इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय क्रिकेट संघ खराब कामगिरी करत असेल आणि त्याचवेळी सेट मॅक्सवर सूर्यवंशम सुरू असेल… तर लगेच सोशल मीडियावर मॅच बघण्यापेक्षा सिनेमा बघा, असे मिम्स तयार होत असतात. राजकीय पक्षांचे आयटी सेल निवडणुकीच्या निकालाच्या वेळी एकमेकांची टिंगल करण्यासाठी सूर्यवंशमचा आधार घेताना दिसतात. त्यामुळे कुणी असो वा नसो सूर्यवंशम कायम चर्चेत राहणारा चित्रपट आहे.
महानायक अमिताभ बच्चन यांचा सूर्यवंशम चित्रपट माहिती नाही, असा देशात एकही जण नाही. सातत्याने हा चित्रपट दाखविण्यात येत असल्याने तर त्याची अधिकच चर्चा होत असते. एवढी की गेल्या काही वर्षांपासून त्यावर सातत्यानं विनोद होऊ लागले आहेत. आता अश्यातच आणखी एक चर्चा सोशल मीडियावर होत आहे आणि त्याला कारण आहे सूर्यवंशम पीडिताने सेट मॅक्स वाहिनीला पाठविलेले पत्र.
सूर्यवंशम पीडित हे नाव पत्र पाठविणाऱ्याने स्वतःच दिले आहे. त्याने वाहिनीला पत्र पाठवून आरोग्यावर मानसिक परिणाम झाल्यास त्याला कोण कारणीभूत असेल, असा थेट सवाल केला आहे. सूर्यवंशम चित्रपट सातत्याने दाखविण्यात येत असल्यामुळे त्रस्त झालेल्या एका प्रेक्षकाचे हे पत्र आहे, हे सेट मॅक्स वाहिनीला प्रथमदर्शनीच लक्षात आले असावे. पण, या पत्राच्या माध्यमातून सोशल मीडियावर प्रसिद्धी प्राप्त करण्याचा उद्देश्य असल्याचे बोलले जात आहे. हा चित्रपट आणखी किती दिवस आपण दाखवणार आहात, असेही या पत्रात विचारण्यात आले आहे.
हिरा ठाकूरची ओळख झाली
आपल्याला सूर्यवंशम चित्रपटाचे अधिकार मिळाले आहेत. एवढ्या वर्षांमध्ये आपल्यामुळेच हिरा ठाकूर आणि त्याच्या कुटुंबियांची आम्हाला चांगली ओळख झाली आहे. आतापर्यंत कितीवेळा या चित्रपटाचे प्रसारण झाले आणि किती वेळा होणार आहे, याची माहिती द्यावी. आणि त्याचा एखाद्याच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला, तर त्याला कोण जबाबदार असेल, हेही सांगावे, असे सूर्यवंशम पीडिताने पत्रात म्हटले आहे.
Sooryavansham Movie Viewer Letter to Set Max TV Channel