सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महानगरपालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत ग्रामदैवत श्री. सिद्धरामेश्वर मंदिर परिसरातील तलाव येथे “लाईट अँड साऊंड शो” हा सोलापूरकर नागरिकांसाठी स्तुत्य उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
सिद्धेश्वर तलाव येथे महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत राबवलेल्या “लाईट अँड साऊंड शो” या उपक्रमाचे लोकार्पण प्रसंगी पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. यावेळी खासदार जय सिद्धेश्वर स्वामी, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याण शेट्टी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर शहर पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, स्मार्ट सिटी चे कार्यकारी अधिकारी त्रिंबक डेंगळे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
या लाईट अँड साऊंड शो उपक्रमात म्युझिकल फाउंटन ऑन वॉटर स्क्रीन, लेसर थीम आणि लाईट शो बसवण्यात आला आहे. ऑडिओ व व्हिडिओ ट्रॅक मध्ये असलेल्या या शोचा कालावधी अर्ध्या तासाचा आहे. सोलापूर शहराचा इतिहास, स्वातंत्र्य लढ्यातील योगदान, ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे चरित्र तसेच त्यांनी केलेल्या समाज उपयोगी कार्याची माहिती, शहरातील मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेले हाजी शहाजूर वली यांचे चरित्र यांचा समावेश असलेला माहितीपट मराठी, कन्नड आणि हिंदी या तीन भाषेतून शोच्या माध्यमातून नागरिकांना दाखविण्यात येणार आहे, ही माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पालकमंत्री महोदय यांना दिली. तसेच या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यटकांच्या संख्येत ही वाढ होण्यास मदत मिळेल असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी पालकमंत्री श्री. विखे पाटील यांच्या हस्ते लाईट अँड साऊंड शोचे लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री यांनी हा शो पाहून महापालिकेने केलेल्या कामाचे कौतुक केले. तसेच हा उपक्रम सोलापूर शहराच्या वैभवात भर घालणारा आहे. शासन महापालिकेसोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.
नागरिकांसाठी शो सुरू होणार
लाईट अँड साऊंड शो हा दसऱ्याच्या दिवसापासून सोलापूर शहरातील नागरिक व येणाऱ्या पर्यटकांसाठी सुरू होणार आहे. हा शो सोमवार ते शुक्रवारी दररोज सायंकाळी 7:00 ते 7:30 वाजता मराठीतुन एक शो होईल व शनिवारी आणि रविवारी सायंकाळी 7:00 ते 7:30 व 8:00 ते 8:30 असे दोन शो मराठी व कन्नडमधून दाखविण्यात येतील. सोलापूर शहरातील नागरिकांनी व शहरात आलेल्या पर्यटकांनी या लाईट अँड साऊंड शोचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
Solapur Light and Sound Show Dasara Gift