लाम्बासिंगी (आंध्र प्रदेश)
आपल्या ‘देखो अपना देश’ यातील हटके पर्यटन स्थळाच्या मालिकेत आपण आज आणखी एका वेगळ्या पर्यटन स्थळाबाबत जाणून घेणार आहोत. हे ठिकाण आहे आंध्र प्रदेशातील बर्फाळ सदृश प्रदेशाची.
आपल्या देशात उत्तरेत बर्फ पडतो हे सर्वांना माहित आहे. पण दक्षिण भारतात चक्क बर्फ वृष्टी होत असेल का? तुम्हाला दक्षिण भारताचा काश्मिर माहित आहे का? आंध्र प्रदेशात विशाखापट्टणम जिल्ह्यात लाम्बासिंगी नावाचे गाव आहे. येथे हिवाळ्यात बर्याचदा चक्क बर्फ पडतो. खरेतर ही बर्फवृष्टी नसून तापमान शून्य अंशाखाली गेल्यामुळे दवबिंदू गोठून त्याचा बर्फ होतो, असे हवामान खात्याचे मत आहे. आपण नशिबवान असलो तर अशी संधी आपल्याला मिळू शकते. होय, तुमचा विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे.
लाम्बासिंगी हे छोटी वस्ती असलेले गाव समुद्रसपाटीपासून साधारण १०५० मीटर उंचीवर वसलेले आहे. लाम्बासिंगी या गावास स्थानिक लोक “कोरा बायलू” या नावानेही ओळखतात. या नावाचा स्थानिक भाषेत “जर येथे कुणी हिवाळ्यामध्ये उघड्यावर राहिला तर त्याची बर्फाची काडी होईल” असा अर्थ होतो.
हे गाव पूर्व चिंतापल्ली पर्वत रांगेमध्ये आहे. ज्यामुळे येथे थंडगार वातावरणासोबत घनदाट जंगलही आहे. येथे मोठ्या प्रमाणात निलगिरी आणि पाईनचे वृक्षही आढळतात. येथिल चिंतापल्ली अभयारण्य विविध जातींच्या पक्षासाठी प्रसिद्ध आहे. येथे बरेच पक्षी प्रेमी अभ्यासासाठी येतात. येथे काॅफीच्या बागाही आहेत. येथे ईरावरम नावाचा सुंदर धबधबा आहे. येथील व्ह्यू पाॅईंटवरुन ढग जमिनीवर उतरलेले दिसतात. जसा दूधाचा समुद्रच असल्यासारखे वाटते.
हे एक असे थंड हवेचे ठिकाण आहे जेथे उन्हाळ्यात सुद्धा १० डिग्री अंश सेल्सियसच्या वर रात्रीचे तापमान नसते. हिवाळ्यात तर येथे शून्य अंशापर्यंत पारा उतरतो. लाम्बासिंगी सोबतच आरकु व्हॅली (८८ किमी), विशाखापट्टणम (१०० किमी), काकीनाडा (१४० किमी) व कोथापल्ली वाॅटरफाॅल ही आसपासची ठिकाणे आपण पाहू शकतो.
कसे पोहचाल
येथून १०० किमीवर विशाखापट्टणम येथे विमानतळ आहे. ज्यामुळे रस्तामार्गे येथे सर्व ठिकाणाहून पोहचता येते. येथून फक्त ३१ किमीवर नर्सिपट्टणम हे रेल्वे स्टेशन आहे.
राहण्याची व्यवस्था
येथील स्थानिक नागरिकांचे होम स्टे छान आहेत. तसेच आंध्र प्रदेश टुरिझम बोर्डचे काॅटेजेस व टेंटस सुद्धा उपलब्ध आहेत.
साधारण तापमान
नोव्हेंबर ते मार्च – ० ते १५ अंश सेल्सिअस
एप्रिल ते जून – १८ ते २८ अंश सेल्सिअस
जुलै ते ऑक्टोबर – १५ ते २५ अंश सेल्सिअस
चला तर मग अशा या अपरिचीत थंड हवेच्या ठिकाणाची शाब्दिक सफर कशी वाटली, ते अवश्य कळवा.
South India Ice Region Lambasingi Tourism Hatke Destination