इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – आई-वडील मुलांना मोठे करतात. त्यांचे पालनपोषण करतात. एका वयानंतर मुले आपला आधार होतील, अशी आस धरून पालक जगत असतात. मात्र, नियती कधी कशी कुणावर अन्याय करेल सांगता येत नाही. उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे अशीच एक घटना घडली असून एका १४ वर्षांच्या मुलाने वडीलांच्या कुशीत जीव सोडल्याचा हृदयद्रावक प्रकार पुढे आला आहे.
काही महिन्यांपूर्वी कुत्र्याने चावल्याचे निमित्त झाले आणि होत्याचे नव्हते झाले. काही महिन्यांपूर्वी शेजारी राहणाऱ्या एका महिलेच्या कुत्र्याने १४ वर्षांच्या मुलाला चावा घेत जखमी केले होते. मुलाने भीतीपोटी ही गोष्ट घरात सांगितली नाही आणि काही महिन्यांनंतर रेबीजची लागण झाल्याने त्याचा मृत्यू झाला. मृत मुलाच्या आजोबांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी मुलाला कुत्रा चावला होता, मात्र भीतीमुळे त्याने ही गोष्ट घरी सांगितली नाही आणि हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली.
मुलाची अवस्था पाहून पालकांनी त्याची विचारपूस केली. तेव्हा त्याने परिसरातील कुत्र्याने चावा घेतल्याचे सांगितले. मुलाला त्यानंतर जिल्ह्यातील इतर अनेक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, मात्र उपचार झाले नाहीत. याच दरम्यान मृत्यू झाला. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, मुलाला दिल्लीच्या जीटीबी आणि एम्समध्ये नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी हा आजार असाध्य असल्याचे घोषित केले. यानंतर मंगळवारी सायंकाळी रुग्णवाहिकेतच वडिलांच्या कुशीत मुलाचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर कुटुंबासह परिसरात शोककळा पसरली आहे. शाहवेज हा आठवीच्या वर्गात शिकत होता.
कारवाई करा अन्यथ दंड
गाझियाबाद पोलिसांनी या प्रकरणी कुटुंबीयांच्या विनंतीवरून गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. शिवाय या संपूर्ण प्रकरणात महापालिकेने नोटीसही बजावली आहे. मृत मुलाच्या कुटुंबीयांनी ज्या महिलेवर आरोप केले आहेत तिला ही नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीसमध्ये लिहिले आहे की, कुत्र्यामुळे आसपासच्या लोकांना त्रास होत असून रेबीज पसरण्याचाही धोका आहे. तुम्ही लवकरात लवकर सर्व कुत्र्यांचे लसीकरण करून घ्या, अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल आणि ५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला जाईल.
Son Child Death in front of Father in Ambulance
Ghaziabad NCR UP Dog Bite