इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – भारतीय रेल्वे नागरिकांची जीवन वाहिनी तथा रक्तवाहिनी मानल्या जाते. कारण हजारो रेल्वे गाडयांमधून कोट्यावधी प्रवासी दररोज देशभरातील विविध राज्यांमध्ये प्रवास करत असतात. नागरिकांना रेल्वे प्रवासात सर्व सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचणी येऊ नये म्हणून रेल्वे प्रशासन काळजी घेत असते. परंतु तरीही अनेकदा रेल्वे प्रवासात गैरसोयीचा देखील ठरतो. तसेच रेल्वेचे अनेक वेळा अपघात देखील होतात काही वेळा प्रवासी रेल्वेला लटकून प्रवास करताना दिसतात किंवा दरवाजा जवळ उभे राहून प्रवास करतानाही दिसून येतात. काही राज्यात तर रेल्वेच्या टपावर बसून देखील जीवघेणा प्रवास करत असल्याचे छायाचित्रे आपण बघतो. परंतु एका महिलेने चक्क रेल्वेच्या दोन डब्यांच्या मध्ये असलेल्या साखळीवर बसून जीव धोक्यात घालून प्रवास केला. विशेष म्हणजे तिच्या हातात तिचे एक छोटे बाळ देखील आहे. हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत असून विशेष म्हणजे हा व्हिडिओ समोरच बसून कोणीतरी काढलेला दिसतो, परंतु नेमका हा व्हिडीओ कुठला आहे. हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.
अत्यंत धोकादायक
सोशल मीडियावर वेगवेगळे व्हिडिओ गाजत असतात, तसेच वायरल ही होतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दिसते की, एक महिला कडेवर चिमुकल्याला घेऊन ट्रेनच्या दोन डब्बे तथा बोगींच्या जॉईंटच्या साखळीवर बसून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना दिसत आहे. एका बाजूला रेल्वे प्रशासनाकडून वारंवार सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन केले जात असताना, दुसरीकडे धोकादायक पद्धतीने प्रवासाचा हा व्हिडीओ समोर आला आहे. ही महिला काही महिन्यांच्या चिमुकल्यासह ट्रेनच्या जॉईंटवर बसली आहे. तिने एका हातात चिमुकल्याला पकडले असून दुसऱ्या हाताने ट्रेनचे हँडल पकडलेआहे. विशेष म्हणजे ही ट्रेन अतिशय वेगाने धावत आहे. ही महिला कोणत्याही क्षणी खाली पडू शकते, असे या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. जर या महिलेचा हात सुटला तर, ही महिला आणि चिमुकला ट्रेनखाली येईल, असे दिसत आहे.
उलट सुलट प्रतिक्रिया
असे म्हणतात की, भारत पाकिस्तान आणि भारत चीन बरोबरच्या युद्धाच्या वेळी म्हणजे सन१९६२, १९६५ आणि १९७१ मध्ये सीमेवर जाण्यासाठी देशभरातून सैनिकांना घेऊन जाणाऱ्या शेकडो रेल्वेगाड्या या धावत होत्या, त्यावेळी प्रवासी गाड्या मात्र जिथे आहे त्या स्थाकानांवर अनेक तास किंबहुना अनेक दिवस थांबून होत्या, त्यावेळी काही प्रवासांनी धाडस करून रेल्वे अधिकाऱ्यांचा व कर्मचाऱ्यांचा डोळा चुकून अशाप्रकारे रेल्वेच्या दोन बोगी मध्ये बसून तेव्हा प्रवास केल्याची घटना जुनी जाणते लोक सांगतात. अर्थात तेव्हा तसा प्रसंग होता, आणि रेल्वेगाड्याही कमी होत्या. परंतु आता मात्र मोठ्या प्रमाणावर रेल्वे गाड्या आहेत, तरीही प्रवासी अशा प्रकारे प्रवास करतात याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. तसेच उलट सुलट प्रतिक्रिया देखील व्यक्त होत आहे.
कारण या व्हिडीओमध्ये एक महिला ट्रेनच्या दोन बोगींमधील जॉईंटवर बसून प्रवास करत असल्याचे दिसत आहे. महिलेचा हा व्हिडीओ एका ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, महिलेकडे ट्रेनच्या तिकीटासाठी पैसे नसल्याने ती या जीवघेण्या पद्धतीने प्रवास करत आहे. दरम्यान, हा व्हिडीओ समोरून एका व्यक्तीने हा व्हिडीओ मोबाईलमध्ये शूट केला आहे. त्यामुळे या महिलेप्रमाणेच त्या व्यक्तीनेही अशाच धोकादायक पद्धतीने प्रवास केल्याचे म्हटलं जात आहे. हा व्हिडीओ नेमका कुठला आणि कधीचा आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.