सामाजिक जाणवेचा आणि संवेदनशील मनाचा
हाडाचा शिक्षक
डॉ. नागनाथ कोत्तापल्ले
दुपारची साधारणत: दोनची वेळ.जेवण आटोपून मराठवाडा साहित्य परिषदेचा ‘प्रतिष्ठान’चा अंक वाचत बसलो होतो.टीव्हीच्या बातम्या ऐकत होतो.तेवढ्यात निवेदिका म्हणाली, “ सर्वांसाठी एक वाईट बातमी पुण्यातून आली आहे.मराठी साहित्यातील ज्येष्ठ समीक्षक, लेखक, औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू, चिपळूणच्या ८६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, प्रा. डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांचे नुकतेच पुण्याच्या दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन.टीव्हीवरील निवेदिका सांगत होती.ते ऐकताना हातातल्या पुस्तकाची पानं एकदम मिटली गेली. पुस्तकासारखी मनाची पानं एकदम मिटली गेली. आणि पुढच्याच क्षणी डोळे पान्हावले. टीव्हीच्या स्र्किनवर मोठ्या शब्दात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले काळाच्या पडद्या आड. अशी पट्टी हळूवार पुढे सरकत गेली. तस तसा भूतकाळ माझ्या समोर जागृत होऊन उभा राहत गेला.
रविवारी दि.२७ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे सुप्रसिध्द साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली एक दिवशीय साहित्य सम्मेलन संपन्न झाले.उद्घाटक म्हणून औरंगाबाद येथील ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ .सतीश बडवे उपस्थित होते. माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या संमेलनाच्या समारोपाच्या सत्रात डॉ. नागनाथ कोत्तापल्ले प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार होते. त्यांच्या हस्ते विविध क्षेत्रातील मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार होता. परंतु प्रकृती चांगली नसल्याने कोत्तापल्ले सर संमेलनाला अनुपस्थित राहिले होते. सूर्योदय साहित्य संमेलनात डॉ.कोत्तापल्ले सरांची भेट होणार या आनंदात मी होतो. संमेलन स्थळी पोहोचल्यावर कळले की सरांची तब्येत बरी नसल्याने सर येऊ शकले नाही. ती वार्ता पहिल्यांदा कानावर पडली. मी नाराज झालो.सरांना देण्यासाठी मी माझा नव्याने प्रकाशित झालेला ‘ स्त्री कुसाच्या कविता ’ काव्यसंग्रह सोबत आणला होता.खूप दिवसांनी सरांची भेट होणार होती. सरांच्या भेटीचा आनंद हा फार वेगळाच असतो.महाराष्ट्रातील नव्याने लिहू पाहणाऱ्या, ग्रामीण मातीवर, माणसांवर प्रेम करणाऱ्या लेखक, कवींसाठी सर म्हणजे एक ऊर्जा होती. एक प्रेरणा होती. सर म्हणजे आमच्या सारख्या नव्याने लिहिणाऱ्यांचं उर्जाकेंद्र होतं. प्रेरणास्थान होतं.
सरांची आणि माझी पहिली भेट पुणे विद्यापीठात झाली.साधारणपणे २००४ च्या सप्टेंबर महिन्यात मी पुणे येथे गेलो होतो. वेळ काढून कोत्तापल्ले सरांना भेटण्यासाठी प्रथमच गेलो होतो . महाविद्यालयात असताना सरांच्या कथा, कादंबऱ्या आणि कविता मी वाचून प्रभावीत झालो होतो. प्रत्यक्षात सरांना भेटण्याचा योग येत नव्हता. तो योग तेव्हा मात्र जुळून आला होता.विद्यापीठात जाण्यापूर्वी मी फोन करून चौकशी केली होती. मी गणेश खिंड परिसरातील पुणे विद्यापीठात पोहोचलो.यापूर्वी खुपदा विद्यापीठात आलो होतो. परंतु आज मात्र विद्यापीठाच्या मराठी विभाग विभागात खास करून कोत्तापल्ले सरांची भेट घेण्यासाठी आलो होतो.चौकशीअंती विद्यापीठाच्या मराठी विभागात पोहोचलो.भव्यदिव्य मराठी विभाग प्रथमच पाहत होतो. बी.ए. नंतर मनात होतं की मराठी एम.ए. विद्यापीठात करावं.परिस्थितीमुळे तसे योग नव्हते. पोर्चमधून जाताना रूमवर टांगलेल्या पाट्या वाचत होतो. पुढच्या दारावर डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, मराठी विभाग प्रमुख अशी पाटी लावलेली दिसली.
दरवाजा उघडाच होता. मी दरवाजातूनच सरांना म्हटले, “ आत येऊ सर..!”
“ अरे महाडिक या.तुमचीच वाट पाहत होतो. बरं पुण्यात कधी आलात ?”
“ सर आजच आलो. थोडं इतरत्र काम होतं. तत्पूर्वी आगोदर आपली भेट घेऊ. म्हणून आपणास फोन करून खात्री केली.”
“ ते बरं केलं.बऱ्याच वेळा कामानिमित्ताने बाहेर येणेजाणे चालू असतं.बरं काय घेणार ..? चहा की कॉफी ..?
“ सर ,चहा चालेल.”
“ अगोदर पाणी घ्या. बरं तुम्ही कुठून आलात ? म्हणजे तुम्ही कुठे राहतात ? काय करतात ?”
“ मी नाशिक जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत येथून आलो.”
“ अरे…! म्हणजे आमच्या प्राचार्य डॉ .पंडीतराव पवारांच्या गावाहून आलात.”
त्यानंतर मी माझा परिचय करून दिला. सरांनी अतिशय आदबीने प्राचार्य पवार सरांची आणि पाठोपाठ माझी चौकशी केली. मी माझा परिचय करून दिला.मी ग्रामीण भागात शिक्षक असल्याची जाणीव होताच ते म्हणाले,
“ ग्रामीण भागातील मुलांना समजून घेत चला. त्यांच्या अडीअडचणी समजून घेत चला. त्यांच्यामध्ये खूप ऊर्जा आहे; पण ते फार बुजरे असतात. आत्मविश्वासाचा मोठा अभाव असतो त्यांच्याकडे .देता आली तर त्यांना प्रेरणा द्या. आत्मविश्वास द्या.”
पहिल्या भेटीतले कोत्तापल्ले सरांचे हे उद्गार माझ्यातल्या शिक्षकाला एक नवी दिशा, एक नवी उर्मी देऊन गेले.
“ काही लेखन वगैरे करता का ?” सरांचा पुढचा प्रश्न.
मी “ हो ” म्हणालो.
“काय लिहिता ?” सरांचा पुढचा प्रश्न
“ कविता लिहितो.”
“ बर कुठे कुठे कविता प्रकाशित झाल्या ?”
मी अनुष्टुभ आणि इतर काही मासिकांची नावे सांगितले.
“ वा …! चांगले लिहीत असाल तुम्ही ”.
असे म्हणेपर्यंत मी माझ्या हातातल्या बॅगमधून नुकत्याच प्रकाशित झालेल्या ‘कुणब्याची कविता’ या काव्यसंग्रहाची एक प्रत बाहेर काढली . पहिल्या पानावर सरांचे नाव टाकून त्यांना सप्रेम भेट म्हणून मी स्वाक्षरी केली. माझी स्वाक्षरी बघून सर म्हणाले,”महाडिक आपली स्वाक्षरी फारच अप्रतिम आहे.म्हणजे कवितांबद्दल विचारायलाच नको.”
असं सहजपणे सर बोलून गेले. मी विनम्र भावनेने त्यांच्या हातात पुस्तक ठेवलं. माझ्या कौतुकाने मी भारावून गेलो होतो.मी विनम्र भावनेने खाली वाकलो. त्यांच्या पायाचा स्पर्श घेतला. सरांनी दोन्ही हात माझ्या खांद्यावर ठेवले. मला उभं करून म्हणाले,
“ कुणब्याची कविता म्हणजे तुम्ही स्वतः शेतकरी आहात ? खेड्यापाड्यातली शेतकऱ्यांची मुलं इथल्या जगण्याचा शोध कथा, कवितेतून घेत घेत आहेत.ही खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे. याचा आनंद वाटतो आहे. शिक्षणाचं वारं जोपर्यंत ग्रामीण भागात नव्हतं तोपर्यंत त्यांचं खरं जीवन साहित्यात आलं नाही. शिक्षणाच्या अभावी अनेक कला त्यांच्यापासून दूर होत्या. शिक्षणाच्या परीस स्पर्शाने लेखन कलेला ऊर्जितावस्था आली. कुठं तरी कल्पनेचा विपर्यास करीत लिहिलं गेलेलं ग्रामीण मागं पडलं आहे. बांधा-मेरावर वावरत असलेली शिक्षित तरुणांची पिढी अतिशय सामर्थ्यानं लिहिताना दिसत आहेत.तिथला वासा आणि वारसा घेऊन त्या मातीतला लेखक, कवी पुढे येतो आहे. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.”
सर बोलत होते. मी ऐकत होतो. आता खऱ्या अर्थानं मराठी ग्रामीण साहित्य सकस होतय. ग्रामीण साहित्यातल्या अनेक गोष्टी साहित्याच्या स्पर्शापासून दूर होत्या.आता ते सारं साहित्यामध्ये येत आहे. “ तुमच्या सारखी नवीन पिढीतली मुलं अतिशय ताकदीनं लिहित आहेत. आपल्या काव्यसंग्रहाचे ‘कुणब्याची कविता’ हे शीर्षक ऐकूनच मी प्रभावित झालो. शीर्षकाने कविता संग्रहातील कवितांचे अंतररंग लगेच वाचकांच्या ध्यानात येतं. हे तुम्ही फार बरं केलं.म्हणजे काव्यसंग्रहामध्ये सगळे शेतीमातीचं सुखदुःखं असणार. याबद्दल माझ्या मनात शंका नाही. आपल्या कविता वाचायला मला नक्की आवडेल.मी नक्की कविता वाचेन आणि तुम्हाला कळवेन . पण लिहित रहा. जे वाटतं ते मांडत रहा. स्वतःशी बोलत रहा. चिंतन करा. म्हणजे चांगल्या पद्धतीने तुम्ही लिहित राहाल. जे मराठी साहित्यात अजूनही आलं नाही असं ग्रामीण जीवन कथेतून, कवितेतून, कादंबरीतून आलं पाहिजे.”
सरांनी बोलता-बोलता अनेक सूचना केल्या. मार्गदर्शन केलं. आणि भरभरून माझं आणि माझ्या कवितेचं कौतुक केलं.माझा काव्यसंग्रह चाळताना पहिल्या दुसऱ्या कवितेवर सरांचं लक्ष स्थिरावलं. “ अरे वा…! काय सुंदर लिहिलं.हे मराठी साहित्यामध्ये येणे गरजेचे आहे. तुमच्या कवितेतून ते दिसत आहेत. हाच पोत आणि पदर सातत्यानं लिहिण्याचा प्रयत्न चालू ठेवा. त्या ओळी होत्या,
‘चोहोबाजूंनी अंगावर येणारी सनातनी वादळं
आणि हाडामाशी खिळलेल्या दारिद्र्याच्या झळा
यातून आयुष्य पिळवटून निघताना
धूळपाटीनेच लावला अक्षरांची लळा
पुढे पुढे तर कुणब्याचा वसा चालवताना
माती बरोबर अक्षरांचा दास झालो
आणि तळहातावरच्या जखमा कागदावर पुसता पुसता
मीच कवितेचा बाप झालो.’
कविता वाचताना सर अचानक अस्वस्थ होताना दिसले. माझा हात हातात घेऊन म्हणाले,
“ लक्ष्मण…! काय सुंदर लिहितोस तू . असाच सर्वसामान्यांच्या जगण्याचा पीळ आणि वेदनेची संवेदना अशीच येत राहू दे. मला वाटतं तुझी ‘कुणब्याची कविता’ वाचकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस पडेल. तिथल्या भोवतालातल्या माणसांच्या व्यथा, वेदना, त्याचं जगणं तुमची कविता घेऊन येते. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे.”
तेवढ्यात चहा आला. आम्ही दोघांनी चहा घेतला. मला निघण्याची घाई होती.मी कोत्तापल्ले सरांचा निरोप घेतला.
“ सर,येतो मी ”
सर म्हणाले, “ थांबा…!” कपाटातून त्यांनी त्यांच्या ‘ मूड्स ’ काव्यसंग्रहाची एक प्रत माझ्या हातावर ठेवली.पुस्तक स्वीकारीत मी सरांचा निरोप घेतला. सर खुर्चीतून उठून दारापर्यंत आले. पुन्हा एकदा अतिशय आपुलकीने माझ्या खांद्यावर हात ठेवला. “लिहित रहा… केव्हा वाटलं तर फोन करा. हा नंबर असू द्या तुमच्याजवळ.” इतक्या आदबीनं पहिल्या भेटीतच आपलंसं करणारे डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सर यांनी माझ्या मनात आदराचं स्थान मिळवलं. सरांच्या पहिल्या भेटीने मनात अतिशय आपुलकी आणि जिव्हाळा निर्माण केला. पुढे कधीतरी फोनवर चर्चा होत. अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या निमित्ताने गाठीभेटी होत. माझ्या ‘कुणब्याची कविता’ काव्यसंग्रह वाचून सरांनी अभिप्राय पाठवला.तो वाचताना माझ्या अंगावर मुठभर मांस चढलं असावं.
काही निमित्ताने मी पिंपळगाव महाविद्यालयामध्ये डॉक्टर पंडितराव पवार यांना भेटायला गेलो होतो. योगायोगाने काही क्षणातच कोत्तापल्ले सरांची गाडी आली. सर तेव्हा औरंगाबाद मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू होते. सर प्राचार्य डॉ . पंडीतराव पवार यांना भेटण्यासाठी आले होते. डॉ.पंडितराव पवार हे सरांचे चांगले साहित्यिक मित्र होते. मराठी साहित्याचे दोन्ही अभ्यासक ,लेखक आणि समीक्षक असल्याने त्यांचा परिचय होता.आम्ही प्राचार्य पवारांच्या कॅबिनमध्ये होते. तेवढ्यात कोत्तापल्ले सरांची गाडी आत आली. प्राचार्य पंडीतराव पवार मला म्हणाले, “ चला महाडिक कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले आलेत. आपण त्यांचे स्वागत करूया.”आम्ही महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराशी पोहोचलो. डॉ. पवारांनी सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्या क्षणीप्राचार्य पवारांनी माझी ओळख कोत्तापल्ले सरांशी करून दिली. डॉ.कोत्तापल्ले सरांनी क्षणाचा विलंब न लावता “ अरे कुणब्याची कविता लिहिणारा कवी लक्ष्मण महाडिक. मी त्यांना ओळखतो. त्यांची आणि माझी भेट एकदाच पुणे विद्यापीठात झाली. त्यांच्या कुणब्याच्या कविता मला मधूनमधून खुणावत असतात. काय सुंदर लिहिलंय. ग्रामीण वास्तवाला, तिथल्या जगण्याला, अतिशय सुंदर प्रतीकातून आणि प्रतिमा- रूपकातून कवितेत मांडलं आहे. त्यामुळे त्यांचा मला अभिमान वाटतो. आणि आज पुन्हा दुसऱ्यांदा भेट होते. हा एक योगायोग आहे.”
आम्ही प्राचार्य पवारांच्या कॅबिंमध्ये बसलो. चहापाणी घेताना पुन्हा साहित्याच्या गप्पागोष्टी सुरु झाल्या. सरांनी माझ्या कवितेबद्दल पवार सरांशी चर्चा केली. पवार भरभरून बोलले. कोत्तापल्ले सरांना पुढच्या दौऱ्यावर जाणे गरजेचे होते. म्हणून त्यांनी काही वेळाने प्रस्थान केले. मी ही पवार सरांना निरोप घेतला. अशी दुसरी भेट अगंतुक झालेली. पुढे सर भेटत राहिले. औरंगाबादच्या देवगिरी महाविद्यालयामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने निमंत्रित कवींमध्ये माझी निवड झाली. त्या निमित्ताने औरंगाबादला जाणे झाले. तीन दिवसाच्या त्या वास्तव्यात दोन-तीन वेळा सरांची भेट झाली. वेगळ्या विषयाच्या अनुषंगाने चर्चा झाल्या. डॉ. कोत्तापल्ले सरांमधला एक संवेदनाशील माणूस, सामाजिक भान असलेला साहितत्यिक, आणि विद्यार्थी प्रिय शिक्षक ही तिन्ही रूपं मला अनुभवायला मिळाली होती. त्यामुळे सर मनात आयुष्यभर घर करून राहिले.
मध्यंतरी नांदगाव येथे आमचे स्नेही अनिल सोनवणे यांच्याकडे काही निमित्ताने जाण्याचा योग आला. बोलता बोलता त्यांनी कोत्तापल्ले सरांचा विषय काढला.अनिल आणि मी एकाच गावचे. अगदीच शेजारी राहत होतो.घराशेजारी घरं आणि शेता शेजारी शेतं. त्यावेळी तो एकदम बोलून गेला की कोत्तापल्ले सरांच्या मुलाला नंदुरबारच्या नात्यातली मुलगी सून म्हणून दिली आहे. मुखेड नांदेड ते नाशिक नांदगाव हे शेकडो मैलाचं अंतर काही क्षणात कमी झालं. कोत्तापल्ले सर, त्यांचा मुलगा हा नात्यातला एक सुंदर धागा झाला. २७ नोव्हेंबरच्या नाशिकच्या सूर्योदय साहित्य संमेलनाला कोत्तापल्ले सर येणार आहेत. सरांना भेटायचं आणि हा नवा परिचय आणि नात्याची जाणीव करून द्यायची. या जाणिवेनेच मी सूर्योदय साहित्य संमेलनाला नाशिकला पोहोचलो होतो. परंतु सरांची तब्येत बिघडल्यामुळे ते नाशिकला येऊ शकले नाही. मधी दोन-तीन दिवस गेले. आणि काल दूरदर्शनवर दुपारी सरांचे निधनाची बातमी झळकली. क्षणभर डोळ्यासमोर अंधारून आले. अतिशय नितळ आणि निर्मळ मनाचा माणूस, लढणाऱ्या आणि घडणाऱ्या मुलांचा खऱ्या अर्थाने पालक, पाठीवरती हात ठेवून लढ म्हणत धीर आणि आधार देणारा अवलिया शिक्षक,मराठी साहित्यातला एक बाप माणूस, कवी ,समीक्षा, कादंबरीकार, कथाकार अचानक काळाच्या पडद्याआड गेला. कोत्तापल्ले सर आता आपल्यात राहिले नाही.
मन हे स्वीकारायला तयार नाहीत. दुपारी पावणे दोनच्या दरम्यान डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सरांची जीवन ज्योत मावळली. त्यांनी पंच्याहत्तरव्या वर्षात पदार्पण केले होते. परंतु ध्यानीमनी नसताना सरांचे असे अचानक जाणे, त्यांच्या हजारो लाखो विद्यार्थ्यांना, साहित्यिकांना पोरके करून गेले. तेवढे मात्र नक्की. सरांनी सातत्याने नवोदितांना प्रेरणा ,प्रोत्साहन दिले. लिहिते व्हा. असे आपुलकीने सांगत आले . असे मराठी साहित्यातील, ग्रामीण मातीतील, सामाजिक जाणवेचा संवेदनशील मनाचा, एक साहित्यिक काळाच्या पडद्याआड गेला. तरी सर त्यांच्या साहित्यातून, त्यांच्या कथा, कादंबरीतून, त्यांच्या कवितेतून हाकेच्या अंतरावर उभे असतील. आणि सर्वांना सांगत राहतील, “ संघर्ष करा … उभे रहा…! इतरांचा आधार व्हा. इतरांना आनंद देत देत तुम्ही आनंदी व्हा.” इतकी सहृदयता सरांच्या व्यक्तिमत्वामध्ये होती. त्या सहृदयतेला आता आम्ही पारखे झालो. हे सत्य मात्र नाकारून चालणार नाही.
Special Article Dr Nagnath Kotapalle by Poet Laxman Mahadik