इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क – पूर्वीच्या काळी एक म्हण होती, ‘निम हकीम… ‘ परंतु आजच्या काळात वैद्यकीय तथा आरोग्य क्षेत्रातील अर्धवट ज्ञान असलेले किंबहुना, त्याचे ज्ञान नसतानाही त्या क्षेत्रातली खूप माहिती असली असल्याचा देखावा करून सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक करणारे तथाकथित सल्लागार वाढले आहेत. परंतु हा सल्ला ऐकून एखाद्याच्या आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यासाठी असे सल्ले ऐकणे धोकादायक ठरते विशेषतः समाज माध्यमावर अशा प्रकारचे सल्ला देण्याचे जणू काही पेवच फुटले आहे, त्यापासून सावध राहणे गरजेचे आहे.
हल्ली समाज माध्यमांवर स्वयंघोषित आरोग्य तज्ज्ञांची संख्या वाढली आहे. विविध आजार बरे करण्याचा नावावर कोणी बांगला पान, कुणी लसूण तर कुणी केळीच्या फळात कापूर घालून खाण्याचा सल्ला देतोय. यामुळे काहींची प्रकृती खालावल्याचे निरीक्षण आयुर्वेद तज्ज्ञांची संघटना असलेल्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा)ने नोंदवले आहे. कोरोनानंतर गेल्या सव्वा वर्षात उद्भवलेल्या सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीचा व्यापक अभ्यास करणार्या संशोधकांना एक बाब आढळली की, प्रत्यक्ष कोरोनामुळे जेवढे नुकसान झाले नसेल त्याच्यापेक्षा कितीतरी अधिक नुकसान हे केवळ कोरोनाविषयक खोटी, दिशाभूल करणारी आणि बुद्धिभेद करणारी माहिती समाजमाध्यमांतून प्रसारित करण्यात आल्यामुळे झाली आहे.
तंत्रज्ञानाच्या प्रचंड विकासामुळे माहितीचे भांडार प्रत्येकाच्या हाती आले आहे. मात्र, याचा विवेकी व संतुलित वापर करण्याऐवजी काही नागरिक याचा अतिशय बेजबाबदारपणे वापर करून आरोग्य विषयक अतिशय भ्रममूलक आणि भय निर्माण करणारी माहिती प्रसारित करीत आहेत. डिजिटल माध्यमांवरील या अतिशय चुकीच्या, कमालीच्या अशास्त्रीय व खोडसाळ प्रचारामुळे सरकारच्या प्रशासकीय यंत्रणेवर व प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर पाणी फेरले जाते, याची जाणीवही या अतिशहाण्याना नसते.
एकीकडे माहितीच्या-ज्ञानाच्या अखंड स्रोतामुळे सर्वसामान्य माणसांची चिंता व भीती कमी झाली आहे तर दुसरीकडे डिजिटल माध्यमातून जाणीवपूर्वक अथवा अजाणतेपणी फैलावण्यात येणारा चुकीचा, भ्रामक प्रचार व अर्धवट माहितीच्या आधारावर केलेल्या पोस्ट, तसेच अफवांमुळे नागरिकांची चिंता व भीती वाढत आहे. केवळ भारतातच नव्हे, तर जगभरच कोरोनाशी संबंधित अफवांमुळे हजारो नागरिकांना आपले प्राणही गमवावे लागले आहेत.
निमा संघटनेच्या अखत्यारित असलेल्या डॉक्टरांच्या निरीक्षणानुसार, एका व्हिडीओत नागरिकांना सलग १५ दिवस ४ ते ५ बांगला पान खाल्ल्यास वाताचा आजार नियंत्रणात येतो असे सांगण्यात येते. प्रत्यक्षात बांगला पान उष्ण असते. त्यामुळे संबंधित व्यक्तीच्या तोंडाला फोडे येऊ शकतात. शरीराला नवीन व्याधी होऊ शकते. आयुर्वेदात विरुद्ध गुणधर्म असलेल्या वस्तू एकत्र करून खायला सांगितले जात नाही. संबंधित व्यक्तीची प्रकृती, त्याचा त्रास, शरीराची क्षमता बघून औषधांचे प्रमाण निश्चित केले जाते. एखाद्याला मधुमेह असल्यास गोड घटक वगळून काढा दिला जातो. त्यामुळे समाज माध्यमावर बघून उपाय करणे चुकीचे असून त्याने नवीन आजार संभावतात.
एका व्हिडीओत लसूण जास्त खाल्ल्यास हृदयाचे ब्लॉकेज कमी होत असल्याचे सांगण्यात येते. परंतु लसूणही उष्ण आहे. ते जास्त मूूळव्याधसह इतर आजार संभवतात. त्यामुळे आयुर्वेदिक तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय उपाय करणे काहींना रुग्णालयात पोहचवू शकते, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी यांनी व्यक्त केले. स्वत:चे अज्ञान व अंधविश्वासालाच सत्य मानून व आपल्यालाच खरे ज्ञान आहे, असा फाजील आत्मविश्वास बाळगून काहीच्या काही प्रचार करणारे नागरिक सर्वाधिक धोकादायक आहेत. धार्मिक, रूढीवादी आणि संस्कृतीचा फाजील अभिमान बाळगत आरोग्य विषयक आपल्या अगाध ज्ञानाचे प्रदर्शन करणे सुरू आहे. आज व्हॉट्स ऍप,फेसबुक व अन्य समाजमाध्यमांमुळे व माहितीच्या प्रचंड स्फोटामुळे सर्वसामान्यही डॉक्टर, वैज्ञानिक आणि आरोग्य तज्ज्ञ बनले आहेत.
डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून भ्रामक, चुकीची माहिती पसरवून शिक्षित आणि अशिक्षित दोघांचाही धोकादायक पद्धतीने बुद्धिभेद करीत आहेत. देशातील वैद्यकीय संस्थांनी वेळोवेळी दिलेल्या माहितीचा व अचूक सूचनांचा वापर करून योग्य आणि शास्त्रीय माहिती जनतेपर्यंत पोहोचेल, याची विशेष खबरदारी घेणे हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. नाहीतर समाज माध्यमांवरील अपप्रचाराचा हा घातक विषाणूपेक्षाही अधिक घातक व विध्वंसक सिद्ध होऊ शकतो.
Social Media Ayurved Advice Alert Fake Misguide