श्रीअरविंद जन्मोत्सव लेखमालाः
क्रांतिकारक श्रीअरविंद घोष ते महायोगी श्रीअरविंद-२०ः
योगगुरू लेले यांची भेट
निर्विचार अवस्था
(महाराष्ट्रातील योगगुरू श्री. विष्णु भास्कर लेले यांच्याशी आपली भेट कशी झाली हे श्रीअरविंद घोष ह्यांच्या शब्दात…)
“मी सुरत काँग्रेसची परिषद आटोपून जेव्हा बडोद्याला आलो तेव्हा, बारीन्द्रने मला लिहिले की बडोद्यात तो माझी, त्याला माहीत असलेल्या एका योग्यांशी गाठ घालून देईल. बारीन्द्रने बडोद्याहून श्री. लेले यांना तार केली आणि ते आले. तेव्हा मी श्री. खासेराव जाधव यांच्या घरी राहत असे. आम्ही सरदार मुजुमदार यांच्या वाड्यात गेलो. तेथे सर्वात वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत आम्ही तीन दिवस खोली बंद करून बसलो होतो. त्यांनी मला सांगितले की, मनात बाहेरून जे विचार येतात ते फेकून द्यावयाचे, दुसरे काहीच करायचे नाही. आणि मला ते तीन दिवसात साध्य झाले. आम्ही एकत्र ध्यानाला बसलो, मला शांत ब्रह्मचेतनेचा (Silent Brahman Consciousness) साक्षात्कार झाला. तेव्हापासून मी मेंदूच्या वर असलेल्या प्रांतात स्थित राहून विचार करू लागलो आणि करत आलो आहे.
“कधीकधी रात्रीच्या वेळी ‘ती शक्ती’ अवतरत असे आणि मी ‘ती शक्ती’ आणि तिच्याबरोबर आलले विचारदेखील ग्रहण करत असे आणि सकाळी प्रत्येक गोष्ट मी शब्दन् शब्द उतरवून काढत असे. त्याच शांतीमध्ये, विचाररहित स्थितीमध्ये आम्ही मुंबईला गेलो. नॅशनल युनियन येथे मला एक व्याख्यान द्यावयाचे होते. म्हणून, श्री. लेले यांना ‘मी काय करावे’ असे विचारले. त्यांनी मला प्रार्थना करायला सांगितली. पण मी शांत ब्रह्मामध्ये गढून गेलो होतो. त्यामुळे ‘मी प्रार्थना करण्याच्या मन:स्थितीत नाही’ असे त्यांना सांगितले. तेव्हा, “मी आणि इतर जणं प्रार्थना करू; तुम्ही फक्त त्या सभेला जा आणि श्रोत्यांना सर्वव्यापी ईश्वर, नारायण समजून, त्यांना वाकून नमस्कार करा; तेव्हा एक आवाज तुमच्या माध्यमातून बोलेल,” असे ते म्हणाले…
“त्यांनी जसे सांगितले अगदी तसेच मी केले. मी त्या सभेला जात असताना वाटेत मला कोणीतरी एक वर्तमानपत्र वाचायला दिले. त्यातील एका शीर्षकाने माझे लक्ष वेधले गेले आणि माझ्या मनावर त्याचा ठसा उमटला. मी जेव्हा बोलायला उभा राहिलो तेव्हा माझ्या मनात कल्पना चमकून गेली आणि एकदम अचानक बोलायला सुरुवात झाली. श्री. लेले यांच्याकडून मिळालेला हा दुसरा अनुभव होता. दुसऱ्यांना योगिक अनुभव देण्याची शक्ती त्यांच्यामध्ये होती हे यावरून लक्षात आले.”
(क्रमश:)
(सौजन्य : अभीप्सा मराठी मासिक)
Special Articel Series ShreeArvind Yogguru Lele Meet Part20