पुणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – ज्येष्ठ समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या पार्थिवावर ठोसर पागा स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अपर जिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख , अपर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे , पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनीही स्वर्गीय सिंधुताई यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
पोलीस दलातर्फे त्यांना शोकप्रसंगीचे बिगूल वाजवून आणि बंदूकीच्या तीन फैरी झाडून सशस्त्र मानवंदना देण्यात आली. स्वर्गीय सिंधुताई यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख, पुणे शहर तहसीलदार राधिका बारटक्के यांच्यासह कला, साहित्य, सांस्कृतिक, सामाजिक व विविध क्षेत्रातील नागरीक उपस्थित होते.
अनाथांच्या माता म्हणून ख्यात असलेल्या सिंधुताई यांचे काल रात्री निधन झाले. त्यांच्यावर पुण्यातील गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वीच त्यांचे हार्नियाचे ऑपरेशनही झाले होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.
सिंधुताई यांचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला. त्यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते. अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी त्यांनी ममता बाल सदन ही संस्था सुरू केली. १९९४ मध्ये त्यांनी पुणे जिल्ह्यातील पुरंदर जवळील कुंभारवळण या गावात या संस्थेचे कार्य सुरू केले. तेथे त्यांनी अनेक अनाथ मुलांचा सांभाळ सुरू केला. कुठल्याही सरकारी मदतीशिवाय त्यांनी या संस्थेला नावारुपास आणले. खासगी संस्था आणि व्यक्तींच्या देणगीद्वारे संस्थेने कार्याचा मोठा विस्तार केला. याद्वारे शेकडो अनाथांना हक्काचे घर आणि माय मिळाली. या मुलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी त्यांनी अनेक उपक्रम राबविले. या अनाथांचे विवाह लावून देण्याचे कामही त्यांनी केले. त्यांनी जवळपास ५ ते ६ संस्थांद्वारे भरीव सामाजिक कार्य केले. केंद्र सरकारने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले होते. तसेच त्यांना शेकडो पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते. त्यांच्या निधनाने अनेक अनाथांची माय आज अनंताच्या प्रवासाला गेली आहे. विविध क्षेत्रातून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.