातील श्रीदत्तप्रभू व श्रीस्वामी-समर्थांच्या मूळ स्थानाकडे जायचा रस्ता आहे. हा कर्दळीवनातील दुसर टप्पा ६ कि. मी. अंतराचा आहे. हा रस्ता बहुधा सरळसोट आहे. मधे थोडाफार चढ-उतार येतो. मात्र या रस्त्यावर अतिशय घनदाट आणि निबिड अरण्य आहे. अगदी दिवसासुद्धा सूर्यकिरणे जमिनीवर पोहोचू शकत नाहीत. या रस्त्याची सुरूवात होतानाच अक्कमहादेवीच्या गुहेजवळ पूर्वेकडे एक विस्तीर्ण पठार आहे. तेथे एक अत्यंत जुने वडाचे झाड आहे. हा वृक्ष ५००० वर्षांपूर्वीचा असावा असा अंदाज आहे.
कर्दळीवनात कसे जावे?
कर्दळीवनामध्ये जाणे थोडे अवघड आहे, मात्र अशक्य नाही. कर्दळीवनाच्या परिक्रमेमध्ये एकूण पाच स्थानी दर्शन घ्यावे लागते आणि मग आपली परिक्रमा पूर्ण होते. ही स्थाने म्हणजे अक्कमहादेवी मंदिर, व्यंकटेश किनारा, अक्कमहादेवी गुहा, स्वामी प्रकट स्थान आणि बिल्ववन (मार्कंडेय ऋषी तपस्थळ) ही आहेत. या परिक्रमेमध्ये एकूण ३६ कि.मी. चालावे लागते. शारीरिकदृष्ट्या सक्षम आणि श्रद्धावान अशी कोणतीही व्यक्ती ही परिक्रमा सहजतेने पूर्ण करू शकते. स्त्री-पुरुष सर्व जण ही परिक्रमा करू शकतात. आध्यात्मिक अनुभूतींबरोबरच कर्दळीवनातील जैवविविधता, तेथील निसर्ग, गुहा, घनदाट जंगल हेही मुख्य आकर्षण आहे.
तरुणाईसाठी कर्दळीवन परिक्रमा म्हणजे एक साहसी आध्यात्मिक ट्रेकिंग आणि पर्यटन आहे. परिक्रमेची सुरुवात आदल्या दिवशी श्रीशैल्य येथे पोहोचून श्रीमल्लिकार्जुन स्वामी आणि श्रीभ्रमरांबा माता देवीचे दर्शन घेऊन करावी लागते. पाताळगंगेतून बोटीने साधारण २८ कि.मी. प्रवास करून व्यंकटेश किनार्याला पोहोचावे लागते. साधारणपणे नोव्हेंबर ते मे या काळामध्ये कर्दळीवन परिक्रमा करता येते. पावसाळ्यामध्ये तेथे जाता येत नाही.
कर्दळीवन स्थान: आंध्रप्रदेश, श्रीशैल्याम-पाताळगंगा-कर्दळीवन
लॉक डाउन नंतर कर्दळीवन परिक्रमा अजून सुरु झालेल्या नाहीत.
संपर्क: कर्दळीवन सेवा संघ, ६२२, जानकी -रघुनाथ पुलाची वाडी. डेक्कन जिमखाना. पुणे ४११००४. टेलिफोन: ०२० २५५३०३७१.
(संदर्भ: धार्मिक ग्रंथ)