इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – राजस्थानमधील कोटा जिल्ह्यात एक विचित्र घटना समोर आली आहे. येथे मुलाने वडिलांना मृत मानले आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. अंत्यसंस्कारानंतर नऊ दिवस सर्व धार्मिक विधीही पार पडले. पण, दहाव्या दिवशी त्याला वडील जिवंत असल्याचे कळले. वडिलांचा मृतदेह म्हणून ज्याच्यावर अंत्यसंस्कार केले ते दुसरेच कोणीतरी असल्याचे त्याला समजले. आता मृतदेहावर अंत्यसंस्कार कोणाचे झाले, याचा तपास पोलिस करत आहेत.
अयाना पोलिस स्टेशनचे प्रभारी प्रल्हाद सिंह यांनी सांगितले की, हे प्रकरण गुमानपुरा गावातील आहे. नथुराम हा ७५ वर्षीय व्यक्ती ७ जानेवारी रोजी घरातून न सांगता निघून गेला होता. मानसिकदृष्ट्या कमकुवत नथुरामचा नातेवाईकांनी खूप शोध घेतला. पण त्याच्याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. यावर नथुरामचा मुलगा राजाराम याने अयाना पोलिस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली.
त्याचदिवशी सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्या मृतदेहाचा चेहरा बेपत्ता नथुरामच्या चेहऱ्यासारखाच होता. यावर राजारामने मृतदेह वडिलांचा असल्याचे ओळखले. पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून मृतदेह राजाराम यांच्या ताब्यात दिला.
राजारामने ७ जानेवारीलाच मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. यानंतर सर्व प्रकारचे धार्मिक विधीही पार पडले. दरम्यान, सोमवारी पोलिसांच्या गस्तीदरम्यान विजयपुरा कालव्याजवळ एक वृद्ध थंडीने थरथरत असताना आढळून आला. पोलिसांनी त्याला पोलीस ठाण्यात आणून विचारपूस केली असता त्याने आपल्या नातेवाईकांची काही माहिती दिली. तपासात नथुराम हे राजारामचे वडील असल्याचे समोर आले.
यावर पोलिसांनी राजारामला बोलवून वडिलांशी ओळख करून दिली. पिता-पुत्र एकमेकांना पाहून भावूक झाले. नंतर राजाराम आपल्या वडिलांना घरी घेऊन गेला. थंडीमुळे मृतदेहाचा चेहरा विद्रूप झाल्याचे राजाराम यांनी पोलिसांना सांगितले. त्यामुळे त्याची ओळख पटवण्यात चूक झाली. आता ज्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे, त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे राहिले आहे.