इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – अभिनेता संजय दत्त याच्या गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे मुन्नाभाई एमबीबीएस. यातील फेमस डायलॉग म्हणजे जादू की झप्पी. मात्र, हीच जादू की झप्पी एका व्यक्तीला चांगलीच महागात पडली आहे. ही बाब सध्या सोशल मिडियात चांगलीच व्हायरल झाली आहे. चीनच्या हुनान प्रांतातील युयांग शहरातील ही घटना आहे. इथल्या एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या महिला सहकाऱ्याला जादू की झप्पी दिली. मात्र ही जादू की झप्पी इतकी घट्ट होती की या जादू की झप्पी देणाऱ्याला आता आर्थिक नुकसानभरपाई द्यावी लागणार आहे.
एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आपल्या महिला सहकाऱ्याला घट्ट मिठी मारली.आपल्या ऑफीसमधील एका महिला कर्मचाऱ्याला मिठी मारणे या व्यक्तीच्या चांगलेच अंगाशी आले आहे. या व्यक्तीला कोर्टाने चक्क १ लाख १६ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. भावनेच्या आहारी त्याने मारलेली मिठी इतकी घट्ट होती की त्यामध्ये या महिलेची चक्क तीन हाडे मोडली. ती महिला वेदनेने कळवळू लागली. वेदना असह्य झाल्यावर तिने हॉस्पिटलमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
डॉक्टरांनी या महिलेला एक्स-रे काढण्यास सांगितले. ज्यात तिच्या उजव्या बाजूला दोन व डाव्या बाजूला एक अशा बरगड्यांना दुखापत झाल्याचे समजले. त्यामुळे अशा परिस्थितीत तिला ऑफिसला जाणे शक्य झाले नव्हते. तिने त्या सहकाऱ्याची भेट घेऊन त्याला नुकसानभरपाई देण्यास सांगितले, त्याने मात्र तिच्या मागणीला नकार दिल्याने या महिलेने कोर्टात धाव घेतली. कोर्टाने महिलेची बाजू ऐकल्यानंतर या पुरूष सहकाऱ्याला आर्थिक नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपल्यालाही यापुढे कोणाला मिठी मारताना विचार करावा लागेल.
Social Viral Employee Hugged Lady in Office
China