फ्लोरिडा – चार सामान्य नागरिकांना अंतराळाची सफर घडवून स्पेसएक्स कंपनीचे खासगी अंतराळयान तीन दिवसांची पृथ्वी प्रदक्षिणा करून यशस्वीरित्या परतले. फ्लोरिडा येथील कॅनेडी अंतराळ केंद्रावरून उड्डाण करणारे स्पेसएक्सचे क्रू ड्रॅगन रॉकेटसुद्धा समुद्रात उतरले.
तीन दिवसांच्या पृथ्वी प्रदक्षिणेनंतर ड्रॅगन अंतराळ यानात प्रवास करणारे इन्स्पिरेशन ४ चे चारही अंतराळवीर फ्लोरिडाच्या अटलांटिक महासागराच्या किनार्यावर सुरक्षितरित्या उतरले आहेत, अशी माहिती स्पेसएक्सने दिली. चार सामान्य नागरिकांनी जगात प्रथमच पृथ्वी प्रदक्षिणा करून ही मोहीम यशस्वी केली आहे. इन्स्पिरेशन चारचे चारही अंतराळवीर पॅराशूटच्या सहाय्याने अमेरिकेच्या स्थानिक वेळेनुसार शनिवारी सायंकाळी सात वाजता अटलांटिक महासागरात सुखरूप खाली उतरले आहेत. १६ सप्टेंबरला भारतीय वेळेनुसार पहाटे पाच वाजून ३३ मिनिटांनी अमेरिकेच्या फ्लोरिडा येथील कॅनेडी अंतराळ केंद्रांतून चार सामान्य लोकांना घेऊन स्पेसएक्सचे फाल्कन-९ हे क्रू ड्रॅगन कॅप्सूल रॉकेटद्वारे अंतराळाकडे रवाना झाले होते.
हौशी अंतराळवीरांचा यशस्वी प्रवास
हौशी अंतराळवीर अब्जाधीश उद्योगपती जेरेड इसाकमॅन यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे. त्यांनी क्रू ड्रॅगन कॅप्सूल भाडे कराराने घेतले होते. त्यांच्यासोबत मेम्पिस येथील २९ वर्षीय वैद्यकीय सहाय्यक हेले आर्सेना, एक फिनिक्स येथील ५१ वर्षीय सामुदायिक महाविद्यालयाच्या प्राध्यापिका साइन प्रोक्टर आणि तिसरे वॉशिंग्टनमध्ये राहणारे डाटा इंजिनिअर क्रिस्टोफर सेमब्रोस्की गेले होते.