नाशिक – नाशिकचे जिल्हा पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांची राज्याच्या गुप्तवार्ता विभागात उपायुक्तपदी बदली करण्यात आली होती. पण, त्यांच्या या बदलीला न्यायालयाने स्थगिती दिली आहे. डिसेंबर अखेर बदली बाबत निर्णय घेऊ नये असे निर्देशही न्यायालयाने दिले आहे. कार्यकाळ पूर्ण झाला नसतांना आमदाराच्या पत्रावर बदली केल्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले आहे. पाटील यांच्या जागी शहाजी उमाप हे नाशिकचे जिल्हा पोलिस अधीक्षक पदाचा पदभार स्विकारणार होते. पण, त्याअगोदरच ही स्थगिती आली आहे. राज्यातील ३२ अधिका-यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात पाटील यांचा समावेश होता. पाटील यांनी पदभार स्विकारल्यापासून अनेक धडाकेबाज कारवाया सुरु केल्या. त्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांची अचानक बदली केल्यामुळे सर्वांनाच धक्का बसला होता. पण, आता त्यांच्या बदलीला स्थगिती दिल्यामुळे पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाया सुरु होणार आहे.
तो आमदार कोण ?
पाटील यांची बदली झाल्यानंतर जिल्हाभर शेतकऱ्यांनी गावागावात बदली थांबवण्याचे फलक लावले प्रशासनाला निवेदन दिले होते.त्यात पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सावध पवित्रा घेतला असताना जिल्ह्यातील एका आमदाराच्या पत्रावर बदली होणे अचंबित करणारे आहे. जेव्हा पाटील यांची बदली रद्द झाली तेव्हा जिल्हाभर ‘तो आमदार कोण अशी चर्चा रंगली’ होती.परंतु सदर आमदाराने कोणत्या ‘अर्थाने’ पत्र दिले याचा उहापोह होणे गरजेचे असल्याचे मत सामान्य नागरिकांनी व शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.