इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नाशिक मधील विद्यार्थी आणि विज्ञानप्रेमी नागरिकांना इस्त्रोच्या आजवरच्या पराक्रमांची रोमांचकारी सफर अनुभवता येणार आहे.भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आणि विज्ञान भारती (VIBHA) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्पेस ऑन व्हील्स’ ही विशेष बस देशभर फिरविण्यात येत असून सध्या ती पश्चिम महाराष्ट्राच्या प्रवासावर आहे. या प्रवासात या बसचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे.
या बस मध्ये इस्रो द्वारा निर्मित विविध प्रक्षेपक,उपग्रह यांच्या प्रतिकृती आणि माहिती प्रदर्शित करण्यात आली आहे. तसेच भारताच्या मंगलयान,चांद्रयान व इतर सर्व प्रकल्पांची सखोल माहिती चित्रफितीतून देण्यात येणार आहे. या निशुल्क प्रदर्शनाच्या माध्यमातून अंतराळ विज्ञानाचा प्रचार आणि विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचा उद्देश आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर आणि इगतपुरी इथे प्रवास करत दिनांक १९ नोव्हेंबर रोजी संदीप फाउंडेशन त्रिंबकरोड येथे या बसचे आगमन होईल. या नंतर दिनांक २१ नोव्हेंबर रोजी भोसला मिलिटरी कॉलेज परिसर ,दिनांक २२ नोव्हेंबर रोजी के के वाघ इंजिनेरींग कॉलेज आणि दिनांक २३ नोव्हेंबर रोजी गोखले एज्युकेशन सोसायटीचे आर. एच. सपट इंजिनियरिंग कॉलेज या ठिकाणी बस दिवसभर असणार आहे. यांनतर २४ तारखेपासून नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी,कळवण ,चांदवड ,सटाणा ,निफाड ,येवला , मालेगाव अशा विविध तालुक्यात या बसच्या प्रवासाचे नियोजन असणार आहे.
या विविध ठिकाणी विद्यार्थी, आणि सर्व नागरिक यांना सकाळी ९:०० ते संध्याकाळी ६:०० पर्यंत या निशुल्क प्रदर्शनाचा लाभ घेता येईल.तरी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी .तसेच अधिक माहिती साठी विज्ञान भारती नाशिक समन्वयक विनय जोशी(९३७२८०७४२१ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विज्ञान भारतीच्या वतीने करण्यात आले आहे.