विशेष प्रतिनिधी, मुंबई
कोरोना काळात लोकांना मदत करण्यासाठी सरसावलेला प्रसिद्ध अभिनेता सोनू सूद याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोरोना प्रतिबंधित औषधांच्या खरेदी आणि पुरवठ्यासंदर्भात सोनू सूदच्या भूमिकेची चौकशी करावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत. स्थानिक आमदार जिशान सिद्दीकी यांच्याविरोधातही चौकशीचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
सोनू सूद आणि सिद्दीकी यांनी स्वतःला दूवदूताप्रमाणे दर्शविले. त्यांनी औषधे बनावट तर नाही ना याची पडताळणी केली नाही, तसेच पुरवठा अधिकृतरित्या करत आहोत का हे सुद्धा पाहिले नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे.
न्यायमूर्ती एस. पी. देशमुख आणि न्यायमूर्ती जी. एस. कुलकर्णी यांच्या पीठाला महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी सांगितले होते, की राज्य सरकारने चॅरिटेबल ट्रस्ट बी.डी.आर फाउंडेशन आणि त्यांच्या विश्वस्तांविरोधात आमदार जिशान सिद्दीकी यांना रेमडेसिव्हिरचा पुरवठा केल्याप्रकरणी माझगाव जिल्हा न्यायालयात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पीठाने राज्य सरकारला चौकशीचे आदेश दिले होते.
उच्च न्यायालयाच्या मागील आदेशाबाबत ते उत्तर देताना कुंभकोणी म्हणाले होते, की जे लोक संपर्क करत होते अशा लोकांना सिद्दीकी औषधे पुरवत होते. त्यामुळे त्यांच्याविरोधात सध्या कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. सोनू सूद याने गोरगाव येथील लाइफलाइन केअर रुग्णालय परिसरातील अनेक मेडिकलमधून औषधे प्राप्त केली होती. औषधनिर्माता कंपनी सिप्लाने या मेडिकलना औषध पुरवठा केला होता. या प्रकरणी सध्या चौकशी सुरू आहे.
देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर सोनू सूदने लोकांना ऑक्सिजनचा पुरवठा केला होता. तसेच तो रेमडेसिव्हिरसह इतर कोरोनावरील औषधांचा पुरवठा करत होता. याच कारणामुळे सोनू सूदचा सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोअर आहे.