जिन्हेव्हा (स्वित्झर्लंड) – दक्षिण अफ्रिकेत आढळलेल्या बी.१.१.५२९ या नव्या कोरोना विषाणूच्या धोकादायक व्हेरिएंटला जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) ओमिक्रॉन असे नाव दिले असून, त्याला व्हेरिएंट ऑफ कंसर्न म्हणजेच चिंतीत करणारा व्हेरिएंट असे संबोधले आहे. या श्रेणीच्या विषाणूला अत्याधिक संक्रामक मानले जाते.
डेल्टा व्हेरिएंटला सुद्धा याच श्रेणीत स्थान देण्यात आले होते. डेल्टा व्हेरिएंटमुळे यापूर्वीच ब्रिटन, जर्मनी, रशियासह संपूर्ण युरोप आणि इतर भागातील अनेक देशांमध्ये धुमाकूळ घातला आहे. रशियामध्ये या व्हेरिएंटमुळे विक्रमी मृत्यू झाल्याची नोंद झाली. आता कोरोनाच्या या नव्या अवतारामुळे जगभरात पुन्हा एकदा दहशत पसरली आहे.
डब्ल्यूएचओकडे अहवाल
दक्षिण अफ्रिकेत बी.१.१.५२९ व्हेरिएंटचा पहिला रुग्ण २४ नोव्हेंबर २०२१ मध्ये आढळल्याचे प्रकरण डब्ल्यूएचओकडे नोंदवले गेले. परंतु ९ नोव्हेबंर २०२१ रोजी तपासणीसाठी या व्हेरिएंटचा नमुना डब्ल्यूएचओकडे आला होता. ओमिक्रॉन या नव्या व्हेरिएंटचे म्युटेशन मोठ्या प्रमाणात झाले आहे. त्यातील काही म्युटेशन खूपच चिंताजनक आहेत. त्यामुळे आपल्याला लशी संदर्भात आणखी सजग व्हावे लागणार आहे, असे डब्ल्यूएचओचे व्यवस्थापकीय संचालक टेड्रोस अधनम घेब्रेसस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. सार्क-कोव्ह-२ वर काम करणार्या तांत्रिक सल्लागार गटाने नव्या व्हेरिएंटवर चर्चा केली. त्यानंतर डब्ल्यूएचओने या व्हेरिएंटचे ओमिक्रोन असे नामकरण करून तो जास्त चिंताजनक असल्याचे म्हटले आहे.
व्हेरिएंट ऑफ कंसर्नचा अर्थ
– देशांना जिनोम सिक्वेंस शेअर करावे लागेल.
– या प्रकरणांचे अहवाल डब्ल्यूएचओला द्यावे लागतील.
– या व्हेरिएंटचा प्रभाव जाणून घेण्यासाठी तपास करावा लागेल. जेणेकरून त्याची जोखीम आणि सार्वजनिक आरोग्य लक्षात घेऊन योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.
अनेक देशांमध्ये उपाययोजना
दक्षिण अफ्रिकेत या व्हेरिएंटने बाधित झालेल्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. यापूर्वी डेल्टा व्हेरिएंटने धुमाकूळ घातला होता. दक्षिण अफ्रिकेतून येणार्या प्रवाशांमध्ये बोत्सवाना आणि हाँगकाँगमध्ये हा व्हेरिएंट आढळला आहे. इस्रायलमध्येही मलावी येथून आलेल्या एका व्यक्तीला या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे. परिस्थिती गंभीर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर व्हेरिएंटला रोखण्यासाठी अनेक देशांमध्ये उपाययोजना केल्या जात आहेत.