नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे हे दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आले असून त्यांनी विभागातील विविध योजनांचा आढावा घेत विविध विकास कामांची पाहणी केली. नाशिक जिल्ह्यातील येवला येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुक्ती भूमी स्मारकास देखील डॉ. प्रशांत नारनवरे यांनी आज रोजी सकाळी भेट देऊन मुक्ती भुमी स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यातील विकास कामांचा त्यांनी आढावा घेतला तसेच शासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. येवला मुक्ती भूमीवर गौतम बौद्धांचा विचार देणाऱ्या साहित्याचे जागतिक दर्जाचे ग्रंथालय निर्माण व्हावे यासाठी विभागाचा प्रयत्न असल्याचे सांगून तसा प्रस्ताव शासनास सादर करावा असे यावेळी आयुक्त यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सुचित केले.
तसेच त्यांनी या वेळी संपूर्ण परिसराची पाहणी करून दुसऱ्या टप्प्यात करावयाच्या बांधकाम संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक ते बदल सुचित केले. तत्पूर्वी समाज कल्याण आयुक्त यांनी येवला तालुक्यातील जळगाव देऊर ग्रामपंचायतीस भेट देऊन तेथे मागासवर्गीय महिला बचत गटाच्या माध्यमातून तयार करण्यात येणाऱ्या पैठणी केंद्रास देखील त्यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली. मागासवर्गीय महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी पैठणी निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या समवेत समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त भगवान वीर, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी योगेश पाटील, तहसीलदार प्रमोद हिले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मुकेश पवार, मुक्ती भुमी स्मारक व्यवस्थापिका पल्लवी पगारे, सरपंच सुनीता शिंदे माजी सभापती प्रकाश वाघ ग्राम विकास अधिकारी श्री अहिरे बाळासाहेब बोराडे ग्रामसेवक जयाजी शिंदे यांच्यासह समस्त गावकरी यावेळी उपस्थित होते.