पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – चंद्रपूर-गडचिरोली सारख्या अत्यंत दुर्गम, आदिवासी भागात आणि घनदाट जंगलात कुष्ठरोगी आणि आदिवासींचे वैद्यकीय सेवा करणारे थोर समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांची प्रकृती आणखी खालावली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना कर्करोग असल्याचे नुकतेच उघड झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ते घरी परतले होते. आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या चार दशकांपासून डॉ. प्रकाश आमटे यांनी आरोग्य सेवेचा वसा आणि वारसा चालवत आहेत. त्यांच्या कार्याची भारतातच नव्हे तर जगभरात मोठी ओळख निर्माण झाली आहे. त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. सध्या डॅा. प्रकाश बाबा आमटे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.
डॉ. आमटे हे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या दीक्षांत समारंभासाठी पुण्यात आले असता त्यांना ताप आणि खोकल्याचा त्रास जाणवला. म्हणून त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना कर्करोग असल्याचे निदन झाले. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे. डॉ. आमटे यांचे चिरंजीव अनिकेत आमटे यांनी समाज माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.
तपासण्यांमधून ल्युकेमियाची म्हणजे रक्ताच्या कर्करोगाची सुरुवात असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही दिवस उपचारानंतर आता पुन्हा त्यांची तब्ब्येत खालावली आहे. आता पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अनिकेत यांनी फेसबुक पोस्टद्वारे माहिती दिली आहे.
अनिकेत आमटे यांनी फेसबुक पोस्टमध्ये लिहिले आहे की,
“बाबांना काल परत admit केले आहे. आता सर्व visitors ना पूर्ण प्रवेश बंद केलाय डॉक्टरांनी. बाबांच्या फोन वर कॉल करू नये. ताप अजून आहे. गेली 5 दिवस झाले पुन्हा इन्फेक्शन झाले आहे आणि high fever आहे. आज काही टेस्ट होतील. त्याचे रिपोर्ट २-३ दिवसांनी येतील. जे काही असेल अपडेट ते सोशल मीडिया वर टाकत जाईन. कृपया फोन करून तब्येत विचारू नका. कृपया त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना पण कॉल करून त्रास देऊ नये. योग्य उपचार सुरू आहेत. माझ्या व्हॉट्सअप मेसेज वर कधीतरी चौकशी करू शकता. मोबाईलवर पर्सनल मेसेज करून विचारपूस करावी ही विनंती. लगेच उत्तराची अपेक्षा करू नये. आपले प्रेम आणि काळजी आम्ही समजू शकतो पण या टेन्शन मध्ये आणि बिझी असल्याने उत्तर लगेच मिळेल ही अपेक्षा करू नये. समजून घ्याल ही अपेक्षा. Dinanath Mangeshkar Hospital Pune येथे येऊन गेले असल्यास खाली रजिस्टर ठेवले आहे त्यावर आपण शुभेच्छा संदेश, नाव, पत्ता, मोबाईल नंबर लिहावा. भेटीची अपेक्षा आणि आग्रह मुळीच करू नये. बरे झाल्यावर नक्की भेटायला यावे हेमलकसाला.”