इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – महाराष्ट्राच्या संस्कृतीत जावयाचं वेगळच महत्त्व आहे. जावई घरी येणार म्हटल्यावर सासरच्या लोकांमध्ये वेगळाच उत्साह संचारतो. अर्थात काही घरं अपवाद असतात. पण सर्वसाधारणपणे प्रत्येक घरात जावई माझा भला, असेच चित्र असते. याची जबरदस्त प्रचिती देणारी घटना अलीकडेच आंध्रप्रदेशमध्ये घडली.
एका सासूने जावई येणार म्हणून चार दिवस राबून १७३ प्रकारचे पक्वान्न तयार केले. सासूचे जावयावरील प्रेम बघून अनेकांनी तोंडातच बोटे घातली. तसं जावयाच्या आदरातिथ्याला महत्त्व आहेच. पण एखाद्या सासुरवाडीत जावयासाठी एवढी जय्यत तयारी व्हावी, हे जरा दुर्मिळच. आंध्र प्रदेशातील हैदराबादमध्ये पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील या दुर्मिळ जावई प्रेमाची चर्चा आता सर्वत्र होऊ लागली आहे. येथील व्यापारी टाटावर्ती बद्री यांनी संक्रांतीच्या निमित्ताने जावई पृथ्वीगुप्त चावला आणि श्री हरिका यांना आमंत्रित केले होते. जावई आणि मुलगी यांच्या येण्याचे विशेष कौतुक करण्यामागे कारणही तसच होतं. गेली दोन वर्षे कोरोनामुळे दोघेही येऊ शकले नव्हते. त्यामुळे संक्रांत एकत्र साजरी करता आली नव्हती. आता कोरोनानंतर पहिल्यांदाच संपूर्ण कुटुंब एकत्र आल्यामुळे जय्यत तयारी करण्यात आली.
डायनिंग टेबलवर मांडले पदार्थ
सासूबाईंनी केलेले १७३ पदार्थ डायनिंग टेबलवर मांडण्यात आले. आणि त्यानंतर सगळे एकत्र जेवायला बसले. या पदार्थांमध्ये बाजरी, पुरी, कारले, हलवा, पापड, लोणचे, मिष्ठान्न, सॉफ्ट ड्रिंक आणि गोळी सोडाचा समावेश होता.
मुलीचा आनंद गगनात मावेना
सासरच्या मंडळींकडून करण्यात आलेल्या स्वागताने जावई तर भारावलाच. पण मुलीचा आनंदही गगनात मावेनासा होता. आईने चार दिवस राबून आपल्या नवऱ्यासाठी केलेले पक्वान्न खाताना लेकीच्या डोळ्यात अश्रू तरळले होते.
Son In Law Welcome 173 Food Items Prepared Video Viral