– सुरेश पाटील, (जनसंपर्क अधिकारी, समाजकल्याण विभाग)
हलाखीच्या परिस्थितीशी दोन हात करतांना रोजच्या जगण्याची भ्रांत होती. अशात उच्च शिक्षणाचा विचार करणं तर शक्य नव्हतं…मात्र सामाजिक न्याय विभागाच्या शिष्यवृत्तीमुळे उच्च शिक्षणाचे स्वप्नं तर साकार झालेचं ; पण आयुष्याचा जोडीदार ही मिळाला. ही गोष्ट आहे. अजित व तेजश्री उबाळे या तरूण दाम्पत्यांची.
अहमदनगर जिल्हयातील पाथर्डी तालुक्यातील ‘मोहजदेवडे’ हे अजित व तेजश्री उबाळे यांचं गाव आहे. सध्या सामाजिक न्याय विभागाच्या राजर्षी शाहू महाराज देशांतर्गंत शिष्यवृत्ती योजनेतून बेंग्लोर येथे दोघं बीएस्सी नर्सिंगची पदवी घेत आहेत. अजित हा तृतीय वर्षाला शिकत आहे. तर तेजश्री ही शेवटच्या (चौथ्या) वर्षाचं शिक्षण घेत आहेत.
अजितची घरची परिस्थिती अत्यंत हलाखाची आहे. आई दुसऱ्याच्या शेतात मजूरी करते. तर वडिल गवंड्याच्या हाताखाली बांधकाम मजूर म्हणून काम करतात. अजितने स्वत:चे बारावीपर्यंतचे शिक्षण हे दुसऱ्यांच्या शेतात मजूरी करून घेतले. बारावी सायन्सला त्याला चांगले मार्कस असून ही पैशाअभावी डॉक्टर होण्याचं शिक्षण पूर्ण करता आलं नाही. त्यामुळे त्यांने आयटीआयला प्रवेश घेतला. 2 वर्षात शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुण्यात 2 वर्ष कंपनीत काम केलं ; पण मेडिकल क्षेत्रात काम करण्याच त्याचं स्वप्न त्याला स्वस्थ बसू देत नव्हतं. त्याने पुन्हा प्रयत्न करत ‘सीईटी’ परीक्षा दिली.








