कोरोनासाठी उपलब्ध होणार दररोज २०७० जंबो सिलेंडर
मुंबई – कोरोना महामारीच्या काळात जाणवणा-या भीषण ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राबविलेल्या ‘मिशन ऑक्सिजन’या मोहीमेचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे. राज्यात तीन टप्प्यात हे मिशन राबविले जात असून तीनही टप्प्यानंतर राज्याला दररोज २०७० जंबो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध होणार असून यामुळे हजारो लोकांचा जीव वाचवायला मदत होणार आहे.
कोरोना महामारीच्या काळात उर्जा विभागाने व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाबद्दलची माहिती डॉ. राऊत यांनी सोनिया गांधी यांना पाठविली होती. सोनिया गांधी यांनी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात या संकटाच्या काळात राज्यातील विविध हॉस्पीटलला ऑक्सीजनचा पुरवठा करण्याच्या कामाचे कौतुक २१ मे रोजी पाठविलेल्या पत्राव्दारे केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार व कोरोनाचा सामना करण्यासाठी लढा देत असलेल्या राज्यातील लाखो कोरोना योद्ध्यांच्या कार्याला मनापासून पाठिंबा असल्याचे असल्याचे सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.
औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ-सूक्ष्मजंतू होऊ नयेत यासाठी त्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्लांट स्थापित केलेले असतात. वीजनिर्मितीवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही याची दक्षता घेऊन अश्या प्लांट मधून काही अतिरिक्त यंत्रणा उभारून किमान ९५ टक्के शुद्धता राखून पूरक वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते याचा साधकबाधक अभ्यास करून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे मार्गदर्शनाखाली महानिर्मितीची संपूर्ण यंत्रणा गतिमानतेने कामाला लागली
या मिशनच्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात महानिर्मितीच्या नवीन परळी वीज केंद्राने अवघ्या काही दिवसांत तातडीने युद्ध पातळीवर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात प्रतिदिन २८८ जम्बो सिलेंडर क्षमतेचा व ९५.२ टक्के शुद्धतेचा ऑक्सिजन प्लांट उभारला. त्यानंतर प्रति तास ८४ घनमीटर क्षमतेचा अशाच प्रकारचा प्लांट परभणी जिल्हा परिषद कोविड रुग्णालय येथे देखील उभारण्यात आला आहे.
पहिला टप्पा तातडीने मार्गी लावल्यानंतर, दुसऱ्या टप्प्यात आता खापरखेडा व पारस वीज केंद्रातील सध्यस्थितीतील ओझोनायझेशन प्लांट नजीकच्या शासकीय रुग्णालय परिसरात स्थलांतरित करून तिथून ऑक्सिजन निर्मिती साध्य केली जाणार आहे. खापरखेडा वीज केंद्राद्वारे प्रति तास ४२ घनमीटर या क्षमतेने आणि पारस वीज केंद्राद्वारे प्रति तास ५० घनमीटर या क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा साध्य केला जाणार आहे. तसेच तिस-या टप्प्यात कोराडी(नागपूर), पारस(अकोला) व परळी (बीड) येथे वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग/बॉटलींग प्लांट उभारण्यात येणार आहे.
यासाठी आवश्यक ते कॉम्प्रेसर्स ,फिल्टर्स व इतर अत्यावश्यक यंत्रसामुग्री तातडीने विदेशातून आयात देशांतर्गत उपलब्ध करवून हा तिसरा टप्पा पूर्ण करण्याची तयारी सुरू आहे.