संप्रदा बीडकर, सोलापूर
शेतीसोबत पूरक व्यवसाय करण्यावर अनेक शेतकरी भर देताना दिसतात. यामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन, दुग्ध व्यवसाय, रेशीम शेती असे अनेक पर्याय आहेत. सिद्धाराम निंगाप्पा ऐवळे यांनी दुग्ध व्यवसायाचा पर्याय निवडला. त्यांनी कृषि विभागाच्या कोरडवाहा क्षेत्र विकास कार्यक्रममध्ये पशुधन या घटकासाठी अर्ज करून योजनेचा लाभ घेतला आणि उत्पन्न वाढीकडे वाटचाल सुरू केली आहे.
सिद्धाराम ऐवळे हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गीचे. त्यांचे २ हेक्टर क्षेत्र असून ते जिरायत शेती करतात. मुलं, सुना, नातवंडे असा ११ जणांचा परिवार. शेतीच्या उत्पन्नातून घरखर्चाची बेजमी करताना नातवंडांना चांगले शिक्षण पण मिळावे, यासाठी शेती बरोबर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी ते नियोजन करत होतो. पण आर्थिक अडचणीमुळे शक्य होत नव्हते. शेतीशिवाय अन्य उत्पन्नाचे मार्ग नसल्याने ते निराश होते.
दरम्यान सन २०२२-२३ वर्षासाठी कोरडवाहु क्षेत्र विकास कार्यक्रममध्ये मौजे निंबर्गीची निवड झाल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यातून आपल्या दुग्ध व्यवसाय करण्याच्या छुप्या आशेला काही वाव आहे का, याची त्यांनी माहिती घेतली. कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार श्री. ऐवळे यांनी पशुधन या घटकासाठी अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अर्ज केला. त्यानंतर जुलै २०२२ मध्ये झालेल्या मौजे निंबर्गीच्या विशेष ग्रामसभेत अधिकारी व कर्मचारी, पदाधिकारी, शेतकरी यांच्यासमोर चिट्टयाव्दारे सोडत काढून शेतकरी निवड करण्यात आली. त्यात श्री. ऐवळे यांना संधी मिळाली.
योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर कृषि विभागामार्फत पूर्वसंमती देण्यात आली. याबाबत सिद्धाराम ऐवळे म्हणाले, कृषि विभागाची समिती, पशुवैद्यकीय अधिकारी व विमा प्रतिनिधी समोर मी दोन जर्सी गाय (दुसऱ्या विताचे गाभण) ९५ हजार रूपयांमध्ये खरेदी केल्या. त्यातील रक्कम रूपये ४० हजार मला कोरडवाहु क्षेत्र विकास कार्यक्रममध्ये अनुदान मिळाले. दोन गायींच्या हिरव्या चाऱ्यासाठी एक हेक्टर मका व कडवळाची लागवड केली. दोन गायी व्याल्या असून, सकाळ व संध्याकाळ असे एकूण एक्केचाळीस लिटर दूध डेअरीला मी रोज घालत आहे.
सर्व साधारणपणे दुधाच्या फॅटनुसार ३८ रुपये प्रति लिटर याप्रमाणे १५५८ रुपये प्रतिदिन उत्पन्न मला मिळत आहे. दररोजचा जवळपास ५३८ रुपये खर्च वजा जाता साधारण एक हजार रुपये प्रतिदिन निव्वळ उत्पन्न मिळत आहे. तसेच माझ्या शेतीकरिता आजअखेर एक टन शेणखतही उपलब्ध झालेले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केल्याबद्दल मी कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करतो.
सिद्धाराम ऐवळे यांना तालुका कृषि अधिकारी रामचंद्र माळी, मंडल कृषि अधिकारी के. एम. लादे, कृषि सहायक अशोक राठोड यांचे मार्गदर्शन लाभले. एकूणच पशुधनामुळे सिद्धाराम ऐवळे यांच्या शेतीच्या उत्पन्नाला हातभार लागला असून, त्यांच्या मोठ्या परिवाराचा घरखर्च भागत आहे. गोधनामुळे श्री. ऐवळे यांची एक प्रकारे समृद्धीकडे वाटचाल सुरू आहे.
Solapur Farmer Success Story Animal Farming