रविवार, सप्टेंबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

ब्रह्मगिरी प्रदक्षिणा कधी करावी? तिचे महत्त्व काय? सोबत काय घ्यायचे? जाणून घ्या सविस्तर….

by Gautam Sancheti
ऑगस्ट 6, 2022 | 9:40 pm
in इतर
0
IMG 9722

श्रावण महिन्यातील त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा

श्रावण महिना लागला की, असंख्य शिवभक्तांना ओढ लागते ती ब्रम्हगिरीच्या प्रदक्षिणेची. गेली दोन वर्ष कोविडमुळे बंद असलेली ही प्रदक्षिणा यावर्षी खुली होते आहे. त्यामुळेच यावर्षीचे आकर्षण नेहमीपेक्षा थोडे जास्त रहाणार आहे यात शंका नाही. ही प्रदक्षिणा कशी करावी, कधी करावी, तिचे महत्त्व काय, सोबत काय काय घ्यावे, प्रदक्षिणा करताना मार्गावर काय टाळावे आदींविषयी सांगत आहेत ज्येष्ठ लेखक जगदीश देवरे

अलिकडच्या काळात याला “फेरी” हा शब्द जास्त प्रचलित झाल्याचे दिसून येते परंतु, धर्मशास्त्रानुसार खरेतर ही प्रदक्षिणाच, कारण यात ब्रम्हगिरीच्या संपुर्ण डोंगराला प्रदक्षिणा घातली जाते. जे लोक अनेक वर्षांपासून या प्रदक्षिणेला जातात ते असे म्हणतात की, आता यात पुर्वीसारखी मजा राहिलेली नाही कारण आता बहुतांश मार्गावर डांबरी रस्ता तयार झालाय. त्यांच्या या म्हणण्यात अर्थ आहे. तुलनेने या प्रदक्षिणेची लोकप्रियता देखील कमी होवू लागली आहे.

पुर्वी या प्रदक्षिणेचा निश्चीत असा रस्ता ठरलेला नसल्याने शेतातून मिळेल तो रस्ता काढीत भाविक हा प्रवास पुर्ण करायचे. जंगल आणि भातशेतीतून वाट सापडेल तशी होणारी प्रदक्षिणा आता केवळ ‘सिंमेंटच्या रस्त्याने चालणे’ इतकीच मर्यादित झाली आहे. भातशेतीतला गुडघाभर चिखल तुडवत हा प्रवास पुर्ण व्हायचा, काट्याकुट्यांमुळे पायाला जखमाही व्हायच्या. प्रदक्षिणा संपवून नाशिकच्या सी.बी.एस. स्थानकावर बसमधून लोकांचा जथ्था उतरला की, त्यातले अर्धेअधिक लंगडत लंगडत घरी जायचे. पण आता तसे चित्र फारसे दिसत नाही. चिखल माती तुडवत चालण्याची मजा थोडी कमी झाली आहे.

फेरीमागचे अध्यात्‍म्‍य
असे सांगितले जाते की, श्री संत निवृत्तीनाथ महाराजांना याच ब्रम्‍हगिरी प्रदक्षिणेच्या दरम्यान संत गहिनीनाथांचा अनुग्रह लाभला व त्यावेळी भागवत धर्माची स्थापना झाली. ब्रम्‍हगिरीची प्रदक्षिणा ही त्या पुराणकाळापासून प्रचलीत आहे. प्रदक्षिणा मार्गावर अनेक तीर्थ लागतात जसे की, प्रयाग तीर्थ, सरस्वती तीर्थ, नागातीर्थ, रामतीर्थ, वैतरणा-बाणगंगा निर्मल तीर्थ, बानगंगा-धवलगंगा पद्मतीर्थ, नरसींह तीर्थ, बिल्वतीर्थ इ. कालपरत्‍वे काही तीर्थ आज दृष्टीस येत नाहीत व मार्ग बदलला गेल्यामुळे काही तीर्थ आणि मंदिरे भाविकांच्या वाटेत लागतही नाहीत. पेगलवाडी मार्गे पुढे गेल्‍यानंतर पहिने आणि पुढे मग गौतम ॠषींचे मंदीर असलेला एक डोंगर पार करावा लागतो. प्रदक्षिणे दरम्यान गौतमाची टेकडी उतरल्यानंतर तिथे नमस्काराचे एक ठिकाण लागते.

पंचमुखी शिवस्वरूप ब्रम्‍हगिरीस पुर्वाभिमुख उभे राहून साष्टांग नमस्कार घालावा, अशी एक ख्‍याती आहे. या फेरीतला हा पडाव पुर्वी थोडा खडतर होता परंतु, आता तो देखील सोप्‍पा झालाय. अगदी नजिकच्या काळात या डोंगरावरून खाली उतरण्यासाठी पायरी मार्ग होता परंतु डोगंरावर येतांना दगड मातीतून या डाेंगरावर यावे लागायचे. आता मात्र २३० पायरी असलेला एक प्रशस्त मार्ग इथे बांधण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रदक्षिणा मार्गात आता एक वेगळा आनंदा देणारा अडथळा राहीलेला नाही. हा डोंगर पार करून तुम्‍ही पलिकडे उतरलात की तुमचा अर्धा प्रवास संपतो. त्‍यानंतर तुमच्‍या उजव्‍या हाताला महाकाय ब्रम्‍हगिरी आणि डाव्‍या हाताला पाण्‍यात वाढलेली हिरवीगार भातशेती यामधून प्रदक्षिणेचा प्रवास सुरू होतो.

ही प्रदक्षिणा कधी करावी, या विषयावर देखील अनेक तर्क सांगितले जातात. परंतु, धर्मशास्त्रानुसार श्रावणातल्या सोमवारी व त्यातल्या त्यात तिसऱ्या सोमवारी ही प्रदक्षिणा करावी अशीच परंपरा इथे प्रचलीत आहे. तिस-या सोमवारी केल्या जाण्या-या प्रदक्षिणेला प्रचंड गर्दी असते. श्रावणाच्‍या तिस-या सोमवारची प्रदक्षिणा रविवारी संध्‍याकाळपासूनच सुरू होते. काही उत्‍साही भाविक आठ वाजेपासूनच रात्रफेरीचा आनंद घेतात. ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’च्‍या गजरात या फेरीचा शिण जाणवत नाही, असे जाणकार सांगतात.

ब्रम्‍हगिरी प्रदक्षिणेचे तीन मार्ग, किंबहूना तीन प्रकार आहेत. मात्र यातली अंतराने छोटी असलेली प्रदक्षिणा हीच सर्वाधिक प्रचलित आहे. वर उल्लेख केलेल्या मार्गाने जाणारी ही प्रदक्षिणा साधारणपणे २० ते २१ कि.मी. अंतराची आहे. दुसरी प्रदक्षिणेला मोठी प्रदक्षिणा म्हणतात. ही सर्वसाधारणपणे ३५ ते ३८ किं.मी. अंतराची असते. हरिहर-ब्रम्‍हगिरी प्रदक्षिणा या नावाने देखील हा मार्ग ओळखला जातो. तिसरा मार्ग हा सर्वसाधारण पणे ६० कि.मी. चा अाहे, व तो अंजनेरी पर्वताला प्रदक्षिणा घेवून पुढे येतो.

पंरतु, छोटी प्रदक्षिणा ही किमान ६-७ तासात अगदी आरामात पुर्ण करता येत असल्याने भाविक या प्रदक्षिणेलाच जास्त महत्व देतात. सुर्योदयापूर्वी दोन तास आधी तिर्थराज कुशावर्तावर स्नान करून आणि नंतर श्री ञ्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन प्रदक्षिणेला मार्गक्रमण करतात. ही वेळ आदर्श मानली जाते कारण त्यानंतर सुर्योदय होतांना नाशिक मार्गावर स्थित असलेल्‍या प्रयागतिर्थास वळसा घालून पेगलवाडी आणि पुढे पहिनेमार्गे सृष्टीसौंदर्याचा आणि सुर्यादयाचा आस्वाद घेत पुढे जाण्याचा आनंद मिळतो. ब्रम्‍हगिरी पर्वतावर गोदावरी नदीचा उगम आहे आणि त्याचमुळे या महाकाय पर्वताची ही प्रदक्षिणा तितकीच महाकाय आहे.

निसर्गाचा आनंद देणारी यात्रा
श्रावणात केल्‍या जाणा-या या प्रदक्षिणेच्या मागे जसे एक अध्यात्म आहे तशीच निसर्गाची एक अनुभूती देखील आहे. निसर्गाचा निरागस आणि स्वच्छ चेहरा इथे पावलोपावली बघायला मिळतो. बहुतांश वेळेला दुतर्फा असलेले डोंगर अर्धेअधिक धुक्यांनी झाकलेलेच असतात. क्षणभरासाठी हे धुके बाजुला सरते आणि मग नव्या नवरीने तिच्या डोक्यावरचा पदर हळूच दुर सारून तिचे मुखदर्शन घडवावे तसा या डोंगराचा उजळलेला माथा तुम्हाला बघायला मिळतो. नाट्यगृहात जावून नाटक बघतांना, रंगमंचावर नेपथ्यकाराने विशीष्ट ठिकाणी अधून मधून प्रकाशझोत टाकावा तसा दुरवर कुठेतरी सुर्यप्रकाशाचा फोकस देखील अधूनमधून बघायला मिळतो.

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे…
बालकवींच्या कवितेतला हाच ‘श्रावण’ तुम्ही पायी चालत असतांना तुमच्या पासून काही अंतरावर पडत असलेल्या पावसातून इथे नक्कीच अनुभवता येतो. आपण उभे आहोत आणि पाऊस आपल्या दिशेने येतोय…..नंतर पुढच्याच काही क्षणात तुमच्या अवतीभोवती देखील पाऊस पडतोय हा अनुभव तुम्ही कधीच घेतलेला नसेल तर तो योग तुम्हाला या प्रदक्षिणेत घेता येईल. जवळ येत जाणारा टपटप आवाज, अंगात शिरणारा गारवा, अवघ्या काही अंतरावर पडत असलेला पाऊस आणि नंतर तुम्हीच त्या पावसाखाली भिजणं ही प्रक्रिया जितकी पटकन होते तितकीच त्यानंतर होणारी पावसाची उघडीप आणि मग सुरू रहाणारा ऊन – पावसाचा खेळ परमोच्च आनंद देवून जातो.

इथल्‍या डोंगरावरच्या अंगाखांद्यावर उसळी घेत छोटया छोटया खळीतून जमिनीच्‍या दिशेने येणारी धबधब्यांची रांग म्हणजे जणूकाही एखाद्या सौंदर्यवतीच्या अंगावर घातलेले दागिनेच. याच धबधब्यातून पुढे तुमच्यासोबत जमिनीवर वाहत पुढे जाणारे ओहोळ हे एखाद्या कथ्थक करणा-या नर्तकीच्या पायातल्या घुगंरासारखे सतत वाजत असतात आणि त्या संगिताच्या सानिध्यात तुमचे पाय नकळतपणे मैलाचा एक एक दगड कसा मागे टाकत जातात हे तुम्हाला समजतही नाही. भात, नागली, खुरसणी, वरई या पिकांची शेती. त्या शेतीत घोंगडीच्या मदतीने पावसाचेही आव्हान परतवून लावणारे कष्टकरी शेतक-यांचे कुटूंब, हा प्रवास या सगळया गोड वातावरणात कधी संपतो हे समजतही नाही.

हे सोबत घ्या
छोट्या प्रदक्षिणेत सर्वसाधारणपणे २०-२१ कि.मी. चा पायी प्रवास करावा लागतो. शक्यतो श्रावणातल्या एखाद्या सोमवारी तुम्ही निघणार असाल तर ब-यापैकी गर्दी असल्यामुळे रस्त्यात चहा आणि नाष्त्याची स्थानिक ग्रामस्थांनी लावलेली तात्पुरती दुकाने इथे मिळतात. लिंबाचे सरबत, पिण्याच्या पाण्याची बाटल्या मिळतात. काही ठिकाणी गरम भजी अाणि वडे देखील खायला मिळतात. त्यामुळे फेरीसाठी निघतांना खाण्यापिण्याची व्यवस्था सोबत नेलीच नसेल तर फारसं काही बिघडत नाही. परंतु, सोमवार सोडून इतर दिवशी तुम्ही जाणार असाल तर मात्र खाण्यापिण्याची थोडीफार व्यवस्था सोबत ठेवलेलीच बरी.

याखेरीज, रस्त्यात तुम्हाला पावसाच्या सरी हमखास लागणार असल्याने प्रदक्षिणेला निघतांना अगदीच हलक्या वजनाचा रेनकोट, टोपी, मोबाईलची काळजी घेणारे कव्हर, फार तर फार पाठीवर हलक्या वजनाची बॅक सॅग सोबत असेल तर पुरे. छत्रीचा मात्र काहीही उपयोग होत नाही. त्र्यंबकेश्वर मधून फेरीला सुरूवात करण्यापुर्वी मंदीराजवळ स्थानिक दुकानात प्लास्टीक कापडाचे घोंगडे देखील विकत मिळतात. शिवाय प्रदक्षिणा मार्गावर पायी चालत असतांना वयोमानानुसार थोडाफार त्रास जाणवला तर आधार म्हणून लाकडाच्या काठया देखील विकत मिळतात.

तुमचा डीएसएलआर कॅमेरा सोबत न्यायचा असेल तर पावसापासून त्याचा बचाव करता येईल याची आधीपासूनच व्‍यवस्‍था करून ठेवा. संपुर्ण पावसाळी वातावरण असेल, तर तुमचा कॅमेरा त्या दर्जाचा असल्याशिवाय तुम्हाला फोटोग्राफीचा आनंद घेता येणार नाही. शास्त्रानुसार ही प्रदक्षिणा अणवानीच करावी असे शास्त्र सांगते. बाहेरगावाहून येणार असाल तर रेल्‍वेने तुम्‍हाला नाशिकरोड रेल्‍वे स्‍थानकावर उतरावे लागेल.नंतर तिथून तुम्‍ही नाशिक शहरात बस किंवा रिक्षा व्दारे सी.बी.एस. बसस्थानकावर आल्यास तिथूनच तुम्‍हाला खास फेरीसाठी सोडण्‍यात येणा-या एस.टी. बसेस देखील मिळू शकतील.

हे करू नका
भाविकांबरोबरच इथल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी काही निसर्गप्रेमी देखील सहकुटूंब येतात आणि त्याचबरोबर रस्त्यात नशापाणी करून धांगडधिंगा घालणारे काही हौशी तरूण देखील येतात. अर्थात, हे दुदैव असले तरी ते सत्य आहे व त्याकडे डोळेझाक करीत तुम्हाला फेरी पुर्ण करावी लागते. ही फेरी पुर्ण करतांना तुमच्याकडून इथल्या निसर्गाला कुठलीही बाधा पोहोचणार नाही याची मात्र काळजी घ्या. प्लास्टीक बॉटल, पिशव्या किंवा प्लास्टीक कागद इथेच टाकून पुढे जावू नका. ते वेस्‍टेज तुमच्‍या बॅगेत घालून पुढे न्‍या. चालत असतांना सहज टाईमपास म्हणून रस्त्यावरच्या झाडांना उगाच जखमी करू नका.

शेतक-याने लावलेले पिक तुमच्या पायदळी तुडवले जाणार नाही याची प्रकर्षाने काळजी घ्या. स्थानिकांची काही लहान मुलं तुमच्यासमोर येवून पैसे मागतांना तुम्हाला रस्त्यावर भेटतील. त्यांच्याकडे तुच्छतेच्या भावनेने बघू नका. त्यांना काहीतरी देण्याच्‍या पुर्वतयारीने जा. त्यांच्या हातावर पैसे ठेवा असे मी म्हणणार नाही, पण मग शालेय वस्तु, खाद्यपदार्थ असे काही सोबत नेता आल्यास नक्की न्या आणि त्यांना त्या वस्तू देतांना, त्या बदल्यात त्यांच्या चेह-यावरचा निरागस आनंद नक्कीच अनुभवून बघा.

Special Article Brahmagiri Pradakshina by Jagdish Deore

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक – व्दारका येथील आग दीड तासाने आटोक्यात; चार घरे जळून खाक

Next Post

इंडिया दर्पण – हास्य षटकार – युवती भगवान शंकराची पुजा करते तेव्हा

Gautam Sancheti

संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.

Related Posts

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

या व्यक्तींनी वाहने सावकाश चालवावी, जाणून घ्या, सोमवार, १५ सप्टेंबरचे राशिभविष्य

सप्टेंबर 14, 2025
Untitled 18
महत्त्वाच्या बातम्या

मुंबईत २८ कंटेनरमध्ये असलेला ८०० मेट्रिक टन पाकिस्तानी माल जप्त; दोघांना अटक

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
संमिश्र वार्ता

महाराष्ट्रात नाफेडकडून कांद्याची मोठ्या प्रमाणावर विक्री…नाफेडने दिले हे स्पष्टीकरण

सप्टेंबर 14, 2025
rain1
संमिश्र वार्ता

नाशिकसह या जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’; नागरिकांनी घ्यावी विशेष दक्षता

सप्टेंबर 14, 2025
प्रातिनिधिक फोटो
संमिश्र वार्ता

नाशिक रोड रेल्वे स्थानकातील होल्डिंग एरियाच्या कामांना मंजुरी…गर्दी व्यवस्थापनात होणार फायदा

सप्टेंबर 14, 2025
Screenshot 20250914 163749 Collage Maker GridArt
इतर

मविप्रच्या वार्षिक सभेत खासगी विद्यापीठाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा (बघा व्हिडिओ)

सप्टेंबर 14, 2025
i4tUkRbQ 400x400
मुख्य बातमी

सातारा येथे होणा-या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पानिपतकार विश्वास पाटील यांची निवड

सप्टेंबर 14, 2025
kanda 11
स्थानिक बातम्या

सत्ताधारी पायदळी तुडवतात तर विरोधक शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळतात….कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा आरोप

सप्टेंबर 14, 2025
Next Post
joke

इंडिया दर्पण - हास्य षटकार - युवती भगवान शंकराची पुजा करते तेव्हा

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011