मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रीमंडळात नव्याने सामील झालेल्या एका राज्यमंत्र्याच्या नियुक्तीपेक्षा त्याच्या अत्यंत साधे जीवन जगणाऱ्या आई-वडिलांची चर्चा जास्त होत आहे. भाजपचे तामिळनाडूतील संघटनेचे अध्यक्ष एल. मुरुगन यांना मंत्रीमंडळ विस्तारात राज्यमंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. ४४ वर्षांचे मुरुगन यांनी अथक परीश्रम घेतल्यानंतर त्यांना दिल्लीचे तिकीट मिळाले आहे.
राजकीय झगमगाटापासून त्यांचे आई-वलडील कोसो दूर आहेत. तामिळनाडूतील नामक्कल जिल्ह्यात कोन्नूर गावात दोघेही मजुरी करतात. मुरुगन केंद्रात मंत्री झाल्यावर माध्यमांचे प्रतिनिधी त्यांच्या घरी पोहोचले तर आई-वडील दोघेही शेतात काम करीत होते. दिल्लीपासून २५०० किलोमीटरवर हे गाव आहे.
लाल साडी-चोळीवर एक पांढरा शर्ट घालून शेतात राबणारी एल. मुरुगन यांची आई देशातील एका सर्वसामान्य महिलेसारखीच आहे. शेजारच्याच शेतात त्यांचे ६८ वर्षांचे वडील काम करीत होते. दोघांनाही बघून एका केंद्रीय मंत्र्याचे आई-वडील असल्याचे मूळीच वाटणार नाही, असे चित्र होते. माध्यमांच्या प्रतिनिधींना या दोघांशीही बोलण्याकरिता शेतमालकाशी चर्चा करावी लागली. मुरुगन यांच्याकडे मत्स्य पालन, पशुपालन आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाचा राज्यमंत्रीपदाचा कारभार आहे. यावर्षी ते निवडणूक जिंकले होते, मात्र डीएमकेच्या उमेदवाराकडून पराभूत झाले होते.
मुलाचा अभिमान, पण…
एल. मुरुगन यांच्या आई-वडिलांना आपला मुलगा मंत्री झाल्याचा आनंद आहे, मात्र त्यांचा स्वाभिमान कायम आहे. मुरुगन एक दलित तरुण असून अरुणथातियार समुदायाचे आहेत. गावात त्यांचे छोटेसे घर आहे. त्यांना आपला मुलगा मंत्री झाल्याचे कळले, पण त्यांनी काम थांबविले नाही. घाम गाळून, कष्ट करून पोट भरणे हाच त्यांचा स्वाभिमान आहे.
कर्ज घेऊन शिकवले
एल. मुरुगन अभ्यासात हुशार होते, त्यामुळे त्यांच्या वडिलांनी त्यांना कर्ज घेऊन शिकवले. सुरुवातीला सरकारी शाळेत शिक्षण झाले, नंतर चेन्नईच्या डॉ. आंबेडकर लॉ कॉलेजमधून त्यांनी विधी शिक्षण घेतले. त्यावेळीही वडिलांना मित्रांकडून पैसे उसने घ्यावे लागले होते. तामिळनाडू भाजपचा अध्यक्ष झाल्यावर मुरुगन यांनी आई-वडिलांना चेन्नईत आपल्याजवळ राहायला बोलावले होते. मात्र काहीच दिवसांत ते परत गावाला आले.