नाशिक – म्हसरूळ – आडगाव लिंकवरोडवर एका मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात साई दीपक देशमुख हा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बिबट्याने हा हल्ला केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्यामुळे बिबट्याने धूम ठोकली. आडगाव- म्हसरूळ लिंकरोडवर आळंदी कालव्यानजीक जाधव देशमुख वस्ती आहे. याठिकाणी शेतकरी दीपक त्र्यंबक देशमुख यांची शेती आहे. दीपक देशमुख यांचा मुलगा साई हा या रस्त्यावरून जात असताना त्याच्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. वनविभागाने घटनास्थळी पाहणी करत साई याचीही रुग्णालयात विचारपूस केली आहे. परिसरात बिबट्याचा वावर लक्षात घेता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे. याअगोदर सातपूरमध्ये बिबट्या आढळला. पण, त्याला वनविभागाने जेरबंद केले होते.