सोलापूर (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – कांदा प्रश्नांवरुन एकीकडे राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत असतांना दुसरीकडे सोलापूर येथे एका कांदा अडत व्यापा-याला साडे चार कोटीला गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. या फसवणूक प्रकरणात केरळमधील नजीब हमजा अंचलन, फतेह हमजा अंचलन या दोन भावांडावर जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर सोलापूर शहर आर्थिक गुन्हे शाखेकडे तपासासाठी तो वर्ग करण्यात आला आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील भारत ओनियन या दुकानातून या दोघा भावांडानी २३ ऑक्टोबर २०१९ ते २० ऑक्टोबर २०२१ या कालावधीत कांदा खरेदी केला होता. तो जवळपास ४ कोटी ५५ लाख ९५ हजार रुपयाचा होता. हा कांदा खरेदी केल्यानंतर दोन वर्षे उलटूनही या दोघांनी कांद्याचे पैसे दिले नाही. त्यामुळे भारत ऑनियनचे मालक साजिद हुसेन अजमेरी यांनी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरुवातीला केरळच्या या दोघा भामट्या व्यापा-यांनी खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे दिले. पण, त्यानंतर त्यांनी विश्वास संपादन करुन हा गंडा घातला. नाशिक जिल्हयातही असे व्यापा-यांना गंडा घातल्याचे प्रकार अगोदर घडलेले आहे. तर द्राक्ष उत्पादक शेतक-यांनाही परप्रांतीय व्यापा-यांनी गंडा घातला आहे. त्यामुळे ही फसवणूक व्यापाराला मारक आहे.
Four and a half crores were extorted from the onion trader
Solapur Crime Onion Trader Cheating Crore