मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आपल्या विरोधातील पक्षांच्या नेत्यांना तुरुंगात पाठविण्याचा भारतीय जनता पार्टीचा अजेंडा असतो, असा आरोप सातत्याने विरोधकांकडून होत आला आहे. महाराष्ट्रात सत्ता असताना आणि सत्ता गेल्यानंतरही केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या अनेक नेत्यांना कारागृहात रवाना करण्यात आले. आता दिल्लीतही हाच अजेंडा राबविला जातोय, असा थेट आरोप राजकीय वर्तुळातून होत आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सीबीआयने मध्यरात्री अटक करून रात्रभर तुरुंगातच ठेवले. त्यानंतर संपूर्ण देशाचं लक्ष दिल्लीतील घडामोडींकडे वळलं. सिसोदिया हे यशस्वी शिक्षण मंत्री म्हणून लोकप्रिय आहेत. त्यांच्या कार्यकाळात दिल्लीतील शिक्षण व्यवस्था आणि यंत्रणा सुरळित झाल्या. जगभरातून त्याची दखल घेण्यात आली. त्यामुळे त्यांना सीबीआयने अटक केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. केवळ सिसोदियाच नाही, तर आतापर्यंत आम आदमी पार्टीच्या पाच वेगवेगळ्या नेत्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अजेंडा दिल्लीत राबविला जातोय, असा आरोप होत आहे.
सिसोदिया यांच्यासह सत्येंद्र जैन, संदीप कुमार, जितेंद्र तोमर आणि पंजाब सरकारचे मंत्री विजय सिंघला यांचाही यात समावेश आहे. अर्थात काहींना रंगेहाथ पकडण्यात आल्याने सत्य पुढे आहे. विजय सिंघला यांना तर लाच घेतानाच अटक करण्यात आली होती. आपचे आमदार अमानतुल्लाह खान यांना वक्फ बोर्डाच्या संपत्तीत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. आपच्या एका आमदाराला महिलेशी गैरवर्तणुक केल्याप्रकरणी तुरुंगात जावे लागले आहे. तर दिल्लीत कट रचून दंगल घडविण्याच्या आरोपात आपचे नगरसेवक ताहिर हुसैन यांना अटक करण्यात आली आहे. हे एकुणच चित्र महाराष्ट्रातील पुनरावृत्तीचे संकेत देत आहे, असे विरोधक म्हणत आहेत.
महाराष्ट्रात तर लागोपाठ अटक
महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेची सत्ता असताना छगन भुजबळ यांना तुरुंगात पाठविण्यात आले. त्यानंतर सत्ता गेल्यानंतर संजय राऊत, अनिल देशमुख, नवाब मलिक यांना कारागृहात डांबण्यात आलं. मनी लॉन्ड्रिंग, आर्थिक घोटाळे आदी आरोप या लोकांवर आहेत. त्यानंतर अनिल परब आणि हसन मुश्रीफ सध्या ईडीच्या रडारवर आहेत. सध्या राऊत, देशमुख आणि भुजबळ जामिनावर बाहेर आहेत. तर मलिक अजूनही जामिनाचीच वाट बघत आहेत.