विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
सत्ताधारी भाजप आणि विरोधक काँग्रेस यांच्यात विविध विषयांवर मोठा संघर्ष आणि राजकारण सुरू असते. कोरोना प्रतिबंधक लसीवरुन दोघेही एकमेकांना सातत्याने लक्ष्य करीत असतात. तर, गांधी परिवार कोरोनाची लस का घेत नाही, असा प्रश्न भाजपकडून वारंवार उपस्थित केला जातो. अखेर काँग्रेसने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लसीचे महत्त्व बहुतांश लोकांना पटलेले आहे. परंतु या विषयावरही राजकारण सुरू झाले आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय इंटरनेट मीडिया समन्वयक गौरव पांढी यांनी लसीबद्दल काही प्रश्न उपस्थित केले. त्यावर भाजपकडून प्रत्युत्तरही आले आहे. परंतु लसीकरणाबाबत काँग्रेसची काय भूमिका आहे, असा प्रश्न भाजपने उपस्थित केला होता. त्यावर काँग्रेसने उत्तर दिले आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कोविड लसीचे दोन डोस घेतले असून, मे महिन्यात कोरोनाची बाधा झाल्यामुळे राहुल गांधी यांनी अद्याप लस घेतलेली नाही, असे स्पष्टीकरण काँग्रेसने दिले आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपने काँग्रेस नेत्यांच्या लसीकरणाबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर विरोधी पक्षाने उत्तर दिले आहे.
पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी सांगतात, राहुल गांधी यांना १६ मेस लस देण्यात येणार होती. परंतु एक दिवसाआधीच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. त्यांचा अनिवार्य प्रतीक्षा काळ संपल्यानंतर ते लस घेणार आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी लस घेतली का, असा सवाल भाजपने केला होता. दोन्ही नेत्यांनी लस घेतल्याची माहिती सार्वजनिक करावी, अशी मागणी केली होती.
काँग्रेसकडून प्रश्न
भाजप सरकारने लोकांचा विश्वासघात करू नये. जर कोवॅक्सिनमध्ये गायीच्या वासराचे अंश टाकले असतील तर लोकांना हे जाणून घेण्याचा हक्क आहे, असा प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय इंटरनेट मीडिया समन्वयक गौरव पांढी यांनी माहिती अधिकाराच्या अहवालाचा दाखला देत प्रश्न विचारला होता. त्यावर भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी निशाणा साधत काँग्रेसच्या भूमिकेवरच संशय घेतला होता.