इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
लडाख येथील लेह हिंसाचार प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली आहे. लडाखला राज्याचा दर्जा आणि संविधानाच्या सहाव्या अनुसूचीच्या विस्तारासाठीच्या चळवळीच्या समर्थकांनी केलेल्या हिंसक निदर्शनांच्या दोन दिवसांनंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान या अटकेनंतर लडाखमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
लडाखचे डीजीपी एस डी सिंग जामवाल यांच्या नेतृत्वाखालील पोलिस दलाने दुपारी २.३० वाजता वांगचुक यांना ताब्यात घेतले. वांगचुक यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांबद्दल अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. गृह मंत्रालयाने लेह एपेक्स बॉडी (LAB) चे वरिष्ठ सदस्य वांगचुक यांना दोषी ठरवले होते, जे गेल्या पाच वर्षांपासून कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (KDA) सोबत मागण्यांच्या समर्थनार्थ आंदोलनाचे नेतृत्व करत आहे. हिंसाचाराला कारणीभूत ठरणाऱ्या चिथावणीबद्दल गृह मंत्रालयाने दोषी ठरवले होते.
दरम्यान वांगचुक यांनी आरोप फेटाळले. त्यांनी हिंसाचाराचा निषेध केला आणि बुधवारी झालेल्या हिंसाचारानंतर पंधरा दिवसांचे उपोषणही सोडले.