सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शिक्षकांनी विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देणे कर्तव्य आहे. शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, नैतिक मूल्यांची वाढ, चारित्र्य संपन्न होण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
जिल्हा परिषद शाळा पापरी ता. मोहोळ येथील स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रमाच्या पाहणीदरम्यान उपमुख्यमंत्री श्री पवार बोलत होते. श्री. पवार म्हणाले, शिक्षक हे उद्याची पिढी घडवीत असल्याने अंधश्रद्धेला खतपाणी मिळू नये, याची दक्षता घ्यावी. गुणवत्तेबाबत सातत्य ठेवावे. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून शाळांचा विकास करण्याचा प्रयत्न करावा. शिक्षकांनी जास्तीचे काम करायला लागले तरी करून विद्यार्थी चांगले घडविण्याचा प्रयत्न करा. शिक्षणाशिवाय तरणोपाय नसल्याने गरीब विद्यार्थ्यांनी शासन देत असलेल्या मोफत शिक्षणाचा लाभ घेऊन आई वडील गावाचे नाव उज्वल करावे.
अभिनव उपक्रमाचे स्वागत
सोलापूर जिल्हा परिषदेने स्वच्छ शाळा सुंदर शाळा हा अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमाचे श्री. पवार यांनी कौतुक केले. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील अडीच हजार शाळांचे रूप पालटले आहे. आता त्या संपूर्ण शाळा गुणवत्तापूर्ण व्हाव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राज्यातील शाळांनी सोलापूरचा आदर्श घ्यावा
तब्बल आठ कोटी रुपये लोकवर्गणी उभा करून सोलापूर जिल्हा परिषदेने शाळांचे रूप पालटले आहे. राज्यातील शाळांनीही सीएसआर निधी, आमदार निधी आणि लोकवर्गणीतून शाळा स्वच्छ आणि सुंदर करण्याचा प्रयत्न करावा, हा उपक्रम संपूर्ण राज्यभर राबवावा, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक शाळेला कंपाउंड करा
यंदाच्या बजेटमध्ये पाच टक्के निधी शिक्षण विभागावर खर्च करण्यात येणार आहे. मुले-मुली सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येक शाळेने कंपाउंड करून घ्यावे. प्रत्येक शाळेच्या ठिकाणी बगीचा करावा, फुल झाडे लावावीत, त्यामुळे शिक्षणाला चांगले वातावरण निर्माण होईल, मुलांना स्वच्छतेची आवड आपोआप निर्माण होईल, असेही श्री पवार म्हणाले.
पापरी शाळेला गायरानची अडीच एकर जागा
पापरी शाळेची गुणवत्ता सुधारली असून इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत 662 विद्यार्थी येथे शिक्षण घेत असल्याची माहिती देण्यात आली. मुलांना खेळण्यासाठी मैदान नसल्याने शाळेच्या बाजूला असलेल्या गायरान जमिनीमधून अडीच एकर जागा देण्याच्या सूचना श्री पवार यांनी दिल्या.
माजी सैनिकांचा गौरव- त्यांना आदरांचे स्थान द्या
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रातिनिधीक स्वरूपात दोन माजी सैनिकांचा गौरव उपमुख्यमंत्री श्री पवार आणि पालकमंत्री श्री. भरणे यांच्या हस्ते करण्यात आला. माजी सैनिकांनी कुटुंबाची पर्वा न करता देशहितासाठी झोकून दिले. त्यांना समाजाने आदराचे स्थान, मानसन्मान द्यावा. एक दिवस माजी सैनिकांसाठी हा जिल्हा परिषदेचा स्तुत्य उपक्रम आहे.
उपमुख्यमंत्र्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद
दरम्यान श्री. पवार यांनी आज पापरी शाळेच्या पहिली आणि दुसरीच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तुम्हाला पाढे येतात का…. शिक्षक शिकवितात का…. गणवेश मिळाला का… असे प्रश्न त्यांनी विद्यार्थ्यांना केले. विद्यार्थ्यांनी दिलखुलास उत्तरे दिली. श्री. पवार यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार यशवंत माने, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील, प्रांताधिकारी गजानन गुरव, तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील, शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार, सरपंच जयश्री कोळी, शाळेचे मुख्याध्यापक श्रीकांत खताळ यांच्यासह ग्रामस्थ, विद्यार्थी उपस्थित होते.