नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सर्व क्षेत्रातील व्यक्तींचे राजकीय पक्षांशी चांगले संबंध असतात. महत्त्वाच्या पदावर काम करताना त्यांना चांगले संबंध टिकवून ठेवणे गरजेचे असते. त्यामुळे कोणाची कधी राजकारणात एंट्री होईल हे सांगता येत नाही. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्या पत्नी डोना गांगुली यांच्याबद्दल अशीच चर्चा सुरू झाली आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष आणि माजी क्रिकेटपटू सौरव गांगुली यांच्या पत्नी डोना गांगुली यांची राज्यसभेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शहा यांनी सौरभ गांगुली यांच्याकडे रात्रीभोज घेतल्यानंतर या चर्चेला उधाण आले आहे. राज्यसभेतील ही जागा राष्ट्रपती नियुक्त आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांचे तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि भाजपशी चांगले संबंध आहेत. ते वेळोवेळी विविध पक्षाच्या कार्यक्रमात सहभागी होत असतात. त्यांचे बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह भाजपनेते अमित शहा यांच्याशीही चांगले संबंध आहेत. डोना गांगुली यांना राज्यसभेवर पाठवण्याबाबत सौरव गांगुली यांच्याकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आली नसली तरी त्यांनी या वृत्ताचे खंडनही केले नाही. यावर भाजपनेही कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
साहित्य, विज्ञान, कला आणि सामाजिक क्षेत्रातील १२ सदस्यांची राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर नियुक्ती केली जाणार आहे. यापूर्वी बंगालमधून रूपा गांगुली आणि स्वपन दासगुप्ता यांची राज्यसभेवर नियुक्ती झाली होती. त्यांचा कार्यकाळ समाप्त झाल्याने भाजपकडून आता नव्या चेहऱ्याचा शोध सुरू झाला आहे. त्यामुळे अमित शाह यांच्या डिनर डिप्लोमसीबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
डोना गांगुली ह्या प्रसिद्ध नृत्यांगणा आहेत. २०२० मध्ये भाजपने दुर्गा पूजेचं आयोजन केले होते. त्या वेळी झालेल्या एका कार्यक्रमात डोना गांगुली यांनी नृत्य केले होते. त्या कार्यक्रमाला गृहमंत्री अमित शहा हेदेखील उपस्थित होते. दरम्यान सौरव गांगुली हे राजकारणात आले तर चांगले काम करतील. ते जे काम हाती घेतात, ते चांगलेच करतात, असे विधान डोना गांगुली यांनी नुकतेच केले होते. त्यामुळे सौरव गांगुलीसुद्धा राजकीय मैदानात उतरणार की काय अशी चर्चा सुरू झाली आहे.