नाशिक – २००५ साली नाशिकमध्ये बिल अँड मिलिंडा गेट्स फाउंडेशनचा देहविक्री करणाऱ्या स्त्रिया आणि समलिंगी यांच्यासाठी एचआयव्ही जनजागृती विषयी एक प्रोजेक्ट सुरू होत होता. प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या माध्यमातून तो प्रोजेक्ट राबविण्यात येणार होता. सुरुवातीला या घटकांपर्यंत पोहोचणं आणि जनजागृती हा उद्देश होता. पण त्या महिलांचं म्हणणं होतं की संस्था येतात, कार्यक्रम करतात, फोटो वर्तमानपत्रात छापतात आणि निघून जातात. पण आमच्या जगण्यात काहीही बदल होत नाही. आरोग्याविषयी आम्हाला काही ऐकायचं नाही. आमचे प्रश्न खूप वेगळे आहेत. असं म्हटल्यावर आम्ही त्यांच्या प्रश्नावर काम करायला सुरुवात केली पण सुरुवातीला त्यांचा विश्वास संपादन करणं आव्हानात्मक होतं, असे मत सामाजिक कार्यकर्त्या आसावरी देशपांडे यांनी व्यक्त केले.
इंडिया दर्पण तर्फे महिला दिन विशेष फेसबुक लाइव्हमध्ये त्या बोलत होत्या. बागेश्री पारनेरकर हिने मुलाखत घेतली. पुढे त्या म्हणाल्या की, सुरुवातीला आमच्या कार्यकर्त्यांना त्यांनी हाकलून दिलं, अंगावर गरम पाणी फेकलं. त्या म्हणायच्या की आम्हाला तुमची गरज नाही. आमच्या समस्या पोलीस रेड, मुलांच्या शिक्षणविषयक समस्या आहेत. त्या कोणीही सोडवत नाही. आरोग्यविषयक जनजागृती बरोबर आम्ही त्यावेळी या समस्या सोडवण्यावर भर दिला. त्यावेळी हिमांशू रॉय हे पोलिस आयुक्त होते. त्यांचा दृष्टिकोन खूप चांगला होता. त्यांनी त्यावेळी एका व्यासपीठावर या सगळ्या महिला आणि पोलिसांचा संवाद घडवून आणला. आणि तो कार्यक्रम आमच्या प्रोजेक्टसाठी टर्निंग पॉईंट ठरला. त्या महिलांचा आमच्यावरचा विश्वास वाढला. ही संस्था खरच आपल्यासाठी काहीतरी करेल हे त्यांना पटलं.
सुरुवातीच्या अनुभवाविषयी त्यांनी सांगितले की, पहिल्या चार पाच महिन्यात फक्त १-२ स्त्रिया चेकअप साठी यायच्या. मग आम्ही त्यांना पटवून दिले की तुम्हाला मुलांसाठी जगावं लागेल आणि चांगलं आरोग्य ठेवून जगायचं आहे. मग हळूहळू मुलांचा शाळेतील प्रवेश, रेशन कार्ड, सरकारी बँकेत खाती उघडून दिली. सेव्हिंगच महत्त्व पटवून दिले. त्यांच्याकडे महत्त्वाची कागदपत्रे नव्हती अशावेळी बँकेच्या मॅनेजरशी बोलून त्यांना मदत केली. सुरुवातीचे ४ वर्ष एकही प्रेस रिलीज आम्ही केली नाही. कारण त्यांच्या मनात फोटो छापून येतील याची भीती होती. त्यांच्या परवानगीशिवाय आम्ही काहीही करायचं नाही असं ठरवलं. समाजाच्या मानसिकतेविषयी त्या बोलल्या की, आजही समाजाची मानसिकता, दृष्टिकोन फार बदललेला नाही. सुरुवातीला ऑफिस शोधताना पण खूप त्रास झाला. आम्ही समलिंगी आणि देहविक्री करणाऱ्या स्त्रियांसाठी काम करणार तर त्या ऑफिसमध्ये येतील अस सांगितल्यावर कोणी जागाही देत नव्हते. पण आता काही प्रमाणात दृष्टिकोन बदलत आहे. त्यांचं पुनर्वसन करताना त्यांचा आहे त्या परिस्थितीत स्वीकार करणं गरजेचं आहे. संयम ठेवून काही कालावधी जाऊ द्यायला हवा. त्या ही समाजतील महत्त्वाचा घटक आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे.
पुढे त्या म्हणाल्या की, या सगळ्या प्रवासात घरच्यांची खूप साथ मिळते. तुला जिथे रिस्क वाटते ते काम सांभाळून कर पण जिथे खात्री वाटते, तू सामोरी जाऊ शकते ते तू बिनधास्त काम कर, अस माझे पती मला कायम सांगतात. पुढे त्यांनी सांगितले की नुकताच गंगुबाई काठियावाडी या चित्रपटाच स्पेशल शो या महिलांना दाखवला. त्या खूप भावुक झाल्या. आताच्या काळात त्यांना प्रेरणादायी सांगण्यापेक्षा काही चांगल्या कलाकृती दाखवणही गरजेचे आहे. आपल्या समाजातील एक महिला आहे हे पाहून त्यांना खूप आनंद झाला. महिला दिन एक संधी आहे, आपल्या मनातील विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची. पण नुसता महिला दिन साजरा करून महिला सक्षम होणार नाहीत. त्यासाठी आजच्या काळात ज्या पद्धतीने स्त्री बदलते तस पुरुषांनी बदलणं आवश्यक आहे. तरच ती दरी कमी होईल. समाज बदलतो तस प्रवाहानुसार आपल्या भूमिका पण बदलतात. हे लक्षात घेतले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.