सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जमिनीच्या वादातून निर्दयी काकाने चार वर्षाच्या पुतणीची नदीत फेकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली. आईच्या नावावर असलेली शेतजमीन स्वतःच्या नावावर करून घेण्याचा हा वाद होता, असे तपासात पुढे आले आहे.
सोलापूर येथील मोहोळ तालुक्यात ही घटना घडली. यशोदीप धावणे असे काकाचे नाव असून ज्ञानदा धावणे असे चार वर्षांच्या चिमुकलीचे नाव आहे. मोहोळ येथील डिकसळ गावात यशोदीप धावणे यांची वडिलोपार्जित शेतजमीन आहे. एकूण सोळा एकर जमिनीचे तीन हिस्से असून यातील सहा एकर आईच्या व पाच एकर प्रत्येकी दोन भावांच्या नावावर आहे. यशोदीप धावणे आणि यशोधन धावणे या दोन्ही भावांचा आईच्या नावावर असलेल्या जमिनीवरून वाद सुरू होता.
यशोधन यांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोदीप यांचा आईच्या जमिनीवर डोळा होता. त्यासाठी तो सातत्याने भांडण करीत होता. यशोदीप याला गावकऱ्यांनीही समजावून सांगितले होते. पण २० फेब्रुवारीला त्याने पुन्हा भांडण केले. आईच्या नावावर असलेल्या सहा एकर जमिनीची वाटणी का होऊ दिली नाही, यासाठी त्याने यशोधन व त्याच्या बायकोसोबत वाद घातला. तसेच शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. पण सख्खा काका आपल्या चिमुकल्या पुतणीचा जीव घेईल, याची कल्पनाही कुणी केली नव्हती.
ज्ञानदा घरीच नव्हती
यशोधन आणि त्यांची पत्नी शेतातून काम करून परतल्यानंतर बघितले तर ज्ञानदा घरी नव्हती. त्यांनी चौकशी केली असता ती घरात झोपली आहे, हेच कुटुंबियांना माहिती होते. पण काही लोकांनी यशोदीपच्या गाडीवर ती बाहेर गेल्याचे सांगितले. म्हणून यशोधनने त्याला फोन केला तर आपण तुझ्या मुलीला नदीच्या पात्रात फेकून दिले आहे, असे यशोदीपने सांगितले.
वादातून काय साध्य झाले?
यशोदीप यांचा जमिनीचा हट्ट निरर्थक होता. कारण आई जीवंत असताना तिच्या नावावरील जमिनीत हिस्सा मागणे चुकीचे होते. भावांमध्ये दररोज भांडणं व्हायची. शिविगाळ व्हायची. पण सख्खा काका आपल्या चिमुकल्या पुतणीला नदीत फेकून देईल, असे कुणालाही वाटले नव्हते.
Solapur Crime Uncle Threw 4 Year Niece in River