चंद्रपूर – कोरोनाच्या दुसर्या लाटेमुळे महाराष्ट्रात बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राज्यात संचाबंदी लावण्यात आलेली आहे. परंतु काही ठिकाणी हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटना रोजच घडत असल्याने परिस्थितीचे गांभीर्य अधिक गडद झाले आहे.
चंद्रपूरमध्ये अशीच घटना उघडकीस आली आहे. कोरोनाग्रस्त वडिलांना उपचारासाठी गेल्या २४ तासात महाराष्ट्र आणि तेलंगणच्या अनेक रुग्णालयांमध्ये चकरा मारून सुद्धा युवकाला मदत मिळू शकली नाही. शेवटी वडिलांना बेड द्या अन्यथा त्यांचा जीव घ्या, असे म्हणण्याची वेळ मुलावर आली.
काय आहे पूर्ण प्रकरण
सागर किशोर नाहर्शिवार यांचे वडील आजारी आहेत. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रासह तेलंगणमधील अनेक रुग्णालयांमध्ये चकरा मारल्या. परंतु त्यांच्यावर उपचार होऊ शकले नाहीत. सागर वडिलांना मुंबईहून ८५० किमी दूर चंद्रपूरला पोहोचले. पण रुग्णांची संख्या अचानक वाढल्यामुळे आरोग्य व्यवस्था पूर्णपणे ढासळली. त्यामुळे रुग्णालये २४ तासांसाठी बंद ठेवण्यात आले होते.
मुलाची आपबिती
मुलगा सागर म्हणाला की, दुपारी तीन वाजेपासून रुग्णालयात चकरा मारत आहे. सर्वात प्रथम चंद्रपुरातील वरोरा येथील रुग्णालयात गेलो, तिथे बेड मिळाला नाही. त्यानंतर अनेक खासगी रुग्णालयात गेलो, तिथेही जागा मिळाली नाही. रात्री जवळपास दीड वाजता आम्ही तेलंगणकडे रवाना झालो. रात्री तीन वाजता तिथे पोहोचलो परंतु तिथेही उपचार होऊ शकले नाहीत. त्यामुळे आम्ही पुन्हा महाराष्ट्रात आलो आहोत. सध्या माझे वडील रुग्णवाहिकेत आहेत.
हतबल होऊन केली मागणी
रुग्णवाहिकेत वडिलांची तडफड पाहून सागर खूप दुःखी झाले. रुग्णवाहिकेत अनेक तास घालवल्यामुळे ऑक्सिजनही संपून जात आहे. त्यानंतर मात्र ते हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. या स्थितीत वडिलांना पाहू शकत नाही. वडिलांना बेड द्या अन्यथा त्यांना इंजेक्शन देऊन जीवनयात्रा संपवा, अशी आर्त हाक त्यांनी दिली.