सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – सोलापूर हा धार्मिक पर्यटनस्थळांचा जिल्हा आहे. त्यामुळे या जिल्ह्याला तीर्थक्षेत्र जिल्ह्याचा दर्जा मिळण्यासाठी राज्य शासनाच्या संमतीने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठवू, अशी ग्वाही पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज येथे दिली.
महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी, आमदार सर्वश्री विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, रणजीतसिंह मोहिते पाटील, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या महाव्यवस्थापक श्रद्धा जोशी-शर्मा, पर्यटन संचालक बी. एन. पाटील, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, प्राचार्य चंद्रशेखर जयस्वाल, कार्यकारी अभियंता विनय वावधाने आदि उपस्थित होते.
महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीचे उद्घाटन झाल्याचे जाहीर करून पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले, भविष्यात या महाविद्यालयातून पर्यटन क्षेत्रासाठी सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार होतील. त्यातून सोलापूरच्या पर्यटन क्षेत्रवाढीसाठी मदत होईल. त्यामुळेच या महाविद्यालयाच्या उद्घाटनासाठी गुरूपौर्णिमेचा शुभ दिवस निवडला. पर्यटन आणि हॉटेलिंग क्षेत्रासाठी उत्तमोत्तम शिक्षण व्यवस्था या महाविद्यालयात केली जाईल. यासाठी आवश्यक निधीची तरतूद केली जाईल. तसेच होम स्टेसाठी येणाऱ्या पर्यटकांना आवश्यक सोयी सुविधा देण्यासाठी महिलांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात अभ्यासक्रमाचा समावेश केला जाईल, असे ते म्हणाले.
पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, या महाविद्यालयात सुरू होणारे पूर्ण वेळ पदवी व पदविका अभ्यासक्रम व लघु अभ्यासक्रम युवक व युवतींना एक पर्वणी ठरेल. विद्यार्थ्यांना पदवी व पदविका याव्यतिरिक्त महिलांना पर्यटन प्रशिक्षण, एमटीडीसी व पर्यटन संचालनालय कर्मचारी प्रशिक्षण, सर्वांसाठी पर्यटन अभ्यासक्रम, मार्गदर्शक प्रशिक्षण, हुनर से रोजगार तक प्रशिक्षण, आदरातिथ्य आधारित अभ्यासक्रम शिकवले जाणार असून, या महाविद्यालयामुळे राज्याच्या पर्यटन व शैक्षणिक क्षेत्रात भर पडली असल्याचे ते म्हणाले.
महाविद्यालयाच्या नामकरणाची घोषणा
लोकप्रतिनिधींच्या आग्रहानुसार या महाविद्यालयाचे नामकरण श्री स्वामी समर्थ महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी असे करत असल्याचे पर्यटन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी घोषित केले. उपस्थित सर्वच लोकप्रतिनिधींनी मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त करताना गुरूपौर्णिमेनिमित्त महाविद्यालयाचे उद्घाटन होत असल्याबद्दल आनंद व्यक्त करून सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनस्थळे अधिक असल्याने जिल्ह्यास तीर्थक्षेत्र दर्जा मिळावा, त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा मिळाव्यात, तसेच या महाविद्यालयाचे श्री स्वामी समर्थ महाविद्यालय असे नामकरण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. खासदार डॉ. महास्वामीजी यांनी ही योगभूमी असून, या जिल्ह्याला तीर्थक्षेत्रांचा जिल्हा म्हणून घोषित करावा, अशी मागणी केली.
आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास गतीने व्हावा, पर्यटकांना दर्जेदार सोयी सुविधा मिळाव्यात, यासाठी शासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. सोलापूर जिल्ह्यातील विविध धार्मिक पर्यटनस्थळांचा दाखला देऊन आमदार सुभाष देशमुख म्हणाले, या ठिकाणी कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात असून, रोजगार निर्मितीची क्षमता पर्यटन क्षेत्रात आहे. सोलापूर जिल्हा धार्मिक पर्यटनात जिल्हा रोल मॉडेल व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच, भाविकांना, पर्यटकांना अधिकाधिक चांगल्या सोयी सुविधा देण्यासाठी हॉटेल मालकांनीही प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.
दर महिन्यात पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांच्या आकडेवारीचा दाखला देऊन आमदार रणजीतसिंह मोहिते पाटील यांनी होम स्टे करणाऱ्या पर्यटकांचे उचित आदरातिथ्य होण्याच्या दृष्टीने महिलांना प्रशिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांचा विचार व्हावा, तसेच, पर्यटन मार्गदर्शकांची (गाईड) प्राचीन वारसा असलेल्या पर्यटनस्थळांच्या माहितीबाबतची परीक्षा घेऊन अधिकृत परवानाधारक मार्गदर्शक नेमावेत, असे मत व्यक्त केले.
आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सोलापूरचे तीर्थक्षेत्र पर्यटन वाढण्यासाठी विशेष सहकार्य करावे, असे आवाहन केले.
प्रारंभी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते महाविद्यालयाचे कोनशीला अनावरण व फीत कापून उद्घाटन करण्यात आले. तसेच मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रमांची माहिती देऊन पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी म्हणाल्या, सेवा क्षेत्रात सर्वाधिक वेगाने वाढणारे पर्यटन क्षेत्र आहे. महाराष्ट्रात पर्यटनाच्या अनेक संधी आहेत. राज्यातील पर्यटनस्थळे पर्यटकांचे आकर्षण असून, पर्यटकांचे उचित आदरातिथ्य केल्यास, या क्षेत्राला मोठा वाव आहे. या महाविद्यालयातून पर्यंटन क्षेत्राच्या अपेक्षा पूर्ण करणारे विद्यार्थी घडतील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रास्ताविक बी. एन पाटील यांनी तर आभार चंद्रशेखर जयस्वाल यांनी मानले. सूत्रसंचालन ऐश्वर्या हिब्बारे यांनी केले. कार्यक्रमाला सोलापूर हॉटेल असोसिएशनचे राकेश कटारे, उल्हास सोनी, प्रियदर्शन शहा, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी, कर्मचारी, महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजीविषयी
केंद्र शासनामार्फत महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेच्या सोलापूर या प्रकल्पास केंद्र शासनाच्या शासन निर्णयान्वये मान्यता मिळाली आहे. यासाठी पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विशेष प्रयत्न व सातत्यपूर्ण पराठपुरावा केला. हा प्रकल्प केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला असून सोलापूर येथील मजरेवाडी येथील ५ एकर जागेवर प्रशासकीय आणि शैक्षणिक इमारतीचे काम व हॉटेल मॅनेजमेंट महाविद्यालयासाठी लागणाऱ्या संयंत्रे, उपकरणे इत्यादी यांचे काम पूर्ण झाले आहे. तसेच महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड कॅटरिंग टेक्नॉलॉजी या संस्थेस राष्ट्रीय हॉटेल प्रबन्ध एवं केटरिंग टेक्नोलॉजी परिषद यांनी संलग्नता (AFFILIATION) दिले आहे. त्याअनुषंगाने २०२३ २४ या शैक्षणिक वर्षात पुढील अभ्यासक्रमास मान्यता देण्यात आली आहे.