इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्या रजनीकांत हिच्या घरात दागिन्यांची चोरी झाल्याची घटना समोर आली होती. चोरीनंतर चेन्नई पोलिसांनी नवीन अपडेट दिले आहे. ऐश्वर्या रजनीकांत हिने चोरी प्रकरणी एफआयआर दाखल केला होता. सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने गायब झाल्याचे तक्रारीत म्हटले होते. या प्रकरणी ऐश्वर्याला घरातील नोकरांवर संशय होता. चेन्नई पोलिसांनी दागिने चोरीप्रकरणी ऐश्वर्याची मोलकरीण ईश्वरी आणि तिचा ड्रायव्हर व्यंकटेशन यांना अटक केली आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी कारवाई सुरू केली. त्यांनी घरातील सर्व नोकरांची विचारपूस केली. तपासादरम्यान मोलकरीण ईश्वरी हिने घरातून दागिने चोरल्याची कबुली दिली असून, त्यात सोन्याच्या दागिन्यांसह ३० ग्रॅम हिऱ्याचे दागिने आणि ४ किलो चांदीही होती. ईश्वरीची चौकशी केली असता, घराचा चालक व्यंकटेशन याचाही यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले, त्यानंतर पोलिसांनी त्यालाही अटक केली.
ऐश्वर्याची मोलकरीण ईश्वरी गेल्या १८ वर्षांपासून तिच्या घरी काम करत होती, त्यामुळे तिला घराच्या प्रत्येक कोपऱ्याची पूर्ण माहिती होती. तसेच, लॉकरच्या चाव्या आणि दागिन्यांची माहिती तिच्याकडे होती. हे दागिने चोरून विकून त्यातून घर विकत घेतल्याचे ईश्वरीने सांगितले. लॉकरमधून एक एक करून दागिने चोरीला गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
ऐश्वर्या रजनीकांत लाल सलाम चित्रपटाच्या तयारीत व्यस्त आहे. या चित्रपटाद्वारे ती दिग्दर्शनाकडे परतणार आहे. या चित्रपटात विष्णू विशाल आणि विक्रांत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटात ऐश्वर्याचे वडील रजनीकांतही दिसणार आहेत.
South Film Aishwarya Rai Home Theft 2 Arrested Chennai Police