इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० च्या अंमलबजावणीत माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल महावितरणला शुक्रवारी गव्हर्नन्स नाऊ या प्रकाशनातर्फे नवी दिल्ली येथे आयोजित अकराव्या सार्वजनिक उद्योग पुरस्कार सोहळ्यात दोन राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले.
महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांनी या यशाबद्दल कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महावितरणला ‘एक्सलन्स इन प्रोसेस इनोव्हेशन’ आणि ‘बेस्ट यूज ऑफ ऑटोमेशन अँड डिजिटल टेक्नॉलॉजीज’ या दोन गटात सर्वोत्कृष्ट कामगिरीचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. महावितरणचे अधीक्षक अभियंता (नवीकरणीय ऊर्जा) निखिल मेश्राम यांनी कंपनीच्या वतीने हे पुरस्कार स्वीकारले.
अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांच्या मार्गदर्शनात राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना २.० ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. यामध्ये महावितरणची प्रमुख भूमिका आहे. विकेंद्रित स्वरुपात ठिकठिकाणी सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प उभारून त्याद्वारे कृषी पंपांना दिवसा वीज पुरवठा करण्याची ही योजना आहे.
सौर ऊर्जानिर्मिती पार्क उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमिनीची आवश्यकता असते. महावितरणच्या वीजनिर्मिती केंद्रांपासून पाच व दहा किलोमीटर अंतरावरील जमिनी निश्चित करणे, सौर ऊर्जानिर्मीतीसाठी त्या भाड्याने मिळविणे, सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्पांसाठी माहितीसाठा तयार करणे, प्रकल्पांची मंजुरी, योजनेची अंमलबजावणी करणे अशा सर्व कामांसाठी महावितरणने एक स्वतंत्र पोर्टल विकसित केले. त्यामुळे योजनेची अंमलबजावणी गतीने आणि पारदर्शक पद्धतीने करता आली. या कामगिरीमुळे महावितरणला ‘एक्सलन्स इन प्रोसेस इनोव्हेशन’, या गटात सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार मिळाला.
महावितरणने वीज उपकेंद्रांची देखभाल करण्यासाठी आणि अत्याधुनिक कमांड अँड कंट्रोल सेंटर उभारणीमध्ये माहिती तंज्ञानाचा प्रभावी वापर केल्याबद्दल कंपनीला दुसरा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. राज्यातील ३,५६३ वीज उपकेंद्रांच्या देखरेखीसाठी ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’ बसविण्यात येत आहे. यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेसाठीच्या सौर ऊर्जीकरण होणाऱ्या २,७७३ उपकेंद्रांचा समावेश आहे. ‘सबस्टेशन मॉनिटरिंग सिस्टिम’मुळे प्रत्येक वीज केंद्रातील विविध उपकरणांची स्थिती, बिघाड, विजेची मागणी व पुरवठा इत्यादींची माहिती तातडीने उपलब्ध होऊन निर्णय प्रक्रिया गतीमान होत आहे. महावितरणने मुख्यालयात विकसित केलेल्या कमांड अँड कंट्रोल सेंटरमुळे राज्यभरातील वीज पुरवठ्यावर देखरेख ठेवणे आणि महत्त्वाच्या बाबीत तातडीने निर्णय करणे शक्य झाले आहे. या उपक्रमात आर्टिफिशिअल इंटिलिजन्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज व मशिन लर्निंग या अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.