नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिकच्या ७ धावपटूंनी दक्षिण आफ्रिकेतील कॉम्रेड मॅरेथॉन यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. डर्बन येथे रविवार (दि. ११ जून) ही स्पर्धा झाली. ८९ किलोमीटरची ही स्पर्धा जगातील सर्वात कठीण समजली जाते. नाशिकच्या सात धावपटूंनी ही स्पर्धा वेळे अगोदर पूर्ण करून नाशिकचा झेंडा सातासमुद्रापार रोवला आहे.
यावर्षी जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. जगातील अगदी मोजके धावपटु या कॉम्रेड स्पर्धेसाठी क्वालीफाय होतात. या स्पर्धेत यावर्षी संपूर्ण भारतातील ४०३ धावपटू सहभागी झाले होते. त्यातील ३५ धावपटू हे पुण्यातील होते, तर नाशिकचे सात धावपटू सहभागी झाले होते. या सातही धावपटूंनी गेल्या अनेक महिन्यांच्या परिश्रमानंतर ही स्पर्धा पूर्ण केली आहे. ही स्पर्धा ११ तास ४५ मिनीटात पूर्ण करणे गरजेचे असते.
नाशिकच्या डॉ. धनंजय डुबेरकर यांनी हे अंतर ९ तास १८ मिनीटात, किरण गायकवाड यांनी ९ तास ३१ मिनीटात, महेंद्र छोरीया यांनी ९ तास ५२ मिनीटात, संदीप हंडा यांनी १० तास २६ मिनीटात, प्रशांत डबरी यांनी ११ तास २९ मिनीटात, सागर पाटील यांनी ११ तास ३० मिनीटात तर डॉ. पंकज भदाणे यांनी ११ तास ३२ मिनीटात पूर्ण केले. या सर्व धावपटूंनी एक वर्षापासून तयारी केली होती. पहाटे उठून शारिरीक स्वास्थ्याबरोबर मानसिक स्वास्थ कसे सुदृढ राहील याकडे लक्ष केंद्रीत केले होते.
रोजच्या सरावाबरोबर अप हिल व डाऊन हिल असे प्रकार ते करीत होते. दररोज ठराविक अंतर तर रविवारी लॉँग रनचा सराव त्यांनी केला होता. ही स्पर्धा गेल्या शंभर वर्षापासून सुरु आहे. भारतात फुल मॅरेथॉन ही ४२ किलोमीटरची असते मात्र ही ही स्पर्धा ८९ किलोमिटरची असल्याने खेळाडूंचा कस लागतो.
या स्पर्धेच्या पात्रतेसाठी तीन सराव वर्ग करणे बंधनकारक असते. यातील दोन सराव वर्ग भारतातील लोणावळा व एक सराव वर्ग लवासा येथे आयोजित करण्यात आले होते ज्यांनी ही प्रशिक्षण पूर्ण केले अशाच व्यक्तींना या मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. आपल्याला ही स्पर्धा पूर्ण करायची असे प्रत्येक रनरचे स्वप्न असते. ही मॅरेथॉन धावत असताना रस्त्याच्या दुतर्फा जे लोक प्रोत्साहन करायला उभे होते त्यांनी आपल्या भारत देशा बद्दल ज्या घोषणा दिल्या त्या मुळे धावपटूना एक वेगळीच ऊर्जा मिळत असे.
स्पर्धक आणि त्यांचे यश असे
(स्पर्धकाचे नाव आणि वेळ)
डॉ. धनंजय डुबेरकर 9:18
किरण गायकवाड 9:31
महेंद्र छोरिया 9:52
संदीप हांडा 10:26
प्रशांत डाबरी 11:29
सागर पाटील 11न30
डॉ. पंकज भदाणे 11:32
पहिल्यांदाच नाशिकमधील सात स्पर्धक यात सहभागी झाले होते. अत्यंत कठोर श्रमानंतर ही स्पर्धा पूर्ण सर्वांनी पूर्ण केली. जास्तीत जास्त स्पर्धकांनी यास्पर्धेत सहभागी व्हावे.
– महेंद्र छोरीया, धावपटू व स्पर्धक
South Africa Comrade Marathon Nashik 7 Players