येवला (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– अल्पभूधारक शेतकऱ्यांना प्रामुख्याने भेडसावणारा प्रश्न म्हणजे मजुरांवर तसेच ट्रॅक्टर व शेती अवजारांवर होणारा खर्च.. यावर मात करण्याकरता धानोरे येथील मातोश्री पॉलिटेक्निक मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागात अंतिम वर्षात शिकणारे आदिवासी प्रवर्गातील विद्यार्थी चंद्रकांत टोपले,उमेश महाले,मनोज गावित,खुशाली गावित यांनी सोलरवर चालणारे कल्टिवेटर अन कोळपणी यंत्र बनवले आहे.
हे यंत्र बनवण्याचा उद्देश इंधनाचा खर्च टाळण्यासाठी तसेच शेत मजुरांवर अवलंबून न राहता सौरऊर्जेच्या मदतीने शेतीसाठी आवश्यक असलेली कोळपणी आणि कल्टिवेटर करणे आणि यांत्रिक शेतीचा आणि मजुरीचा वाढता खर्च कमी करणे हा आहे.या यंत्रासाठी विद्यार्थ्यांना फक्त ८ हजार रुपये एवढा खर्च आला आहे.या सोलर कल्टिवेटरमध्ये सौर पॅनल्सचा वापर करून इलेक्ट्रिक मोटरने हे चालवून शेतीची आवश्यक असलेली कोळपणी आणि कल्टीवेटर हे काम करते. त्यामुळे डिझेल किंवा पेट्रोलसारख्या पारंपरिक इंधनांचा वापर कमी होतो आणि उत्पादन खर्चातही मोठी बचत होते. हे यंत्र मका, बाजरी, कपाशी, टॉमेटो या पिकांसाठी शेतकरी वापरू शकतो.
या सोलर यंत्राचा वापर करून शेतकरी दोन ते अडीच तासांमध्ये एक एकर शेताची कोळपणी करू शकतो तेही विना कुठल्या खर्चाशिवाय.
सदर प्रोजेक्ट करिता महाविद्यालयाचे प्राचार्य गीतेश गुजराथी,विभागप्रमुख योगेश खैरनार,विलास गुजर,अभिजित जगताप यांचे मार्गदर्शन लाभले.
अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल
“मी सुरगाणा येथून शालेय शिक्षण घेतल्यानंतर येवला येथील मातोश्री पॉलिटेक्निक येथे शिष्वृत्ती योजनेतून इंजिनिअरिंग डिप्लोमाचे मोफत शिक्षण घेतले.अंतिम वर्षात माझ्या शिक्षकांच्या माध्यमातून।मी प्रोजेक्ट केला,जो यशस्वी झाला व त्याचे उत्पादन करून मी बाजारात विकणार आहे.जेणेकरून अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळेल.”
चंद्रकांत टोपले,रा.सुरगाणा,विद्यार्थी
नक्कीच शेतकऱ्यानं उपयुक्त
डिप्लोमा शिक्षणानंतर विद्यार्थ्याने स्वतःचा व्यवसाय उभा करावा या उद्देशाने विद्यार्थ्यांना विविध प्रशिक्षण दिले जाते व अंतिम वर्षात प्रोजेक्ट तयार करून घेतले जातात.कृषी क्षेत्राशी निगडीत तयार केलेले उपकरण नक्कीच शेतकऱ्यानं उपयुक्त ठरेल”
डॉ.गीतेश गुजराथी,प्राचार्य,मातोश्री पॉलिटेक्निक,येवला