इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सोलापूरः राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा सोमवारी थंडावल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी उमेदवार आणि नेत्यांवर हल्ल्याच्या घटना घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर दगडफेक केल्याची घटना ताजी असतानाच सोलापूरमध्ये शरद पवार गटाच्या माजी आमदाराला धमकी आली आहे. माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करून खंडणी मागण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हा प्रकार ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिपद्वारे उघड झाले आहे.
कदम यांना रिव्हॉल्वर लावून अपहरण करून पुण्यात नेण्याबाबतचा ऑडिओ आणि व्हिडीओ क्लिप पोलिसांच्या ताब्यात आहे. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांचे अपहरण करण्यासाठी पुण्यातील आबा काशीद नामक व्यक्तीने सुपारी दिली असल्याची माहिती समोर आली. मोहोळ येथील आकाश बाबर आणि धनराज भोसले नामक युवकांना रिव्हॉल्वर, गाडी आणि पैसे दिल्याचे उघड झाले आहे. गेल्या १५ दिवसांत रमेश कदम यांच्याबाबत दुसऱ्यांदा हा प्रकार पाहायला मिळाला आहे.
या प्रकरणी ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आकाश बाबर आणि धनराज भोसले या आरोपींना मोहोळ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, तर मुख्य सूत्रधार आबासाहेब काशीद याचा पोलिसांकडून शोध सुरू असून तीन पथके त्याच्या मागावर आहेत. आरोपींवर रिव्हॉल्वर दाखवून खंडणी मागणे किंवा जीवे मारण्यासाठी अपहरण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.