सोलापूर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आज येथे मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. छत्रपती संभाजी महाराज चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय या दरम्यान झालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले होते. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला चांगले यश मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. यापुढील मोर्चा हा प्रशासनाला न सांगता अचानक काढला जाणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मोर्चा सुरूच राहणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या मोर्चापूर्वी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. त्याबाबत आंदोलकांनी तीव्र रोष व्यक्त केला.
भाजपकडून निषेध
मराठा आरक्षणासाठी सोलापूरमध्ये आयोजित केलेल्या मोर्चाच्या विरोधात काँग्रेसच्या महाविकास आघाडी सरकारने प्रचंड पोलीस बळ वापरून दडपशाही केली, त्याचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करते. अशा प्रकारे आक्रोश दाबण्याचा सरकारचा प्रयत्न कधीही यशस्वी होणार नाही आणि मराठा समाज कधी झुकणार नाही, असा इशारा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला.
पाटील म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण न्यायालयाकडून रद्द झाले. त्याबद्दल आक्रोश व्यक्त करण्यासाठी आणि मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी कार्यकर्त्यांनी माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांच्या पुढाकाराने रविवारच्या सोलापूरमधील मोर्चासाठी जय्यत तयारी केली होती. त्यासाठी जिल्ह्यातील गावोगावातून हजारो कार्यकर्ते आणि सर्वसामान्य मराठा स्त्री पुरुष सोलापूरकडे रवाना झाले होते. पण सरकारने पोलिसी बळाचा वापर करून ठिकठिकाणी मराठा समाजाच्या आंदोलकांना अडवले आणि सोलापूरमधील मोर्चा होऊ नये यासाठी दडपशाही केली. मराठा समाजातील समन्वयकांना पोलिसांनी कालपासूनच नोटिसा बजावल्या होत्या. पण अशी दडपशाही करून सरकार मराठा समाजाचा आक्रोश दाबू पाहत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. दबाव आणला तर मराठा समाज सरकारविरोधात पेटून उठल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा पाटील यांनी दिला.