जोहान्सबर्ग – सध्या कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकाराने जगभरातील सर्वच देशांची पुन्हा चिंता वाढवली आहे. हा प्रकार प्रथम दक्षिण आफ्रिकेत आढळला. जागतिक आरोग्य संघटनेनेही या प्रकाराबद्दल चिंता व्यक्त केली आहे. मात्र कोविडचा हा नवा प्रकार कसा शोधला गेला, याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे.
या संदर्भात एका अहवालात असे म्हटले आहे की, दि. 19 नोव्हेंबर रोजी शास्त्रज्ञ रॅकेल व्हिएन्ना हे दक्षिण आफ्रिकेतील सर्वात मोठ्या खाजगी चाचणी प्रयोगशाळेत 8 कोरोना व्हायरस नमुन्यांचे जीन्स अभ्यासत करत होते. यावेळी त्यांच्या निदर्शनास आले की, तपासलेल्या अनेक नमुन्यांमध्ये अनेक उत्परिवर्तन झाले आहेत. विशेषतः स्पाइक प्रोटीनवर जे विषाणू मानवी पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरतात.
इतके बदल कसे झाले?
व्हिएन्ना यांनी सांगितले की, आम्ही जे काही पाहत होतो त्यामुळे खूप आश्चर्य वाटले. अभ्यास प्रक्रियेत काही चूक झाली आहे का? वास्तविक मला काही दिवसांपूर्वी या प्रकारांबद्दल अलर्ट करण्यात आले होते. नमुन्यात बरेच बदल (उत्परिवर्तन ) असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले. मी लवकरच जोहान्सबर्गमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिसीजेस (NICD) मध्ये माझे सहकारी डॅनियल अमोको (जीन सिक्वेन्सर) यांना बोलावले. कारण हे उत्परिवर्तन कसे मोडायचे हे मला माहीत नव्हते.
नवीन विषाणूसारखे दिसले
अमोको आणि NICD टीमने व्हिएन्नाने पाठवलेल्या आठ नमुन्यांची चाचणी केली. सर्वांमध्ये सारखेच उत्परिवर्तन झाल्याचे आढळून आले. हे इतके विचित्र उत्परिवर्तन होते की जोसी एव्हरेटसह अमोको आणि त्याच्या सहकाऱ्यांना असे वाटले की, चाचणीमध्ये काहीतरी चुकीचे आहे. मात्र त्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, गेल्या एका आठवड्यात कोविडची प्रकरणे वाढत आहेत आणि हे नवीन विषाणू प्रकारामुळे असू शकते.
आफ्रिकेने WHO ला कळविले
जोहान्सबर्ग आणि प्रिटोरियामध्ये आणखी 32 चाचण्या केल्यानंतर, हे विषाणू प्रकार वेगळे असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एनआयसीडीने दक्षिण आफ्रिकेतील आणखी प्रयोगशाळांना याची माहिती दिली. त्याच दिवशी एनसीआयडीला कळले की बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्ये अशा प्रकारची जीन सिक्वेन्सिंग प्रकरणे नोंदवली गेली आहेत. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी एनआयसीडीने जागतिक आरोग्य संघटनेला नवीन विषाणू बदलाची (उत्परिवर्तनाची) माहिती दिली.
अद्याप स्पष्ट झालेले नाही
कोविडचे ओमिक्रॉन विषाणू प्रकार किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षणे किती गंभीर आहेत ? याचा वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्तींवर कसा परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. जगातील सर्वोच्च शास्त्रज्ञ याचा शोधत घेत आहेत. या प्रश्नांच्या उत्तरांवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर अखेरपर्यंत त्यांना योग्य उत्तर मिळू शकेल.