मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्य विधानसभेचे कामकाज आज तहकूब करण्यात आले. कारण, समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी वक्तव्य केले की, ‘वंदे मातरम’ म्हणणार नाही. आम्ही फक्त अल्लाहला मानतो. त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजप आमदारांनी मोठा गदारोळ केला. त्यानंतर कामकाज तहकूब करण्यात आले.
नेमकं काय म्हणाले आझमी
संभाजीनगर जिल्ह्यातील दंगलीचा मुद्दा उपस्थित करत आझमी म्हणाले की, ‘आज एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी लक्ष वेधत आहे. एक आफताब पुणवला होता, त्याने मुलीची हत्या केली आणि तिच्या धडाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले. यानंतर संपूर्ण देशभरात मुसलमानांविरुद्ध कारवाई सुरू झाली. माझ्या मराहाष्ट्रात अनेक जिल्ह्यामध्ये सकल हिंदू समाज आक्रोश रॅली निघू लागल्या. त्या रॅलिंमध्य मुसलमानांना एवढं अपमानित केलं की मुसलमानांपेक्षा मोठी देशद्रोही दुसरा कुणीच नाही. “‘जब गुलिस्तां को जरुरत पडी, सबसे पहले गर्दन हमारी कटी, अब ये हमसे कहते थे अहले चमन, ये चमन हमारा है तुम्हारा नही’. २९ मार्चच्या सायंकाळी ५ वाजता औरंगाबादमध्ये तीन व्यक्ती राममंदीराजवळ मोटरसायकलवरून आले. त्यांनी ‘इस देश मे रहेना है, तो वंदे मातरम कहना होगा’ अशा घोषणा दिल्या. अध्यक्ष महोदय आम्ही वंदे मातरम म्हणू शकत नाही. कारण आम्ही फक्त अल्लाहला मानतो, जगात कोणासमोरही आम्ही डोकं टेकवू शकत नाही. आईसमोरही आम्ही डोकं टेकत नाही. आमचा धर्म याची अनुमती देत नाही. तिथे तरुणांनी या घोषणा दिल्यानंतर परिस्थिती बिघडली. पोलिस आले आणि त्यांनी दोन्ही गटांना पांगवलं, पण रात्री पुन्हा १५ ते २० लोक आले आणि घोषणाबाजी सुरू केली. यानंतर दोन्हीकडचे लोक जमा झाले.
आमदारांकडून गदारोळ
आझमींचे वक्तव्य ऐकताच सभागृहात जोरदार गदारोळ माजला. भाजप आमदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. काही जण अध्यक्षांसमोर आले आणि त्यांनी आझमींच्या वक्तव्याचा निषेध केला.
अध्यक्षांचे प्रयत्न
आझमी यांच्या विधानावर भाजप आमदारांनी जोरदार आक्षेप घेतला. महाराष्ट्र विधानसभेत गोंधळ सुरू असताना सभापती राहुल नार्वेकर यांनीही आमदारांना शांत होण्याचे आवाहन केले. त्यांनी आझमी यांना इशाराही दिला आणि त्यांची टिप्पणी या विषयाशी अप्रासंगिक असल्याचे सांगितले. त्यांनी सूचीबद्ध केलेल्या मुद्द्यावर चर्चा करावी. मात्र, विरोध सुरूच राहिल्याने सभापतींनी सभागृहाचे कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.
विधान भवनाबाहेर आल्यावर आझमी माध्यमांना म्हणाले… (बघा व्हिडिओ)