इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
महाराष्ट्र हा सामाजिक दृष्ट्या अतिशय परिपक्व समजला जातो. पण, या पुढे ज्याचा निर्घृणपणे खून होईल, त्याच्यासाठी त्याच्या जातीनेच बाहेर पडायचे अन् जे खून करतील त्याच्या जातसमूहाने खुन्याचे समर्थन करायचे; अशी नवीन प्रथा महाराष्ट्रात कशी सुरू झालेय, हेच कळेनासे झाले आहे. आपण महाराष्ट्रात महाराष्ट्र धर्म जीवंत ठेवण्यासाठी लढणार आहोत की जातीपातीचे राजकारण करून महाराष्ट्राचे वाटोळे करणार आहोत? अशी उद्विग्न प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली.
ते म्हणाले की, मयत संतोष देशमुख याची आपण जात शोधणार असू तर त्याला कुठून न्याय मिळणार? खुन्यांची जात शोधून त्यांचे जर उदात्तीकरण करणार असू तर त्यातून आपणच गुन्हेगारीचे संरक्षण करण्यासाठी नवीन फौज तयार करीत आहोत, हे विसरून चालणार नाही. गुन्हे हे जात बघून केलेले नसतात. संतोष देशमुख हा जरी मराठा होता तरी तो अशोक सोनावणे या दलितालाच वाचवायला गेला होता, हीच खरी महाराष्ट्राची ओळख आहे.
बीडमध्ये जेवढ्या हत्या झाल्यात त्यामध्ये बहुतांश हत्या या वंजारी समाजाच्या मुलांच्या झाल्या आहेत आणि मारणारेही वंजारीच होते. मग, कुणाचा गौरव करायचा, मारणाऱ्यांचा की मेलेल्यांचा? अन् ते फक्त वंजाऱ्यांनी करायचे की बाकीच्या समाजाने दुर्लक्ष करायचे? या लढाईत परभणीच्या सोमनाथ सुर्यवंशीबाबत कुणीच बोलत नाही. दुर्देवं आहे, जर लढाई आपण जाती-पाती बघून करायला लागतो तर महाराष्ट्राचे आपण आपल्या हाताने वाटोळे करतोय, हे लक्षात घ्या ! कुणाला वाईट वाटत असेल तर मी क्षमा मागतो; पण, मेलेल्याला जातीचे लेबल लावू नका अन् मारणाऱ्यांना जातीचे लेबल लावून त्यांचे उदात्तीकरण करू नका. हानी समाजाचीच होतेय असेही आव्हाड यांनी म्हटले.