मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आयटीआयच्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने हाती घेण्यात आलेल्या ‘सुचवा तुमच्या आवडीचे कौशल्य अभ्यासक्रम’ या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. कालपर्यंत तब्बल 67 हजार 990 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. आयटीआयमध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस सुरु करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
मागील काही वर्षांपासून आयटीआयच्या विविध अभ्यासक्रमांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत असून अधिकाधिक विद्यार्थी कौशल्याधारित प्रशिक्षण घेऊन रोजगार किंवा स्वयंरोजगार करीत आहेत. आता उद्योगांमधील बदलते नवनवे तंत्रज्ञान आणि त्याअनुषंगाने आयटीआयच्या अभ्यासक्रमांमध्ये आवश्यक बदल करण्यासाठी विभागाने पुढाकार घेतला असून यासाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून दि. 15 नोव्हेबरपर्यंत ही राज्यस्तरीय स्पर्धा जाहीर करण्यात आली आहे. याअंतर्गत वेगळ्या हटके संकल्पना सुचविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहेत. औद्योगिक व सामाजिक क्षेत्रात वेगाने बदल होत असल्याच्या काळात विद्यार्थ्यांना नवनवी कौशल्ये आत्मसात करणे गरजेचे बनले आहे. हे लक्षात घेऊन आयटीआयमध्ये शॉर्ट टर्म सर्टिफिकेट कोर्सेस सुरु करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून स्वत: अभ्यासक्रम निवडण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येत आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
या स्पर्धेअंतर्गत सर्वाधिक 20 हजार 760 इतक्या विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम सुचविण्यासाठी सहभाग घेतला आहे. त्या खालोखाल 20 हजार 364 विद्यार्थी अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित अभ्यासक्रम सुचविण्यासाठी स्पर्धेत सहभागी झाले आहेत. कृषी क्षेत्रातील अभ्यासक्रम सुचविण्यासाठी 17 हजार 445 विद्यार्थी स्पर्धेत सहभागी झाले आहेत तर 4 हजार 255 विद्यार्थी महिला रोजगाराशी संबंधित अभ्यासक्रम सुचविणार आहेत. 5 हजार 166 विद्यार्थ्यांनी अतिशय उपयुक्त अभ्यासक्रम सुचविण्यासाठी स्पर्धेत नोंदणी केली आहे. स्पर्धेत सुमारे 56 हजार 207 इतक्या मुलांनी तर 11 हजार 705 इतक्या मुलींनी सहभाग घेतला आहे. यातील सुमारे 61 टक्के विद्यार्थी हे आयटीआयच्या प्रथम वर्षातील तर 27 टक्के विद्यार्थी हे द्वितीय वर्षात शिकणारे आहेत.
कशी आहे स्पर्धा?
अधिक माहितीसाठी आणि स्पर्धेत सहभागासाठी विद्यार्थ्यांनी स्थानिक आयटीआयमध्ये संपर्क साधावा. स्पर्धेत विद्यार्थ्यांना शेती, स्वयंरोजगार, महिलांचे रोजगार, आधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत अभ्यासक्रम व अन्य उपयुक्त अभ्यासक्रम सुचवता येणार आहेत. ते विषय कसे उपयुक्त आहे हेदेखील सांगायचे आहे. सुचविलेले अभ्यासक्रम एनएसक्यूएफशी संलग्न असावेत. सर्वोत्कृष्ट विषयानुसार विद्यार्थ्याची निवड केली जाईल. त्यासाठी जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली निवड समिती नियुक्त केली आहे. सर्वोत्कृष्ट संकल्पना सुचविलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीसे दिली जाणार असून त्यांनी सुचविलेल्या अभ्यासक्रमांचा आयटीआयमध्ये समावेशासाठी विचार केला जाणार आहे, असे मंत्री श्री. लोढा यांनी सांगितले.
Soon These Courses will start in ITI