इंडिया दर्पण विशेष लेखमाला – सुप्रसिद्ध दत्तस्थाने
श्री क्षेत्र अक्कलकोट
आजच्या तिथीला दत्तात्रेयांचा सर्वांत लोकप्रिय अवतार म्हणजे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचा अवतार. ‘जय जय स्वामी समर्थ’ या टीव्ही मलिकेमुळे तर स्वामी समर्थांची माहिती घराघरांत जावून पोहचली आहे. श्री दत्त नवरात्रोत्सवा निमित्त आज आपण श्रीक्षेत्र अक्कलकोटची महती जाणून घेणार आहोत.
गुरुदेव दत्त अवतार “सिध्दराज” आणि “ज्ञानराज”
पौराणिक काळात गुरुदेव दत्तांनी सोळा अवतार घेतले अशी मान्यता आहे. आज आपण गुरुदेव दत्तांच्या सातव्या आणि आठव्या अवताराची माहिती घेणार आहोत. गुरुदत्तांच्या सातव्या अवताराचे नाव आहे – “सिद्धराज” तर आठव्या अवताराचे नाव “ज्ञानसागर” असे आहे.
एकदा देशाटन करतांना दत्तात्रेय बद्रिकावनात गेले. तेथे त्यांना अनेक सिद्ध दिसले. दत्तात्रेयांनी कुमार रुप धारण केले आणि अनेक चमत्कार करुन सिध्दांचे गर्वहरण केले, व त्या सर्वांना योगदीक्षा दिली. हा दत्तात्रेयांचा सातवा अवतार ‘सिध्दराज’ नावाने प्रसिद्ध आहे. माघ शुद्ध १५ ही या अवताराची जन्म तिथी मानतात.

मो. ९४२२७६५२२७
श्रीदत्तात्रेय यांचा आठवा अवतार “ज्ञानराज” हा होय. एकदा विश्वगुरु भगवान श्रीदत्तात्रेय एकांतामध्ये बसले असता विचार करु लागले की. हे सिध्द लोक माझ्या उपदेशाने सिध्द झाले खरे पण जोपर्यंत कामक्रोधादि विकार समूळ नष्ट होत नाहीत तोपर्यंत खऱ्या शांतीचा व सुखाचा त्यांना लाभ होणार नाही. असा विचार करुन परमदयाळू भगवान श्रीदत्तात्रेय ते पूर्वीचे त्रिगुणातीत आणि नित्य शुध्द, बुध्द, मुक्ता असे आपले स्वाभाविक रुप व आपली सहजावस्था क्षणभर बाजूला ठेवून पुन्हा कौमाररुप धारण करुन प्रकट झाले. हा दत्तात्रेयांचा आठवा अवतार होय.
या अवताराला ज्ञानसागर असे अनुरुप नाव देण्यात आले. ज्ञानसागर हा दत्तात्रेयांचा आठवा अवतार फाल्गुन शुक्ल पक्षातील दशमीच्या दिवशी रविवारी सूर्योदयाच्या वेळी झाला. त्यावेळी पुनर्वसू नक्षत्र होते. कुमाररूपात आपली प्रभा प्रकट करणाऱ्या, सिद्धजनांना ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या, ज्ञानसागरावतार धारण केलेल्या श्री दत्तात्रेयांना माझा नमस्कार असो
श्री क्षेत्र अक्कलकोट (प्रज्ञापुर/विद्यानगर)
आजच्या तिथीला दत्तात्रेयांचा सर्वांत लोकप्रिय अवतार म्हणजे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचा अवतार. जय जय स्वामी समर्थ या टीव्ही मलिकेमुळे तर स्वामी समर्थांची माहिती घराघरांत जावून पोहचली आहे. श्री दत्त नवरात्रोत्सवा निमित्त आज आपण श्रीक्षेत्र अक्कलकोटची महती जाणून घेणार आहोत. यापूर्वी अनेक वेळा अक्कलकोट येथे जाणे झाले असेल.’ जय जय स्वामी समर्थ’ या टीव्ही मालिके मुळे येथे येणारे भाविक विविध ठिकाणांची माहिती विचारतात. त्यामुळे या लेखांत अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सर्व प्रमुख स्थानांची थोडक्यात माहिती देत आहोत.
श्री स्वामी समर्थ : श्री दत्तात्रयांचे तिसरे अवतार
श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. आपल्या अवतार समाप्तीच्या वेळी श्रीनृसिंहसरस्वती श्रीशैल्य येथून कर्दळीवनामध्ये गेले. तेथे ते तपश्चर्येला बसले. मध्ये साडेतीनशे वर्षे गेली. त्यांच्याभोवती वारूळ तयार झाले. एकेदिवशी एक लाकूडतोड्या लाकूड तोडताना त्याचा घाव चुकला आणि तो वारुळावर पडला. त्या वारुळातून श्रीस्वामी समर्थ प्रकट झाले, असे सांगितले जाते.
तेथून स्वामींनी संपूर्ण देशात सर्वत्र भ्रमण केले. विविध ठिकाणी ते विविध नावांनी प्रसिद्ध होते. नंतर ते मंगळवेढय़ात आले. त्यानंतर ते अक्कलकोट या ठिकाणी आले आणि शेवटपर्यंत तेथेच होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्याभोवती गोळा झाले. त्यांचे बाह्य़ आचरण काही वेळा बालक भावाचे तर काही वेळा अतिशय रुद्र असे होते. त्यांनी अनेकांचा अहंकार दूर केला. अनेकांना सन्मार्गाला लावले. ज्याचा जसा अधिकार त्याप्रमाणे त्याच्यावर कृपा केली.
श्री वटवृक्ष मंदिर
अक्कलकोटची भूमी ही स्वामींच्या वास्तव्याने पुनीत झालेली आहे. सोलापूरहून स्वामी जे अक्कलकोटला आले ते शेवट पर्यंत तेथेच राहिले. अक्कलकोट हे मुख्यतः तालुक्याचे ठिकाण असून ते सोलापूर जिल्ह्यात आहे. समर्थ भक्त हे ठिकाण पवित्र आणि प्रासादिक मानतात. हजारो भक्तांच्या मनोकामना पूर्ण करणारे स्वामी आज हि येथे आहेत अशी भक्तांची पूर्ण श्रद्धा आहे. यापूर्वी अनेक वेळा अक्कलकोट येथे जाणे झाले असेल.’ जय जय स्वामी समर्थ’ या टीव्ही मालिके मुळे येथे येणारे भाविक विविध ठिकाणांची माहिती विचारतात. त्यामुळे अक्कलकोट येथील स्वामी समर्थांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सर्व प्रमुख स्थानांची थोडक्यात माहिती देत आहोत.
श्री वटवृक्ष मंदिर
अक्कलकोटचा विकास मुख्यत्वे करून या मंदिराचे व्यवस्थापनाने झाल्याचे दिसते. येथे एक भव्य स्वामी मंदिर आहे. त्यात मुख्यतः श्रीच्या पादुका, शिवलिंग, स्वामींच्या स्मृती वस्तु, प्रवचन हॉल छोटीशी निवास व्यवस्थाही आहे. स्वामींनी अनेक लीला याच परिसरात केलेल्या आहेत. या परिसरात वटवृक्षा खाली छोटयाशा मंदिरात स्वामींच्या पादुका आहेत. स्वामींचा त्यांचे जीवन कालात सर्वत्र वावर होता पण जास्त येथे व चोळप्पाचे मठात होता.
अनेक सिद्ध पुरुष त्याकाळी व नंतरही या ठिकाणी येऊन गेल्याने हे पावित्र्य वाढलेलेच आहे. वटवृक्ष मंदिरातही सकाळी अभिषेक, रुद्रापठण चालते. येथे अनेक जुने फोटो लावलेले आहेत. येथेच मारुती मंदिर, व शिव पिंड आहे. सातत्याने येथे भजन कीर्तनाचे व आध्यात्मिक प्रवचनेही चालतात. त्रिकाल आरती होते. जवळच संस्थानचे ऑफिस आहे.
ट्रस्ट मार्फत येथे मंदिरालगत भक्त निवासाची व्यवस्था आहे. तसेच गाणगापूर रस्त्याला अद्ययावत असे भक्तनिवास ५-६ इमारती स्वरूपात भक्तांच्या सेवेस हजर आहे. तेथे छोटेखानी उपहार गृह आहे. येथेच स्वामींचे कायमस्वरूपी संग्रहालय आहे यात स्वामींच्या जीवनदर्शन घडवणारे फोटो व वस्तू आहेत. त्यातील काही फोटो अचम्बीत करतात. येथेही स्वामींची एक मूर्ती आहे. येथे पार्किंग व राहण्याची उत्तम सोय आहे.
वटवृक्ष मंदिर
अक्कलकोटचे स्वामी वटवृक्ष मंदीरात पोचल्यावर श्रीस्वामी महाराजांची शांत मूर्ती पहिल्यावर भान विसरायला होत. माणसाचे अहंभाव आपसुक गळूनपडतात. स्वामी महाराजांकडे अशी कोणती जादू आहे ज्यामुळे शहरातून आलेली तरुणाई सुद्धा तासन् तास पारायणाला बसतात. रांगेत गोंगाट करणारी बच्चे कंपनीही गाभार्यात पोचल्यावर शांत होतात! खरच, स्वामी महाराजांनी अक्कलकोटला प्रकट होवून सर्वांचे आयुष्य उजळून टाकले आहे!
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”
स्वामी समर्थांचे, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे” हे वचन सुप्रसिद्ध आहे. स्वामींच्या काळात तर ते भक्तांना दिलासा दायक होतेच पण आजच्या काळातही त्यांच्या इतके स्पष्ट अभय कोणताही संत किंवा प्रत्यक्ष देवही देत नाही.
समाधी मठ
चोळप्पाचे निवासस्थान व नंतरचे समाधी स्थान हे बुधवार पेठेत आहे हा जुन्या वाड्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. जवळच स्वामींनी पुनर्जीवित केलेली विहीर, स्वयंभू गणपती, स्वामींचा दंड, पादुका या प्रासादिक वस्तू येथे दर्शनास उपलब्ध आहेत. दररोज सकाळी येथे पूजा, अभिषेक, लघुरुद्र, महापूजा इ. धार्मिक विधी भक्त अत्यंत श्रद्धेने करतांना दिसतात. अभिषेकानंतर समाधी वस्त्रांनी पुसून त्यास सोवळे व करवतकाठी उपरणे पांघरतात. समाधीवर स्वामींचा मुखवटा ठेऊन त्यावर फुलांची आरास करतात. हे दृश्य अतिशय नयन मनोहर असते. प्रदक्षणा करून नमस्कार करताना स्वामींच्या प्रत्यक्ष अस्तित्वाचा भास होतो हे मात्र नक्की. स्वामींच्या काळा पासूनच या वास्तूला महत्व आहे.
गुरू मंदिर
स्वामींच्याच काळात स्वामींनी बाळप्पाला माळ चरण पादुका व दंड देऊन त्यास स्वतंत्र मठ काढण्यास सांगितले. तोच बाळप्पा मठ किंवा गुरूमंदिर होय. या मंदिर परिसरात प्रवेश करताच पावित्र्य जाणवू लागते. येथेही मोफत भोजनप्रसादाची व्यवस्था आहे. प्रासादिक वस्तूंची स्पंदने सदभक्तांना जाणवतात. वटवृक्ष मंदिराचे जवळच अन्न छत्र आहे. येथे भक्तांसाठी दोन्ही वेळा भोजन प्रसादाची सोय आहे. भक्त येथे ऐछिक द्रव्य दान करून अन्नदानाचे पुण्य प्राप्त करू शकतात, किंवा देणगी देऊन वर्षातील एक दिवस अन्नदानाचे घेऊ शकतात. अक्कलकोट जवळच श्री गजानन महाराजांची शिवपुरी आहे. तेथील पुरोहित सकाळ संध्याकाळ अग्निहोत्र करतात. व त्याचा प्रसारही करतात. या स्थानास आंतरराष्ट्रीय महत्वही प्राप्त झालेले आहे.
भोसले राजघराण्याचे शस्त्रागार
अक्कलकोटचे आणखीन एक वैशिष्ठ म्हणजे भोसले राजघराण्याचे एक मोठे शास्त्रागार येथे प्रदर्शन स्वरूपात जतन करून ठेवले आहे. स्वामींचे एक भक्त राजेरायन यांचा एक मठही अक्कलकोट मध्ये आहे. येथील पादुकाही स्वामींनीच दिल्यात असे सांगितले जाते.
श्री स्वामी समर्थांच्या मठांविषयी
परब्रह्म श्रीस्वामी समर्थ महाराज इ. स. १८५६ मध्ये अक्कलकोट येथे प्रकट झाले. त्यावेळीइ. स. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धानंतर इंग्रजांच्या पाशवी गुलामगिरीखाली भारतीय जनता चिरडून गेली होती.अशाखडतर प्रसंगी श्रीस्वामी समर्थांनी बावीस वर्षांच्या वास्तव्यात (इ.स. १८५६ ते १८७८) लोकांचा गेलेला आत्मविश्र्वास परत आणून त्यांच्यामध्ये आध्यात्मिक पात्रता व आत्मविश्र्वास पुन्हा प्रस्थापित केला.
मठांचा उद्देश
दत्तसंप्रदायाची परंपरा अखंडित चालू ठेवण्यासाठी स्वामींनी अनेक शिष्य तयार केले. हिमालयात संचार करीत असताना देवलग्राम येथे व मोगलाईत राजुरी गावी त्यांनी मठस्थापना केली. प्रेमबुद्धी वाढावी, गुरुसेवा व्हावी, भजन, कीर्तन, प्रवचन चालू असावे, धर्मजागृती व्हावी आणि लोक सन्मार्गाला लागावेत हे मठाचे कार्य होय.
श्रीगुरुमंदिर – बाळप्पा महाराज मठ
धारवाड जिल्ह्यातील (कर्नाटकराज्य) श्रीमंत सराफ बाळप्पा वयाच्या ३० व्यावर्षी संसाराचा त्याग करून अक्कलकोटला गुरुशोधार्थ गेले. श्रींनीअनुग्रह देऊन आपल्या आत्मलिंग पादुका त्यांना देऊन मठ बांधण्याची आज्ञा केली यामठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती,स्वामी जयंती वगैरे उत्सव मोठ्या उत्साहाने पार पाडले जातात.
वटवृक्ष संस्थान मठ
श्रींनी अक्कलकोटच्या बावीस वर्षांच्या वास्तव्यात बराच काळ जेथे घालवला त्या वटवृक्षाखालीच श्रींचे शिष्य जोतिबा पांडे यांनी स्वतःचे घरदार, जमीन विकून मंदिर बांधले. श्रींच्या हयातीत जोतिबाने 15 वर्षेव समाधीनंतर 41 वर्षेअनन्यभावे सेवा केली. आजमंदिराच्या समोर सभागृहात श्रींची मूर्ती असून, त्यांचेशिष्य जोतिबा यांची उभी मूर्ती आहे.आता या मठाची व्यवस्था श्रीस्वामी समर्थ वटवृक्ष संस्थानामार्फत केली जाते. येणाऱ्याभाविकांस पूजा, नैवेद्य,अभिषेक तसेच राहण्याची, भोजनाचीव्यवस्था, खोल्यादेऊन या संस्थानामार्फत केली जाते. श्रीनेहमी म्हणत, “आमचे नाव नृसिंहभान – दत्तनगरमूळ’ त्यातील सर्व गोष्टी येथे परिपूर्ण आहेत. यामठात श्रींच्या जागृत पादुका असून मठात गुरुपौर्णिमा, दत्तजयंती, स्वामी पुण्यतिथी वगैरे उत्सव संपन्न होतात.
श्रीस्वामी समाधी मठ, बुधवार पेठ
पूर्व जन्मसुकृतामुळे श्रींनी ज्याच्या घरी बरीच वर्षे वास्तव्य केले त्या भक्त चोळप्पाच्या इच्छेप्रमाणे श्रीची समाधी या मठात आहे. चोळप्पाच्या घराजवळ समाधीमंदिर असून, त्यात श्रींनी दिलेल्या पादुका आहेत. अक्कलकोट संस्थानचे प्रशासक विंचूरकर श्वेतकुष्ठ झाल्यावर दर्शनास आले असता त्यांनी श्रींना हिऱ्याची अंगठी अर्पण केली. ती विकून चोळप्पाने या पैशातून मठ बांधला.
जोशीबुवांचा स्वामी मठ
अक्कलकोटचे प्रशासक चिंतोपंत टोळ हे रोज नियमाने श्रींच्या चरणी सहस्र तुलसीपत्र वाहत असत. यानियमात खंड पडू नये हे अंतर्ज्ञानी श्रींनी जाणून या पाटावर आपली पावले उमटविली. त्यांनी त्या पादुकांवर तुलसीपत्रे वाहून आयुष्यभर सेवा केली.
शंकरराव राजेरायन यांचा मठ
हैद्राबाद संस्थानातील गजांत लक्ष्मीचे जहागीरदार शंकरराव राजे रायन यांचा क्षय व ब्रह्मसमंध बाधा श्रींनी बरी केल्यावर त्यांनी श्रींच्या आज्ञेनुसार तीस हजार रुपये खर्चून हा श्रींच्या पादुकांचा हा मठ स्थापन केला. जुन्या राजवाड्याजवळ हा मठ आहे.
स्वामींच्या वास्तव्याने परमपावन झालेली अक्कलकोटातील आणखीन काही प्रासादिक स्थळे:
महाराजांच्या चर्मपादुका
समाधी मठच्या शेजारीच शिष्य चोळप्पा यांच्या घरात आजही महाराजांच्या चर्मपादुका आहेत. सुमारे १ फुट लांबीचे पाउल आहे.
हाक्याचा मारुती
स्वामींनी सत् शिष्य बाळाप्पा यांना नामजप करण्यास सांगितले ते हे मंदिर.तळघरत आजही जाता येते.
जंगमांचे शिव मंदिर
स्वामींनी शिवलींगावर शेणी रचून अग्नी पेटविला. जंगम चिडले व स्वामींना मारण्यास आले. ३ दिवस अग्नी पेटत होता. ३ दिवसा नंतर शिवलींगाला काहीही हानी न होता, ते अधिच तेजस्वी झाले.
मुरलीधर मंदिर
मुंबईहून स्वामी दर्शनास आलेले ‘स्वामीसुत’ ह्या मंदिरात स्वामींची वाट पहात बसले होते. गिरगावातील कांदेवाडी येथील मठ स्थापन करणारे तेच हे स्वामीसुत!
शेखनूर दर्गा
स्वामी कित्येकदा ह्या दर्ग्यावर येत. मन्नत मागण्याकरता आलेल्या कित्येकांना स्वामी सांगत की दर्ग्यावर चदर चढवा. तिथल्या फकीराना भोजन द्या.
मालोजीराजांचा किल्ला
महा दरवाजावर असलेल्या गणपतीच्या मुर्तीस सहज हात लाऊन स्वामी जात असत्. आपला हात उडी मारुन देखील पोचत नाही. येथे एक लहानसे शस्त्रास्त्रांचे संग्रहालयही आहे.
शिवपुरी
सुर्योदय आणि सुर्यास्त ह्या वेळी अग्निहोत्र कसे करावे? अग्निहोत्र म्हणहजे काय? इ. महत्वाची माहिती येथे सांगतात. सविस्तर माहिती आणि अग्निहोत्रात सहभाग घेण्याकरता शिवपुरी येथे सुर्यास्ताच्या साधारण १ तास आधी पोचावे.
श्रीमहारुद्ररावांची समाधी
मोगलाई प्रांतात जोगाई आंब्यानजीक केज गावचे श्रीमंत महारुद्रराव देशपांडे यांनी श्रींच्या आज्ञेनुसार घरासमोर उकिरड्यावर म्हणजे श्रीचोळाप्पा महाराजांचे वाड्यातील श्रीमहाराजांच्या समाधी मठासमोर,पादुका मठ स्थापन केला. श्रीस्वामींच्या लौकिक समाधी नंतरही श्रीस्वामींनी महारुद्ररावांना वचन दिल्याप्रमाणे त्यांच्या केज येथील घरी जाऊन सगुण दर्शन दिले, ही बाब श्रीस्वामीरायांच्या ‘हम गया नहीं, जिंदा है|” ह्या वचनाची साक्षच देतात!
अक्कलकोटला कसे जावे
अक्कलकोट हे सोलापूर पासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. सोलापूरहून अक्कलकोटसाठी नियमीत बससेवा आहे. इथे राहण्यासाठी भक्त-निवास आहे व अन्नक्षत्र मंडळातर्फे दुपारी १२ व रात्री ८ वाजता महाप्रसादाची सोय आहे.
संपर्क : श्री क्षेत्र अक्कलकोट मंदिर
वटवृक्षस्वामी महाराज ट्रस्ट, अक्कलकोट, जि. सोलापूर
फोन- (०२१८१) २२०३२१, भक्त निवास-२२१९०९.
संदर्भ : श्री अक्कलकोट स्वामी दर्शन व धार्मिक ग्रंथ