विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली
वर्षाअखेर सुरू होणाऱ्या ५ जी सेवांमुळे फक्त इंटरनेटच्याच वेगात वाढ होणार नाही, तर आगामी दोन वर्षांपर्यंत दूरसंचार क्षेत्रात नोकऱ्याच नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. यापैकी बहुतांश नोकऱ्या कंत्राटी स्वरूपाच्या असल्या तरी कोरोना महामारीत नोकऱ्या गेलेल्यांसाठी ही दिलासादायक बाब आहे. कोरोनाच्या दुसर्या लाटे दरम्यान सुद्धा दूरसंचार सेवांचे विस्तारीकरण सुरू आहे, असे टिमलीज सर्व्हिसेसच्या दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान सेवा विभागाचे प्रमुख देवल सिंह यांनी सांगितले.
५ जी सुविधा आल्यानंतर अर्थव्यवस्थेसोबत श्रम बाजारालाही दिलासा मिळणार आहे. ५ जी सेवा कार्यान्वित झाल्यानंतर पुढील दोन वर्षांपर्यंत वेगाने विस्तार होण्याची शक्यता आहे. या दरम्यान तांत्रिक काम करणारे इंस्टॉलेशन इंजिनिअर, सिव्हिल इंजिनिअर आणि प्रोजेक्ट मॅनेजर या पदांची सर्वाधिक मागणी असेल.
दूरसंचार उपकरण तयार करणारी कंपनी अॅरिक्शनने एका वृत्तात म्हटले की, भारतीय ग्राहक ५ जीच्या सुविधेसाठी दूरसंचार खर्चात १० टक्के वाढ करण्यासाठी तयार आहेत. डिजिटल सेवेसह त्यांना ही सुविधा मिळाली तर ५० टक्क्यांपर्यंत खर्चात वाढ होऊ शकते. पहिल्या वर्षात साधारण ४ कोटी ग्राहकांकडून ५ जी सुविधेचा लाभ घेण्याची शक्यता आहे.