विशेष प्रतिनिधी, नाशिक
सामाजिक न्याय विभागाच्यावतीने अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांकरिता शासनाच्या https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर 30 जून 2021 पर्यंत अर्ज भरण्यास मुदत देण्यात आली आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया अजून ही सुरु आहे. राज्यात 2020-21 या वर्षात आतापर्यंत राज्यात 5 लाख 28 हजार 277 विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. मागील तीन वर्षातील हा उच्चांक आहे. नाशिक विभागात 63 हजार 246 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज भरले आहेत.
या संकेतस्थळावरुन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, राज्य शासनाची मॅट्रिकोत्तर शिक्षण फी – परीक्षा फी प्रतीपूर्ती योजना, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती ( इ. 11 वी 12 वी ) व व्यवसायिक अभ्यासक्रम मधून शिकणाऱ्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन योजना आदी शिष्यवृत्ती योजना ऑनलाईन करण्यात आलेल्या आहेत.
उपरोक्त योजनांसाठी अर्ज सादर करणे, त्रूटी पुर्तता करणे, अर्जाची पडताळणी करणे आणि विभागाकडे अर्ज ऑनलाईन सादर करणे यासाठी ॲप्लीकंट लॉगीन, संस्थास्तरीय लॉगीन आणि विभागस्तरीय लॉगीन दि. 30 जून 2021 पर्यत सुरु आहे. सन 2020-21 या वर्षात नाशिक विभागात 63 हजार 248 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत अर्ज भरले आहेत.
यात नाशिक – 25505, धुळे – 3968, जळगांव – 9997, नंदुरबार-1563, अहमदनगर – 22213 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीसाठी अर्जाची नोंदणी केली आहे. यापैकी महाविद्यालय स्तरावर नाशिक – 1602, धुळे – 360, जळगांव – 869, नंदुरबार – 8 व अहमदनगर – 2136 असे एकूण 4975 अर्ज प्रलंबित आहेत. सदर अर्ज समाज कल्याण विभागाकडे हस्तांतरित करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे.
पालक, विदयार्थी, महाविदयालये यांना आवाहन करण्यात येते की, आपल्या स्तरावरील प्रलंबित अर्ज पडताळणी तसेच त्रुटी पुर्तता करुन विभागाकडे तात्काळ सादर करण्याची कार्यवाही करण्यात यावी. प्रलंबित अर्ज प्रणालीमधून रिजेक्ट झाल्यास संबधित विदयार्थ्याची प्रलंबित असलेली शिष्यवृत्ती, शिक्षण फी अदा करण्याची जबाबदारी संबंधित महाविदयालयाची असेल व याबाबत सामाजिक न्याय विभागाची जबाबदारी राहणार नाही याची सर्व संबंधित प्राचार्यानी गंभीर दखल घ्यावी. असे आवाहन प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, नाशिक श्री.भगवान वीर यांनी केले आहे.