विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
देशात कोरोना महामारीच्या काळात राजकारणही तापले आहे. देशातील कोरोना प्रतिबंधित लशींच्या वेगवेगळ्या किमतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकतीच केली होती. आता केंद्राचे लसीकरणाचे धोरणच असंवेदनशील आणि भेदभाव करणारे असल्याचा हल्लाबोल सोनिया गांधी यांनी केला आहे. दी इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत सोनिया गांधी यांनी केंद्रावर निशाणा साधला.
मतैक्य नाही
कोरोनाविरुद्धच्या लढाईसंदर्भात त्यांनी आपली मते मांडली. कोरोनाविरोधातील लढा आम्ही विरुद्ध तुम्ही असा नसून तो आपण सर्व विरुद्ध कोरोना असा आहे. देशाने एकजुटीने हा लढा द्यावा लागेल, त्यासाठी मतैक्य आवश्यक आहे, असे सोनिया गांधी यांनी म्हटले आहे. कोरोनाविरुद्धचा सामना सर्वांच्या मदतीने केला पाहिजे. परंतु दुर्दैवाने मोदी सरकारने मतैक्याऐवजी धाकदपटशाहीची भूमिका घेतली आहे. हा लढा काँग्रेसविरोधातील नाही किंवा राजकीय विरोधकांशी नाही, हे वास्तव नरेंद्र मोदी यांनी समजून घ्यावे असेही त्या म्हणाल्या.
ऑक्सिजनचा तुटवडा का
काँग्रेसने केलेल्या सूचनांकडे त्यांनी दुर्लक्ष केले. त्याउलट काँग्रेसशासित राज्यांमध्ये कोरोनाची साथ हाताळताना काय चुका झाल्या हेच ते सांगत आले. जगातील सर्वात मोठा ऑक्सिजन उत्पादक देशात ऑक्सिजनची टंचाई कशी निर्माण होते, हे त्यांनी अपेक्षित आहे. तसेच संसदेची नव्या सेंट्रल व्हिस्टा इमारतीचा अनावश्यक खर्च टाळून तो कोरोनाच्या लढाईत वापरावा अशी सूचनाही त्यांनी केली आहे.